पुणे – यंदाची 31 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, रविवार दि, 29 जानेवारी 2017 रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा स्पर्धा संचालक प्रल्हाद सावंत व विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी आज केली. यंदाच्या या स्पर्धेसाठी 35 लाख रूपयांची रोख पारितोषिके, मॅरेथॉन करंडक व पदके दिली जाणार असून “रन फॉर पुणे'(पुण्यासाठी धाव) हे यंदाच्या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.
मूळ कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे ही स्पर्धा 4 डिसेंबर 2016 रोजी होणार होती, परंतु देशामधील नोटाबंदी व बॅंकांवरील आर्थिक निर्बंध यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती. आता ती 29 जानेवारी रोजी होत आहे. यंदा या स्पर्धेमध्ये पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन, तसेच पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन अशा तीन स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होतील. तर 10 किमी पुरुष, 10 किमी महिला, 5 किमी पुरुष, 5 किमी महिला, व्हीलचेअर या स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर होतील. पुण्यामधील कुमार खेळाडूंसाठी 15 वर्षांखालील मुले व मुली असे दोन गट असतील. दरवर्षीप्रमाणे यंदा पुण्याच्या क्रीडा विकासासाठी “रन फॉर पुणे’ ही 5 किमी अंतराची कार्पोरेट रन ठेवण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
यंदाच्या स्पर्धेमधील पूर्ण मॅरेथॉनमधील विजेत्याला पुणे महापौर चषक व अडीच लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच अर्धमॅरेथॉन विजेत्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंस पुणे महापौर चषक व दीड लाख रुपये पारितोषिक दिले जाईल. त्याशिवाय विविध गटातील पहिल्या 6 क्रमांकांच्या खेळाडूंना पुणे महापौर चषक व बक्षिसे दिले जाणार आहेत. स्पर्धेत भाग धेणाऱ्या प्रत्येक खेळाडूस टी-शर्ट, सहभाग स्मृतिपदक, प्रशस्तीपत्रक, अचूक वेळ मोजण्यासाठी टाईम टिप, व अल्पोपहार दिला जाणार आहे. यंदा कॅशलेस मॅरेथॉन करण्याचा प्रयत्न असल्यामुळे विजेत्या सर्व खेळाडूंना ही पारितोषिके 90 दिवसांच्या आत आरटीजीएसद्वारे दिली जाणार आहेत.
यंदा स्पर्धेचा प्रारंभ हा पुणे महानगर पालिकेच्या कै. बाबूराव सणस क्रीडांगण येथून होणार असून सर्व स्पर्धांचा शेवट याच स्टेडियमध्ये होणार आहे. नेहमीचा खंडोजीबाबा चौकात होणारा प्रारंभ यंदा प्रथमच बदलण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत टांझानिया, इथोपिया, केनिया, कॅंनडा आदी देशांमधील 100 हून अधिक धावपटूंसह 12 हजार धावपटूंनी नावे नोंदवली आहेत. यापुर्वी 4 डिसेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे घेण्यात आलेल्या 5 व 10 किमी स्पर्धांमध्ये सुमारे दीड हजार धावपडूंनी सहभाग घेतला होता.
दूरदर्शनने नेहमीप्रमाणे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निश्चित केले आहे. आकाशवाणीवरही थेट धावत्या समालोचनासाठी पत्रव्यवहार झालेला आहे. या स्पर्धेच्या तांत्रिक नियोजनासाठी आंतरराष्ट्रीय पंच राहुल पवार, सतीश उचिल, सुशील इनामदार, चंद्रकांत पाटील, माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर, आनंद मॅनेझिस, राम भागवत आदी प्रमुख सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे बाराशे तांत्रिक अधिकारी या स्पर्धेचे नियोजन करणार आहेत. त्यांना बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, ए.एस.आय., चंद्रशेखर आगासे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, तसेच पुण्यामधील विविध ऍथलेटीक्स क्लब साहाय्य करणार आहेत.
या स्पर्धेच्या प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत 20 जानेवारी 2017 असून त्या फक्त ऑनलाईनhttp://www.marathonpune.com/या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
स्त्रोत : दैनिक प्रभात
अंतिम सुधारित : 1/12/2017