অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विराम चिन्हांकन

विराम चिन्हांकन

(पंक्चुएशन). कोणत्याही लिपीमध्ये मुख्यतः भाषिक घटकांना दृश्य चिन्हे दिली जातात, मग ते घटक वर्ण किंवा वर्णसमूह असतील (उदा., श, sh; ज्ञ, जपानी लिपीतील का, की, कू, के, को साठी एकेक चिन्ह), पद किंवा पदघटक असतील (उदा., ॐ, &, &c, चिनी लिपीतील ‘ माणूस’ चिन्ह), किंवा अर्थघटक असतील (उदा., ४०, 40, .।।.). मात्र काही लिप्यांतून यांच्या जोडीला विविध चिन्हे पूरक म्हणून कमीअधिक आवश्यक मानली जातात. मग ती उच्चारणभेदक चिन्हे (डायाक्रिटिक) असतील

(उदा., फट्‌ मधली पायमोड, हळू मधला द्विखंड, faVade मधला c खालचा सेडिला, हीब्रू किंवा अरबी – फार्सी लिप्यांमधली स्वरचिन्हे), औपचारिक चिन्हे असतील (उदा., स्वास्तिक चिन्ह.),

संदर्भचिन्हे (रेफरन्स मार्क) असतील (उदा., पुनरूक्तिदर्शक ,, डिटो चिन्ह, तळटिपेसाठी * तारकाचिन्ह), किंवा विरामचिन्हे असतील (उदा., संस्कृतमधील वाक्यांती वा चरणांती येणारा एकेरी दंड आणि श्लोकांती येणारा दुहेरी दंड).

मराठी भाषेच्या लेखनात (आणि अर्थात मुद्रणात) आज वापरली जाणारी विरामचिन्हे (पारंपरिक दंड सोडले तर) मुख्यतः इंग्रजी लेकनातील यूरोपीय विरामचिन्हांकनावरून ⇨मेजर टॉमस कँडीच्या (१८०४-७७) पुढाकाराने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर घेतली गेली. सुरुवातीला केवळ स्वल्पविराम, अर्थविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्‌गारचिन्ह (अनुक्रमे, ; . ? !) एवढीच घेतली होती, मागाहून अपूर्णविराम, खंडविराम, अवतरणचिन्ह-जोडी, कंस-जोडी, संयोगीचिन्ह, वियोगीचिन्ह (अनुक्रमे : . . . ‘‘ ’’ ( ) - ) यांची भर पडली. शब्द वा परिच्छेद तोडण्याची पद्धतही पारंपारिक लेखनात नव्हती. (महानुभाव लेखनातील : हे ‘विसावा’ चिन्ह त्यांच्यापुरते मर्यादित राहिले.) किंबहुना यूरोपीय विरामचिन्हांकन आज केवळ भारतभर नव्हे, तर जगभर प्रसारित दिसते. त्या आधीची जगातील पारंपारिक विरामचिन्हे संस्कृत लेखनाप्रमाणे तुरळकच होती, किंवा जुन्या चिनी लेखनाप्रमाणे त्यांचा पूर्ण अभाव होता.

यूरोपीय विरामचिन्हांकनाची परंपरा

आजची यूरोपीय व्यवस्था मुख्यतः मुद्रणकला प्रस्थापित झाल्यावर आल्दो मानूत्स्यो (१४४९-१५१५) या इटालियन मुद्रकाच्या प्रयत्नामुळे स्थिर झाली. विविध यूरोपीय भाषांतून कमीअधिक फरकाने ती चालू आहे (उदा., जर्मन अवतरणचिन्हे ‘‘ ’’ ऐवजी,, ‘‘अशी असतात). सुरूवातीला , ; : . ? – एवढीच चिन्हे होती; पुढे सतराव्या शतकापर्यत! ‘‘ ’’ – यांची भर पडली. आधीच्या काळाचा विचार करावयाचा तर उत्तरकालीन अभिजात ग्रीक भाषेतील हस्तलिखिते (ग्रंथपाल बायझंटियमचा ॲरिस्टोफेनीस याचे इ. स. पू. २०० च्या सुमारचे प्रयत्न ) आणि अभिजात लॅटिन कोरीव लेख व हस्तलिखिते (सुरूवातीला शब्द, परिच्छेद तोडणे एवढेच होते, नंतर इ. स. चौथ्या शतकापासून विरामचिन्हे) इथपर्यत काही अंशी मागे जाता येते (चिन्हांचे आकार आजचेच होते असे नाही). विरामचिन्हांकनाचे नेमके कार्य काय याबद्दल मतभेद वा संभ्रम दिसून येतो.

विरामचिन्हांकन उच्चारणलक्षी (एलोक्यूशनरी) असून कानाला जाणवणारे बल, सूर आणि सीमांकन दाखवते हा एक विचार, तर याउलट ते वाक्यार्थलक्षी (सिंटॅक्टिक/लॉजिकल) असून वाक्याची व्याकरणात आणि तर्कगत मोडणी दाखवते हा दुसरा विचार.

सुरुवातीच्या इंग्लिश मुद्रित वाङ्मयात (सोळावे – सतरावे शतक) शेक्सपिअर आदींची नाटके वा हुकर आदींची धर्मप्रवचने यांत पहिला विचार स्वीकारतात, तर बेकन आदींचे वैचारिक गद्य यांत दुसरा विचार स्वीकारतात हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. दोन्ही पद्धतींमधील नाते उदाहरणांनी स्पष्ट करता येईल:

(१) Looks it not Like the King ? (शेक्सपिअर, हॅम्लेट) महाराजांसारखं तर दिसत नाही ते ? (प्रश्नचिन्हाने चढता सूर आणि प्रश्नार्थी वाक्य दाखवले जाते; म्हणजे दोन्ही विचार लागू पडतात.)

(२) To be, or not to be : that is the question : जगावं की मरावं : हाच तर सवाल आहे : (यात पहिला म्हणजे वाचिक अभिनयाचा विचार प्रबळ दिसतो. दुसरा विचार स्वीकारला, तर स्वल्पविरामाची गरज नाही व वाक्य संपल्यावर पूर्णविराम का नको असे म्हणावे लागेल. इथे विरामचिन्हे जणू काही रंगसूचनांचे काम करीत आहेत ).

(३) It is as natural to die as to be born; and to a little infant, perhaps, the one is as painful as the other. (फ्रान्सिस बेकन) जन्मणे जितके स्वाभाविक असते तितकेच मरणेही; आणि एखाद्या अर्भकाच्या दृष्टीने, कदाचित, एकाइतकेच दुसरेही क्लेशदायी आहे. [यात अर्धविरामाची योजना आणि स्वल्पविरामांची जोडी यांमागे दुसरा विचार प्रबळ आहे. पहिला विचार स्वीकारला तर अर्धविरामाऐवजी स्वल्पविराम का नको ? जोडीतला एक स्वल्पविराम (उच्चारण लक्षात घेऊन) का गाळू नये?]

नंतर अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत तर्कलक्षी विचार इतका बळावला, की स्वल्पविराम खचाखच टाकण्यात मुद्रक आणि लेखक धन्यता मानू लागले ! फाउलर बंधूंनी आपल्या द किंग्ज इंग्लिश (१९०६) पुस्तकात या अतिरेकी विरामचिन्हांकनाविरुद्ध आवाज उठवला आणि विरामचिन्हांकन अर्थ अस्पष्ट वा संदिग्ध राहू नये एवढ्यापुरतेच ठेवावे हा विचार प्रसृत केला.

(त्यांच्या विचारानुसार तिसऱ्या उदाहरणातील दोन्ही स्वल्पविराम बेलाशक गाळावे असे म्हणावे लागेल.) आजही इंग्लंयड-अमेरिकेत विरळ विरामचिन्हांकनच अधिक प्रचलित आहे. कायदेशीर दस्तएवजांत मात्र विरळ विरामचिन्हांकनाचा प्रघात पंधराव्या शतकापासून अव्याहत चालू आहे. (कदाचित संदेहला जागा ठेवणे हेच त्या क्षेत्रातल्या मंडळींना इष्ट वाटत असावे !)

मराठी लेखन-मुद्रणातील विरामचिन्हांकनाची परंपरा

मध्ययुगीन लेखनात शब्द वा परिच्छेद तोडलेले नसत. संस्कृत पद्धतीचे दंड केवळ पद्यात वापरले जात. बंगाली, गुजराती, हिंदी यांनी गद्यात वाक्यांतीचा दंड चालू ठेवला, तसे मराठीने केलेले दिसत नाही. अर्वाचीन युगात एकोणिसाव्या शतकातल्या इंग्रजीच्या अनुकरणाने जे विरामचिन्हांकन क्रमाक्रमाने रूढ झाले, ते मुख्यतः वाक्यार्थलक्षी आणि दाटपणाकडे झुकलेले असेच राहिले. क्रँडीचे उदाहरण पहावे.

(४) इतक्यांत, कोल्ही जवळ होती ती धावत आली, आणि मोठ्या करुण स्वराने, डोळ्यांत आसर्वे आणून, ती गरूड पक्षिणीची काकळूत करूं लागली.

कँडीच्या प्रेरणेने शाळांमधून विरामचिन्हांकन शिकवले जाऊ लागले. नंतर आलेल्या सहा चिन्हांचा उपयोग मराठी भाषकांनी कधी नीट समजावून घेतलाच नाही. पुढच्या काळात शाळांमधून विरामचिन्हांकन नीट शिकवले जाईना. चिन्हांची नावे किंवा त्यांचा आकारदेखील मुलांना नीट ठाऊक होत नाही. परिणामी, आज विरामचिन्हांकनाविषयी ना लेखकाला फिकीर ना प्रकाशकाला. मुद्रितशोधक साक्षेपी असलाच, तर पुष्कळदा नको इतके स्वल्पविराम पेरीत जातो. (माधव जूलियन्‌, पु. शि. रेगे असे लेखकांमधले काही सन्माननीय अपवाद.)

विरामचिन्हांचा ढोबळ विचार करायचा तर निदान एवढ्या गोष्टी पाळाव्या :

(क) वाक्याच्या शेवटी उदगार्‌चिन्ह (उत्तेजित भावना, आग्रह, उपरोध सुचवण्यासाठी), प्रश्नचिन्ह, वा पूर्णविराम असावा.

(ख) वाक्य तुटले पण पुढल्या वाक्यात र्थ तुटला नाही तर स्वल्पविराम, वियोगीचिन्ह, अर्धविराम, वा अपूर्णविराम वापरावा.

(ग) वाक्यघटक वाक्यात कमीअधिक गुंतवून घेतलेला असेल तर शून्यविराम वा स्वल्पविराम वापरावा. (शून्यविराम म्हणजे नुसती जागा सोडणे.)

(घ) वाक्यघटकाकडे विशेष लक्ष वेधण्यासाठी प्रसंगपरत्वे अवतरण चिन्ह-जोडी वा अधोरेखा (मुद्रणात जाड ठसा ) वापरावी. (कंसजोडी नको !)

(ड) सलग शब्द जोडून लिहावा. (ओळीच्या शेवटी शब्द तोडावा लागला तर संयोगीचिन्ह वापरावे.) उलट विलग शब्द तोडून लिहावा. (मात्र शब्दयोगी अव्यये आणि च, ही सारखी अवधानसूचके सामान्यतः जोडून लिहावी. हिंदीप्रमाणे ती तोडून लिहू नयेत.)

(च) जोडलेले शब्द जोडून लिहावे वा संयोगीचिन्हाने जोडावे. (उदा., मतभेद, लिहिणे-वाचणे.)

(छ) गद्यामध्ये सलग वाक्यसमूह एकापुढे एक लिहावा. मात्र संवादलेखनातील वक्त्याचा बदल, वर्णनातील किंवा प्रतिपादनातील मुद्याचा बदल यामुळे सलगता राहिली नसेल तर परिच्छेद तोडावा. (तसे करताना सामान्यतः सुरूवातीला थोडी जागा सोडून परिच्छेदाला सुरुवात करावी.)

हे सर्व नियम पाळताना अर्थामध्ये संदेह किंवा विपर्यास होणारे नाही याची विशेष काळजी घ्यावी.

(५) भिंतीवर कृष्ण आणि राधा आणि राम यांच्या तसबिरी होत्या. (दोन तसबिरी की तीन हा संदेह टाळण्यासाठी अनुक्रमे एक किंवा दोन स्वल्पविराम टाकावे.)

(६) मी चोरी करणार नाही. केली तर शिक्षा करा. (अनवधानाने पूर्णविराम ‘नाही’ शब्दाच्या अगोदर पडला तर अर्थाचा विपर्यास होईल.)

(७) घर या पदार्थाला ‘घर’ म्हणतात तर ‘घर’ या पदाला ‘‘ घर ’’ म्हणतात. (सूक्ष्म अर्थभेद आहे.)

(८) चोखामळा तत्कालीन समजुतीप्रमाणे ‘अस्पृश्य’ होते. (अवतरणचिन्ह-जोडी गाळल्यास लेखकाची समजूतही तशीच असावी असा संदेह होईल.)

विरामचिन्हांकनाचा सूक्ष्म विचार करायचा तर पर्यायी चिन्हांचे बलाबल (उदा., नियम ख आणि ग प्रमाणे योग्य चिन्हाची निवड करताना) विचारात घ्यावे लागेल.

(९) घोळक्याने उभे राहू नका, रहदारीला अडथळा होतो. (अर्थाची सर्वांत निकट सांधेजोड स्वल्पविरामाने सूचित.)

वाक्य चालू असतानाच मध्येच सलगता तुटली तर शून्यविराम, स्वल्पविराम-जोडी, वियोगीचिन्ह-जोडी, वा कंस-जोडी वापरावी.

(१०) त्याचं वागणं मला तरी-तुमचं मत ठाऊक नाही – अजिबात आवडलेलं नाही. (पुन्हा पर्यायी चिन्हांच्या बलाबलाचा विचार आला.)

असा बलाबलाचा सूक्ष्म विचार करताना विरामचिन्हांकन एकंदरीने उच्चारणलक्षी ठेवायचे, की वाक्यर्थलक्षी ठेवायचे हाही विचार करावा लागेल. (उदाहरणे १ ते ३ व त्यावरची चर्चा इंग्रजीप्रमाणे मराठीलाही लागू पडेल.)

मराठी लेखनात किंवा मुद्रणात अक्षराचे वळण आणि शुद्धलेखन यांच्या इतकेच विरामचिन्हांकनाकडे लक्ष देणे अगत्याचे आहे.

 

पहा: लेखनविद्या.

संदर्भ : 1. Carey, G. V. Mind the Stop, Rev. Ed., London, 1958; Reissued 1976.

2. Husband, T. F.; Husband, M. F. A. Punctuation : Its Principles and Practice, London, 1905.

3. Partridge, E. H. You have a point There : A Guide to Punctuation and its Allies, London,1953; Reissued 1978.

४. कँडी, टॉमस, विरामचिन्हांची परिभाषा, पुणे, १८५० (पुनर्मुद्रण, मराठी संशोधन पत्रिका, जुलै, १९५७; भाषा आणि जीवन, उन्हाळा, १९९०).

५. केळकर, अशोक रा. ‘‘मराठी लेखनातील विरामचिन्हांचा उपयोग’’,भाषा आणि जीवन, दिवाळी अंक, १९८९ (संस्कारित पुनर्मुद्रण, मध्यमा :भाषा आणि भाषाव्यवहार, पुणे, १९९६).

- केळकर, अशोक रा.

माहिती स्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate