অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आफ्रिका - खनिजसंपत्ती , वनस्पती

आफ्रिका - खनिजसंपत्ती , वनस्पती

खनिजसंपत्ती

जगाच्या खनिज उत्पादनाच्या किंमतीचा ५ % भाग आफ्रिकेच्या खनिजांच्या किंमतीचा आहे. येथील बहुतेक सर्व खनिजे निर्यात होतात. अवजड खनिजांचे उत्पादन थोडेच आहे. कोळसा जागतिक उत्पादनाच्या २ % हून कमी, १९६० ते ७० च्या मध्यास पेट्रोलियम १ % पेक्षा कमी, मीठ १.५ %, बॉक्साइट १.५ % व लोहधातूक २ % एवढेच होते. याउलट काही मौल्यवान खनिजांबाबत आफ्रिका अग्रगण्य आहे. जगातील हिर्‍यांपैकी ९८% हिरे आफ्रिकेत मिळतात. झाईरेतील हिर्‍यांपैकी ८५ % उद्योगधंद्यांत वापरले जातात व फक्त १५ % रत्ने म्हणून उपयोगी पडतात. झाईरेमध्ये जगातील पहिली महत्त्वाची युरेनियमची खाण होती व कित्येक वर्षे रेडियम मिळण्याचे ते एकमेव ठिकाण होते. जगातील सोन्याचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पादन आफ्रिकेत होते व त्यापैकी बरेच उत्पादन दक्षिण आफ्रिका संघराज्यात होते.

पोलाद भक्कम करण्यासाठी लागणाऱ्या खनिजांचा बराच मोठा भाग आफ्रिकेतून येतो. कोबाल्टाच्या जागतिक उत्पादनाचा ७० % भाग झाईरेच्या कटांगा प्रांतातून व झँबियातून येतो. क्रोमधातुकाचा ४० % दक्षिण आफ्रिका संघराज्य व र्‍होडेशिया येथून, मँगेनीजचा ३० % घाना व झाईरेमधून व व्हॅनेडियमचा २० % नैर्ऋत्य आफ्रिका व झँबिया येथून येतो. अलोह खनिजांपैकी प्‍लॅटिनम २४ % द. आफ्रिका संघराज्य, तांबे २४ % झँबिया व कटांगा आणि कथील १५ % नायजेरिया येथे मिळते. जगातील २० % अ‍ॅसबेस्टॉस द. आफ्रिका, र्‍होडेशिया व स्वाझीलँडमधून येते, तर फॉस्फेट खडकाचा ३३ % हून अधिक पुरवठा अल्जीरिया, मोरोक्को व ट्युनिशिया येथून होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर सहारामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे सापडले व खाणींपासून भूमध्य समुद्रापर्यंत नळ टाकले गेले. दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेटमधील विट्वॉटर्झरँडचा सोन्याच्या खाणींचा प्रदेश, युगांडातील कीलेंबे येथील तांबे सापडणारा प्रदेश, टांझानियातील म्पाँडा येथील शिशाची खाण व लायबीरियातील बोमिहिल्स लोहक्षेत्र येथील नवीन खाणींपर्यंत रेल्वे झाली. व्होल्टा प्रकल्पामुळे घानातील बॉक्साइटचे उत्पादन वाढले.

वनस्पती

आफ्रिकेतील नैसर्गिक वनस्पती म्हणजे अरण्ये, गवत व मरुप्रदेशीय वनस्पती ही होय. दाट अरण्ये व निबिड जाळ्या यांनी या खंडाचा एक दशांशाहूनही कमी भाग व्यापलेला आहे. त्याला लागून सॅव्हानाचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. उष्णकटिबंधाबाहेर अगदी उत्तरेला व अगदी दक्षिणेला भूमध्यसागरी वनस्पती आहेत. परंतु त्या एकमेकांपासून बऱ्याच वेगळ्या आहेत. उत्तरेकडील किनारी प्रदेशात यूरोपीय वनस्पतींचे प्राबल्य दिसते. अ‍ॅटलास पर्वतावर तद्देशीय वनस्पतीही आहेत. मोरोक्को, अल्जीरिया व ट्युनिशिया येथे ऑलिव्ह, द्राक्षे वगैरेंच्या लागवडीशिवाय बुचाचा ओक व अ‍ॅटलास सीडार यांची अरण्येही आहेत. या देशात व लिबियातही माकीची सदाहरित झुडुपे आढळतात. अ‍ॅटलासच्या उंच भागात व पश्चिमेकडील वाळवंटी भागात बऱ्याच ठिकाणी स्टेपगवत आहे. ईजिप्तच्या नाईलखोऱ्यातील समृद्ध शेती सर्वस्वी नाईलच्या पाण्यावर अवलंबून आहे. या देशाचा बाकीचा भाग निर्जल मरुप्रदेश आहे.सहाराच्या डोंगराळ भागात काही ठिकाणीयूरोपीय सदृश वनस्पती आहे, तशीच ती मरूद्यानातही आढळते. मरूद्यानातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे खजुराची झाडे; ताडाच्या व निवडुंगाच्या अनेक जातीही वाळवंटी प्रदेशात मधूनमधून दिसतात. युफोर्बिया हे झुंबरासारखे निवडुंगाच्या जातीचे झाड इथिओपियात अधिक दिसते. नाईलच्या वरच्या भागात पॅपीरसची झाडे आहेत. त्यापासून प्राचीन काळी लिहिण्यासाठी गुंडाळी तक्ते बनवीत असत. तथापि सहारातील मोठमोठे विस्तीर्ण प्रदेश अगदी वनस्पतिरहित आहेत.

सखल वर्षावनातील सर्वांत उंच झाडे ६०-६५ मीटरपर्यंत वाढतात. त्यांपैकी पुष्कळांच्या बुंध्यापाशी त्यांना आधार देणारे खोडाचे फाटे लांबपर्यंत गेलेले असतात. येथील बऱ्याच वृक्षांपासून मौल्यवान लाकूड मिळते. आफ्रिकन महॉगनी, इरोको, म्व्हूल, ओबेची, आफ्रिकन रोजवुड, आफ्रिकन ट्यूलिपवृक्ष, आफ्रिकन एबनी, रेड आयर्नवुड, अफ्रारा, यलो सॅटिनवुड, अ‍ॅलिग्ना, आफ्रिका ओक इ. वृक्ष यांपैकी होत. यांचा उपयोग रेल्वेचे स्लीपर, फर्निचर, आधाराचे खांब इ. अनेक प्रकारे होतो. काँगो झेब्रावुड नावाने निर्यात होणारे लाकूडही या भागात मिळते. काही वृक्षांच्या सालीपासून टॅनिन मिळते तर काहींच्या साली वल्कले म्हणून वस्त्रांऐवजी वापरता येतात. काही सालींपासून दोरही करता येतात. वर्षावनांत महालता व अपिवनस्पतीही पुष्कळ आहेत. स्थापरत्वे व ऋतुमानपरत्वे आंबा, चिंच, वड, निंब, हिरडा, बेहडा, रुद्राक्ष, अर्जुन, ऐन, किंजळ, मंजिष्ठ, बांबू, वेत यांच्या जातींची उपयुक्त झाडेही आहेत.

ती बहुधा वर्षावने व गवताळ प्रदेश यांदरम्यानच्या संक्रमणप्रदेशात आढळतात. शियाच्या फळांपासून लोण्यासारखा पदार्थ तयार करतात तर मुसुंगा या झाडापासून एक तद्देशीय पेय बनवितात. वृक्षनेचे, ऑर्किड, बेगोनिया हे अनेक ठिकाणी आहेत. मोठ्या झाडांखाली लहानमोठी झुडुपे दाटीवाटीने उगवलेली दिसतात. रबर, कोको, कोला, रोबस्टाकॉफी यांच्या लागवडी या अरण्यप्रदेशात होतात. तेल्याताड व रेशमासारखा मऊ कापूस देणारे कापोकवृक्ष हे अरण्यप्रदेशात होतात. औषधी व सुवासिक वनस्पतीही आहेत. काँगोच्या खोऱ्यातील विषुववृत्तीय अरण्ये पूर्वेस मोठ्या सरोवरांपलीकडे गेलेली नाहीत. केन्यामधील काकामेगा अरण्यासारखे त्यांचे काही तुटक अरण्यविभाग मात्र आढळतात.विषुववृत्तीय अरण्यांभोवती सर्व बाजूंनी सॅव्हानाचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश पसरलेला आहे. एलफंटगवत हे त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण गवत आहे. येथे अनेक प्रकारची गवते आहेत. त्यातच मधूनमधून रुंदपर्णी वनप्रदेश आहेत. पूर्व आफ्रिकेत त्यांना मायोंबो म्हणतात. या प्रदेशात एक ते अडीच मीटर उंच, झुपकेदार गवताचा सलग विभाग आढळतो; त्यात ६ ते २० मी. उंचीची गाठाळ खोडांची झाडे दूरदूर अंतरावर उभी असलेली दिसतात. शेतीयोग्य भागात मधूनमधून शीनट, लोकस्टबीन, चिंच, गोरखचिंच वगैरे झाडे आढळतात. आर्द्र गवतप्रदेशात प्रवाहांच्या काठाकाठाने सदाहरित अरण्ये दिसतात. कोरड्या भागात लहान पानांची काटेरी झाडे आहेत. त्यात बाभळीच्या जातीचा झाडे येतात. दूरदूर अंतरावर छत्रीच्या आकाराची झाडे दिसतात. येथील गवतही कमी उंचीचे असते. झँबियात व जवळपासच्या भागात पानझडी वृक्ष आहेत, त्यांत र्‍होडेशियन साग हा महत्त्वाचा आहे. तेरड्यासारख्या पानझडी झुडुपांचे रान मोठ्या झाडांखाली वाढलेले दिसते. मनुष्यवस्ती व आग यांमुळे वृक्ष कमी होऊन सॅव्हाना प्रकारचे राठ गवत वाढते.

गवते गुरांना चारा म्हणून उपयोगी पडतात तर काही घरांवरील छपरांसाठी वापरतात. व्हेल्डमधील काही गवते पहिल्या वाढीच्या काळातच गुरांना खाण्यास उपयोगी पडतात. उंच भागातील स्वीटव्हेल्डचे गवत वाळल्यावरही गुरांना खाण्यायोग्य व पोषक असते. झँबीझी व लिंपोपो यांच्या उष्ण, रूक्ष खोऱ्यात मोपेनचा वनप्रदेश आढळतो. त्यात काँगोकोपल नावाचे रोगण, राळ, हिराबोळ, गुग्गुळ या जातीचे पदार्थ देणारी झाडे आहेत. कालाहारीचा निमओसाड प्रदेश व सेनेगलपासून पूर्व आफ्रिकेपर्यंत गेलेला पट्टा हे भाग कोटेरी झुडुपांनी भरलेले आहेत. त्यांत बाभळीसारखी डिंक देणारी, मिर्‍हासारखी धूपाप्रमाणे सुवासिक पदार्थ देणारी झाडे आहेत. अनेक औषधी वनस्पतींही आहेत. येथील गवत लहान व सॅव्हानापेक्षा वाळवंटाजवळच्या स्टेपप्रकारचे आहे. पूर्वेच्या भागात देवनळ व ग्राउंडसेल ही उंच वाढणारी काटेरी झाडे आहेत. नदीमुख खाड्यांजवळ कच्छवनश्री आढळते. पूर्व आफ्रिकेत तिचे आशियायी कच्छवनश्रीशी साम्य दिसते. ती तांबड्या समुद्रापासून दरबानच्या दक्षिणेपर्यंत दिसून येते.

पश्चिम किनाऱ्यावर सेनेगल नदीपासून अंगोलातील लोंगा नदीपर्यंत किनाऱ्यावर मधूनमधून कच्छवनश्री आहे. वाल्व्हिस बे पासून मोसॅमीडीसपर्यंतच्या भागात वेल चिटसचिया नावाचे फक्त आफ्रिकेतच आढळणारे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण झुडूप उगवते. याचा मुळ्यासारखा सु. ३० सेंमी. जाडीचा भाग जमिनीखाली असतो व वरच्या बाजूस फक्त दोनच पाने येतात. ती देठापासून पुढे वाढत जातात व टोकाशी फाटून किंवा अन्य तऱ्हेने नाश पावत असतात.पर्वतीय वनस्पतींत सदाहरित अरण्य, रुंदपर्णी व पानझडी वने, गवत व बांबू ही असतात. कमी उंचीवरील अरण्यांत वृक्षांवर भरपूर शेवाळे, नेचे व अपिवनस्पती असतात. या प्रकारच्या अरण्यांत ज्यूनिपर, पोडोकार्पस यांसारखे वृक्ष आहेत. यापेक्षा उंच भागात हॅगेनिया, निडिया (रोमठा), एरिका यांसारखी औषधी व रंग वगैरेंसाठी उपयोगी येणारी झाडे आहेत. त्यांवर भरपूर लिचेन्स(दगडफुलाच्या जातीची वनस्पती) असतात. १,५०० ते २,१०० मी. उंचीवर गवत असते. त्यापेक्षा अधिक उंचीवर गवत खुजे होत जाते. पर्वतीय वनस्पतींत व्हायोलेट, डॉक, क्रेनसबिल. वुडसॅनिकल, बटरकप, स्केबियस इ. युरोपीय जातींही आढळतात.

अगदी दक्षिणेस एका अरुंद पट्ट्यात केपमाकी आढळते. केपच्या वनस्पती समृद्ध असून ऑस्ट्रेलियन वनस्पतींशी त्याचे साम्य दिसते. तपकिरी किंवा राखी रंगाच्या माकीमध्ये तेल व राळ असते. सायप्रस पाइन, सिल्व्हर ट्री, क्लॅनविल्यमसीडार हे वृक्षही मधूनमधून आढळतात. ग्राऊंट ऑर्किड, ऑक्झॅलिस, जिरॅनियम व लिली या जातींची अनेक सुंदर झुडुपे आहेत. माकीच्या मागे कारुचा विशाल निमओसाड पठारी प्रदेश आहे. तेथे वनस्पतींच्या अनेक जाती आहेत.त्यांत पेंटिझा, क्रायसोकोमा, यूरिऑप्स, सॅलसोला, आर्टिप्लेक्स (चंदनबटवा) यांचा समावेश होतो.  ऑरेंज नदीच्या उत्तरेस काही विशिष्ट प्रकारची झुडुपे आहेत. त्यांबरोबर निवडुंगासारख्या जाड पानांची लहानमोठी झुडुपेही आहेत.त्यांतील काहींची पाने दगडासारखी दिसतात. कोरफड व युफोर्बिया ही तेथील अतिउंच झुडुपे होत. नदीनाल्यांकाठी बाभूळ व सदापर्णी सुमाक असतात. पूर्वेच्या बाजूस कारू वनस्पतींनी काही ठिकाणी गवताळ प्रदेशांवर आक्रमण केलेले दिसते. या गवताळ प्रदेशांना हायव्हेल्ड म्हणतात. त्यांनी १,००० मी. उंचीवरील मोठमोठे प्रदेश व्यापलेले आहेत. केप प्रांतातील सदाहरित अरण्य प्रदेश थोडाच आहे. त्यात क्नीस्ना हे मोठे अरण्य येते. तेथील वनस्पती उष्णकटिबंधीय पर्वतीय वनस्पतींसारख्या आहेत. त्यांत पोडोकार्पस, विड्रिंगटोनिया, रानटी ऑलिव्ह, ओकोटी (स्टिंकवुड) इ. वृक्ष आहेत.

अंतिम सुधारित : 4/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate