आर्यमहाकल्प व गण : टी. एच्. हॉलंड यांनी भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाचे जे विभाग केले आहेत त्यांपैकी शेवटच्या व चवथ्या विभागाचे नाव (१९०७).हा विभाग यूरोपाच्या स्तरवैज्ञानिक अभिलेखमालेतील (थरांच्या कालानुक्रमे असणाऱ्या नोंदीतील) उत्तर कार्बॉनिफेरसपासून पुराजीव महाकल्पाचा उरलेला भाग व सर्व मध्यजीव व नवजीव-महाकल्प यांच्याशी तुल्य आहे.म्हणजे हा महाकल्प सु. वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते सहा लाख वर्षापूर्वींपर्यंत होता.
भारतीय द्वीपकल्पातील गोंडवनी संघाच्या तळाचा तालचेर गोलाश्मसंस्तर (हिमनदीच्या क्रियेने तयार होणारा विशिष्ट प्रकारचा थर), मिठाच्या डोंगरातील पर्मो-कार्बॉनिफेरस कालीन गोलाश्मसंस्तर व मध्य हिमालयातील एक ठळक ð पिंडाश्म यांच्यामुळे दिसून येणारी जी उत्तर कार्बॉनिफेरस कालीन विसंगती आहे. तिच्या आधारे हॉलंड यांनी आर्य गण व त्याच्या आधीचा ðद्रविड गण यांना वेगळे केलेले आहे. आर्य महाकल्पाचा प्रारंभ झाल्यापासून भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाचे अभिलेख एकंदरीत अखंड तयार झालेले आहेत.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2023