जत... नेहमीच दुष्काळी असलेला भाग. खरं तर हीच या भागाची ओळख. अशा दुष्काळी भागात एखादे शासकीय वसतिगृह कसे असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, जतचे शासकीय वसतिगृह याला अपवाद ठरते. शासकीय चौकट आणि चाकोरीबाहेर जाऊन परिसरातील मागासवर्गीयांच्या मुलींसाठी हे वसतिगृह हक्काचे कुटुंब बनले आहे. इतकेच नव्हे तर चार वर्षांपूर्वी उजाड माळरान असलेले हे वसतिगृह आता माळावरचे नंदनवन म्हणून ओळखले जात आहे.
जतचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह 2009 साली सुरू झाले. जत सांगली रस्त्यावरील पांढरा बंगला शेजारच्या नवीन इमारतीत हे वसतिगृह सुरू आहे. खरं तर वसतिगृहाचा 8 एकर परिसर एक उजाड माळरानच होते. या माळरानावर नंदनवन फुलविण्याचे श्रेय वसतिगृह अधिक्षिका श्रीमती एस.बी.खारतोडे यांना द्यावे लागेल. बारामतीसारख्या हिरव्यागार, सधन आणि समृद्ध भागातील असलेल्या श्रीमती खारतोडे यांच्यासाठी जतसारख्या दुष्काळी भागात काम करणे जिकिरीचे होते. पण, त्यांनी या संधीचे सोने करायचे ठरवले आणि प्रत्यक्षात ते स्वप्न उतरवलेही.
उजाड असलेल्या या माळराणावर आज जवळ-जवळ 500 ते 600 प्रकारची वेगवेगळे वृक्ष वसतिगृह या माळरानावर आनंदाने डोलत आहेत. एक सुंदर बगीचा तयार करून त्यात आंबा पार्क, केळी पार्क, गुलाब पार्क, परसबाग असे वेगवेगळे पार्क तयार केले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व परिसर सांडपाण्यावर तयार करण्यात आलेला आहे. वसतिगृहात 1000 झाडांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. वसतिगृहात येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत रोप देऊन केले जाते. त्यामुळे मुलींच्या मनातही वृक्ष व पक्षांविषयी जवळीक निर्माण झाली आहे. विविध वृक्षवल्लींमुळे विविध प्रकारचे पक्षी वसतिगृह परिसरात वास्तव्यास आहेत.
इथे विरंगुळा केंद्र, विश्रांती कट्टा, छोट-छोट्या पाऊल वाटा, नागमोडी रस्ते, वेगवेगळ्या फुलांच्या कमानी, शेततळे, झोपड्या, बगीचातील पेपर कट्टा अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवत या वसतिगृहाची शोभा वाढवली आणि इतर वसतिगृहांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले. वसतिगृहाची इमारत प्रशस्त आहे. प्रवेश क्षमता 100 विद्यार्थिनींची आहे. दरवर्षी पूर्ण क्षमतेने हे वसतिगृह चालते. सुसज्ज अभ्यासिका, प्रशस्त क्रीडांगण, 27 स्वच्छतागृहे व स्नानगृहे, इंटरनेट कनेक्शनसह प्रशस्त 10 संगणकांची प्रयोगशाळा, 1 टीव्ही हॉल अशा अनेक सुविधा इथे आहेत. वसतिगृहात सुसज्ज ग्रंथालयही आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांची जवळपास 2000 पुस्तके आहेत.
वसतिगृहात मुलींच्या सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त लक्ष दिले जाते. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास अशा वेगवेगळ्या विषयावर महिन्यातून दोनदा विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते. दोन महिन्यांतून एकदा वेगवेगळे व्याख्याते बोलविले जातात. स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. शिवाय, वर्षातून दोनवेळा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरही घेतले जाते. मनोरंजनासाठी स्नेहसंमेलन, क्रीडा सप्ताह हे नेहमीचे उपक्रम तर आहेतच. वृक्षारोपणाचे महत्त्व कळण्यासाठी वृक्षदिंडी, पथनाट्याद्वारे समाजप्रबोधन, स्वच्छता रॅली या उपक्रमांमधून नैतिक आणि सामाजिक मूल्ये रुजवली जातात. शाळेतील व वसतिगृहातील मुलींचे वाढदिवसही साजरे केले जातात.
वसतिगृह परिसरातच सामाजिक न्याय विभागाची सांगली जिल्ह्यातील पहिली मुलींची निवासी शाळा सुरु करण्यात आलेली आहे. त्यात आज रोजी 150 मुली शिक्षण घेत आहेत. श्रीमती खारतोडे यांनी स्वत: फिरुन तालुक्यातील 63 मुलींवर शाळा सुरु केली. शाळेमध्ये ऊस तोड कामगारांच्या मुली शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांचे बालविवाहाचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच जतमधील अतिशय देखणा असा वसतिगृह परिसर नावारुपाला आला आहे. त्यामुळे जतच्या माळावरील या हिरवळीवर विरंगुळा घेण्यासाठी या ठिकाणाकडे शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही पावले आपसूकच वळतात. म्हणूनच या वसतिगृहाने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
लेखक - संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/21/2023
एखाद्या गावाची ओळख तेथील वैशिष्ट्यांमुळे,वेगळेपणाम...
अपंग, गतीमंद अनाथ बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने...
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींनी पुढे यावे आणि...