पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस २३ १०/२वर कल्पिलेल्या अक्षवृत्तांस अनुक्रमे ‘कर्कवृत्त’ आणि ‘मकरवृत्त’ म्हणतात; हीच भौगोलिक अयनवृत्ते होत. ती सूर्यच्या उत्तरायण—दक्षिणायनांच्या मर्यादा दाखवितात. पृथ्वीचे परिवलन, तिचे परिभ्रमण, तिच्या आसाचा तिच्या कक्षेच्या पातळीशी असलेला ६६ १०/२ कोन, आणि आसाचा एकाच दिशेकडे सतत असलेला रोख, यांमुळे कोणत्याही ठिकाणी दररोज मध्यान्हीचा सूर्य आकाशात एकाच ठिकाणी दिसत नाही.
२१ जूनपासून २२ डिसेंबरपर्यंत तो दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक दक्षिणेला गेलेला दिसतो आणि २२ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत तो आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक उत्तरेस गेलेला दिसतो. सूर्याच्या या भासमान दक्षिणोत्तर गतीला व २१ जून ते २२ डिसें. आणि २२ डिसें. ते २१ जून या काळालाही अनुक्रमे ‘दक्षिणायन’ व ‘उत्तरायण’ म्हणतात. २१ जूनला सूर्याचे लंबरूप किरण कर्कवृत्तावर पडतात, म्हणजेच तेथे त्या दिवशी मध्यान्हीचा सूर्य बरोबर डोक्यावर, खस्वस्तिकी आलेला दिसतो आणि या दिवशी सूर्याचे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. तसेच २२ डिसेंबरला सूर्याचे लंबरूप किरण मकरवृत्तावर पडतात; तेथे सूर्य डोक्यावर येतो आणि सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. म्हणून कर्कवृत्त व मकरवृत्त यांस ‘अयनवृत्ते’ आणि २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांस ‘अयनदिन’ म्हणतात.
अयनवृत्तांच्या दरम्यानच्या प्रदेशाला ‘उष्णकटिबंध’ म्हणतात. या प्रदेशातील प्रत्येक ठिकाणी वर्षातून फक्त दोन दिवशी सूर्य खस्वस्तिकी येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरध्रुवाकडील बाजूच्या प्रदेशात आणि मकरवृत्ताच्या दक्षिणध्रुवाकडील बाजूच्या प्रदेशात सूर्य कधीही बरोबर डोक्यावर, खास्वस्तिकी येत नाही.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2023