‘अयन’ या शब्दातील ‘इ’ या धातूचा अर्थ ‘जाणे’ असा आहे. सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे उत्तरायण व दक्षिणेकडे जाणे म्हणजे दक्षिणायन. क्रांतिवृत्त व खगोलीय विषुववृत्त ही खगोलावर एकमेकांस दोन बिंदूंत छेदतात; ते संपातबिंदू होत. सूर्याची क्रांती ०० ते याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीत बदलते. हेच आलेखरूपाने पुढील पृष्ठावरील आकृतीत दर्शविले आहे.
या आलेखात क्रांतिवृत्त ज्या-वक्रात्मक (त्रिकोणमितीतील ज्या-फलनाच्या आलेखाप्रमाणे, त्रिकोणमिति) व विषुववृत्त सरळ रेषेत आहेत. व हा वसंतसंपात आणि श हा शरत्संपात, क हे सूर्याच्या अधिकतम २३ २/१0 उत्तर क्रांतीचे ठिकाण आणि म हे अधिकतम २३ २/१0 दक्षिण क्रांतीचे ठिकाण आहे. व या ठिकाणी सूर्य २१ मार्चला, क या ठिकाणी २१ जूनला, श या ठिकाणी २१ सप्टेंबरला आणि म या ठिकाणी २१ डिसेंबर या दिवशी असतो.सूर्याचा क ते म म्हणजे २१ जून ते २१ डिसेंबर हा प्रवास त्याचे दक्षिणायन आणि २१ डिसेंबर ते २१ जून म्हणजे म ते क हा प्रवास त्याचे उत्तरायण होय. संपातबिंदू मागे मागे सरकत असतात, हे चलन लक्षात घेतले व सध्याच्या वसंतसंपातात मेषारंभ बिंदू धरला तर २१ डिसेंबर या दिवशी (सायन) मकर-संक्रांत आणि २१ जून या दिवशी (सायन) कर्क-संक्रांत येते. संपाताचे चलन लक्षात न घेता लौकिक मकर-संक्रांत १४ जानेवारीस आणि टिळक पंचांगानुसार १० जानेवारीस पाळली जाते आणि कर्क-संक्रांत १६ जुलैला असते. त्यांचा ऋतूंच्या दृष्टीने किंवा दक्षिणायन –उत्तरायणाच्या द्दष्टीने प्रत्यय येत नाही.उत्तरायणाला ‘उदगयन’ असेही म्हणतात. वेदांग-ज्योतिषात उदगयनारंभ धनिष्ठारंभी होत असल्याचा उल्लेख आहे.
संपातबिंदूच्या विलोमगतीमुळे उत्तरायण व दक्षिणायन यांचे प्रारंभदिन भारतीय पंचांगपद्धतीत मंदगतीने मागे मागे जात राहतील.‘देवयान’ व ‘पितृयान’ अशाही संज्ञा पूर्वी उत्तरायण आणि दक्षिणायन यांना प्रचलित होत्या.फार प्राचीन काळी वसंतसंपातापासून शरत्संपातापर्यंत सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेस असेतो देवयान व त्यापुढील सहा महिने सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेस असताना पितृयान मानीत असे लोकमान्य टिळकांचे मत आहे.
लेखक: ना. ह. फडके
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 12/11/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.