कफकारक आणि कफनाशक
आपल्या आहारातले चिकट पदार्थ (उदा. उडीद डाळ
, भात, इ.), गोडसर पदार्थ (मिठाई,इ.) पिठात पाणी मिसळून चिकट होणारे पदार्थ (कणीक, इ.) कफकारक आहेत. गूळ,मिठाई,लस्सी, दही हे कफकारक आहेत. थंड पाणी, गारठा इत्यादींनी कफ वाढतो. आराम,जास्त झोप हेही कफकारक आहेत.
धान्य भाजून केलेल्या लाह्या किंवा लाह्याच्या पिठात पाणी मिसळून केलेले पदार्थ कफ कमी करतात. सुंठ, मिरे, पिंपळी, मिरची, इत्यादींनी उकळून केलेले पाणी कफनाशक असते. नैसर्गिक मधही कफनाशक आहे.
वातकारक आणि वातनाशक
वातकारक पदार्थ म्हणजे हरभरा
, वाटाणा, पावटा, मटकी, चवळी, इत्यादी कडधान्ये. ज्या धान्याचे आवरण पूर्ण वाढल्यावर वाळून तडकून फुटते अशी ही धान्ये आहेत. काकडी, खरबूज, टरबूज या गटांतील कापल्यावर पाणी सोडून देणारी फळे तसेच कडू,तुरट, तिखट चवीच्या वस्तू, इत्यादी पदार्थ वातकारक असतात. या पदार्थामधून पोषण कमी होते आणि विष्ठा कडक, कोरडी होते असे आयुर्वेदाचे सांगणे आहे. गोड चवीचे पदार्थ
, स्निग्ध पदार्थ (तेल, तूप), मीठ, आंबट पदार्थ, तेलमालिश, सहज पचणारे अन्नपदार्थ, गहू, उडीद तेल मिसळून केलेले पदार्थ वातविकारात वापरावेत. हे पदार्थ वातदोष कमी करतात.
पित्तकारक आणि पित्तनाशक
पित्तकारक पदार्थांमध्ये पिवळया
, लालभडक, उग्र वासाच्या पदार्थांचा समावेश असतो. मसाल्याचे पदार्थ पित्तकर असतात. तिखट, आंबट, शिळे, खारट, आंबवलेले, मुरवलेले (लोणचे). दारू, इत्यादी पदार्थ पित्तकर आहेत. पित्तदोष असणा-या व्यक्तींना जळजळ होत असेल तर वरील पदार्थ टाळल्यास बरे वाटते. पित्तप्रकृती व्यक्तींना उन्हात त्रास होतो. भाजणे, शेकणे, यांचाही जास्त त्रास होतो. शेकोटीनेही या व्यक्तींचे पित्त वाढू शकते.पित्तप्रकृती व्यक्तींचे आजार वेगाने वाढतात. त्यामुळे त्यांना सावधपणे गोड
, द्रवरूप पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थातील कडू-तुरट चवीचे पदार्थ दिल्यास बरे वाटते.
पथ्यापथ्याचे महत्त्व
या दोषवर्णनाचे महत्त्व सतत निरीक्षणाने लक्षात येईल. काही व्यक्ती कायम नजरेसमोर असल्याने तुम्ही वर्गीकरण सहज शिकू शकाल. या त्रिदोषवर्गीकरणाचा वापर करून त्या त्या व्यक्तींचे पथ्यापथ्य सांगितल्यास त्यांचे आजार लवकर बरे होतील. यामुळे कमी औषधे लागतील हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थाने त्यांचे आजार वाढतात किंवा कमी होतात ह्याचा अभ्यास केला पाहिजे.
सर्वसाधारणपणे अखंड मूग (सालीसकट) हा त्रिदोषांच्या दृष्टीने संतुलित पदार्थ आहे. हा पदार्थ वापरल्यास आजारनियंत्रण लवकर होते. त्रिदोषविचार लक्षात घेतल्यावर केवळ साध्या अन्नपदार्थाच्या पथ्यापथ्याने आजारांवर ब-याच प्रमाणात उपचार करता येतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या