भाषा आणि जीवन यांचा अन्योन्यसंबंध असतो. भाषेमुळे माणसे एक-दुसऱ्याच्या जवळ येतात, त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होतो. भाषेमुळे मुख्यत: आपल्या मनातील भाव-भावना, विचार प्रकट करता येतात. माणसाचा एकंदर दैनंदिन व संपूर्ण जीवनव्यवहार सुकर आणि सुलभ होण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. भाषेचे जीवनातील हे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही; कारण प्रत् येकाला काही मर्यादेपर्यंत आपल्या भाषेविषयी प्रेम असतेच.
हे प्रेम आणि तिच्याबद्दलचा स्वाभिमान सार्थ होण्यासाठी प्रत्येकास आपल्या भाषेची लिपी, तिचे उच्चार, लेखन यासंबंधीचे किमान प्राथमिक स्वरू पाचे तरी ज्ञान असले पाहिजे. हे ज्ञान नसेल, तर भाषेतील शब्दांचे उच्चारण व लेखन यात चुका होतात. दुर्दैवाने अनेकांच्या लेखनात अशा भाषिक चुका होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
ज्यांची मातृभाषा म राठी आहे, असे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षित पालक यांच्याकडून झालेल्या शुद्धलेखनाच्या चुका संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या, तर "आम्ही काही मराठीचे तज्ज्ञ वाजाणकार नाही,' असे बोलून ते हात झटकून मोकळे होतात. शुद्ध बोलणे, लिहिणे ही आपली जबाबदारी नाही, असेच जणू त्यांना वाटत असते.
मराठी भाषेचे पदवीधर आणि द्विपदवीधर यांच्याकडूनसुद्धा अशा भाषिक चुका होतात, तेव्हा माझ्यासारख्या मराठीप्रेमी माणसाला चिंता वाटते. प्रौढ, शिक्षित, पदवीधर यांच्याकडून होणाऱ्या भाषिक चुकांच्या कारणांचा शोध घेतला असता, असे आढळून आले, की शालेय स्तरावर भाषेचे शिक्षण पुरेसे आणि नीट झालेले नाही, त्यामुळे मोठेपणी त्या चुका तशाच राहून जातात.
या चुका ज्या त्या वेळी सुधारून घेण्याची प्रक्रिया घडली नाही, हे याचे महत्त्वाचे कारण आहे. प्रौढपणी या चुका सुधारणे कठीण असले, तरी ते अजिबात शक्य नाही, असे मात्र नाही. मुळात मराठी भाषेच्या संदर्भात काही अडचणी आहेत. मराठी लिपी, तिचे उच्चारण, लेखन,लेखनविषयक प्रचलित नियम इत्यादींबाबत मूलभूत स्वरूपाचे संशोधन होऊन सुधारणा करण्याची गरज आहे. वर्णमालेच्या संदर्भात सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे.
मराठीत किती स्वर आहेत, किती व्यंजने आहेत, हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. संस्कृत भाषेतील स्वरांची संख्या जास्त आहे. 1960 पूर्वी संस्कृतमधील बहुतेक सर्व स्वर शिकवले जात असत.
1962 साली महाराष्ट्र शासनाने मराठीची वर्णमाला निश्चित करून दिली. त्या वेळी मराठी भाषेत न वापरले जाणारे स्वर वगळण्यात आले. 16 स्वरांपैकी मराठीत 13 स्वर मराठी वर्णमालेत राहिले. "ऋ'च्या पुढचे तीन स्वर वगळले गेले. या वर्णम ालेत " ङ् ' आणि "ञ्' ही दोन अनुनासिके आहेत. ङ् हे अनुनासिक "वाङ्मय'सारख्या अपवादात्मक शब्दात वापरले जाते, तर "ञ्' हे अनुनासिक मराठीत वापरले जात नाही.
व्याकरणात नञ् तत्पुरुष समास आहे. त्याचा उच्चार कसा करायचा हेही अनेकांना माहीत नाही. नञ् तत्पुरुष समास या शब्दाचा नत्र तत्पुरुष समास असा उच्चार करताना मी ऐकले आहे. मराठी वर्णमालेसंदर्भात मी प्रातिनिधिक स् वरूपात काहींची मते मागवली होती, त्यात ञ हे अनुनासिक वर्णमालेतून वगळावे, असे अनेकांनी सुचवले आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. भाषावार प्रांतरचनेनुसार महारष्ट्र हे मराठीभाषकांचे राज्य झाले. मराठी ही राज्य कारभाराची भाषा ठरली. शासकीय, निमशासकीय, खासगी व स्थानिक स् वराज्य संस्था इत्यादी सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्याचा निर्धार तत्कालीन शासनाने केला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि योजनाबद्धरीत्या काही महत्त्वाची पावले उचलली. भाषा संचालनालय, भाषा सल्लागार मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ या संस्थांची स्थापना करून त्यांद्वारे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केला.
मराठीचा वापर सर्व ठिकाणी केला जावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने 1962 साली आदेश काढून देवनागरी मराठी लिपीला मान्यता दिली आणि त्याच आदेशात मराठीची वर्णमाला आणि जोडाक्षरलेखनाची पद्धतही ठरवून दिली. 1964 सालच्या राजभाषा अधिनियमाद्वारे मराठी देवनागरी लिपीला मान्यता दिली. अखिल भारतीय सा हित्य महामंडळाकडून लेखनविषयक नियम तयार करून घेतले. तेच 18 नियम गेल्या चार दशकांहून अधिक काळ वापरात आहेत. 1966 साली आणखी एक आदेश काढून शासनाने ल, ख, श या तीन अक्षरांच्या लेखनातील बदल स्पष्ट केले.
ल ऐवजी , रव ऐवजी ख आणि श ऐवजी असे ते बदल होते. आता 40-45 वर्षांनंतर राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शासनाने 6 नोव्हेंबर 2009 रोजी एक आदेश काढला असून, त्यात ल आणि श ही अक्षरे पूर्वीप्रमाणे , अशीच वापरावीत, असे म्हटले आहे. नवी वर्णमाला निश्चित करताना स्वरांमध्ये ऋ ऐवजी असा बदल करून , ऍ, ऑ या स्वरांची नव्याने भर घातली आहे.
वर्णक्रमात "ऊ' नंतर , आणि "ए' नंतर ऍ , "ओ' नंतर "ऑ ' हे स्वर दाखवले आहेत. ऍ आणि ऑ या स्वरांचा समावेश वर्णमालेत झाला, हे योग्यच आहे; परंतु देवनागरी लिपी 1964 च्या राजभाषा अधिनियमानुसार मान्य झाली आहे, त्या वर्णमालेत शासन-आदेश काढून बदल करता येईल का, हे तपासून पाहण्याची गरज आहे. जोडाक्षरांच्या लेखनाबाबतही गोंधळाची स्थिती आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ जी मराठी लिपी, वर्णमाला व जे जोडाक्षरलेखन अस्तित्वात आहे, ते सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक यांच्या अंगवळणी पडलेले आहे. दि. 6 नोव्हेंबर, 2009 ला नवीन शासननिर्णय काढून शासनाने जोडाक्षरलेखनाची 50 वर्षांपूर्वीची जुनी पद्धत सुचविली आहे, त्यामुळे ही पद्धत अवलंबण्यात अनेक अडचणी आहेत.
(अ) शेवटी दंड असणारी अक्षरे ः ख, ग, घ, च, ज, झ, ण, त, थ, ध, न, प, ब, भ, म, य, व, श, ष, स या अक्षरांतील शेवटी येणारे दंड काढून ते अक्षर इतर कोणत्याही अक्षराला जोडता येते. ही जोडाक्षरलेखनाची पूर्वीचीच पद्धत यापुढेही अमलात आणायची आहे; मात्र या वर्गातील त या व्यंजनाच्या बाबतीत त्+त याचे जोडाक्षर करताना "त्त' असे न लिहिता जुन्या पद्धतीने त्त असेच लेखन करावे, असे सुचवले आहे. वास्तविक "त'चा दंड काढून दुसरे "त' जोडणे व "त्त' असे लिहिणे सोपे होते. यात एक त अर्धे असून "त'ला "त' जोडले आहे, हे सहज लक्षात येण्यासारखे होते. "त्त' या जोडाक्षरात
"त'चे अर्धे रूप दिसतच नाही.
(आ ) क आणि फ ही दोन मध्यभागी दंड असणारी अक्षरे आहेत. यांची जोडाक्षरे पूर्वीप्रमाणेच करायची आहेत. म्हणजे जोडाक्षरात क, फ ही अक्षरे आधी आल्यास क् आणि असे लिहून जोडाक्षरे होतात. क् + त यांचे जोडाक्षर करताना क्त किंवा असा पर्याय दिला आहे. वास्तविक क आणि त यांचे जोडाक्षर असे लिहिणे चुकीचे आहे. यात क आणि त यांची रूपे दिसत नाहीत. क्त मध्ये क अर्धे असून "त'ला जोडल्याचे स्पष्ट दिसते. तसे च्या बाबतीत असे दिसत नाही.
(इ) छ, ट, ठ, ड, ढ, द, ल, ह, ळ ही सर्व अक्षरे शीर्षदंड असणारी आहेत. या अक्षरांच्या जोडाक्षरलेखनात खूपच विविधता आहे. संस्कृतमध्ये या अक्षरांची उभी जोडणी करून म्हणजे अक्षरे एकाखाली एक जोडून जोडाक्षरे तयार केली जातात. 1962 च्या शासननिर्णयानुसार मराठीमध्ये ही अक्षरे एकापुढे एक ठेवून जोडाक्षरलेखनाची पद्धत स्वीकारण्यात आली होती; परंतु या नव्या शासन-आदेशात वरील अक्षरांची उभी जोडणी करून जोडाक्षर करण्यात यावे, असे म्हटले आहे. उदाहरणार्थ ः ट्ट, ठ्ठ, ड्ड, ढ्ढ, द्द, द्ध, द्व, ट्व ही अक्षरे आता ट्ट, ठ्ठ, ड्ड, ढ्ढ, द्द, द्ध, द्व, ट्व अशी लिहायची आहेत. ट, ठ, ड, ढ, ह या अक्षरांना "य' जोडायचे असल्यास पाऊण य ( य) जोडून लिहायचे आहे, मात्र याच गटातील ळ अक्षराला य जोडताना ळ चा शीर्षदंड काढायला सांगितले आहे. ते चुकीचे आहे. "द' अक्षराला य जोडताना त्याचे लेखन द्य असे न करता द्य असे करायला सांगितले आहे. "द्य'मध्ये द आणि य यांची रूपे दिसत नाहीत; पण द्य मध्ये द आणि य यांचे जोडाक्षर स्पष्ट दिसते; म्हणून द्य हे लेखन बरोबर आहे. द् + म याचे लेखन द्म असे करावे, की द्म असे करावे याबाबतचा संभ्रम दूर केलेला नाही.
( ई ) "र' हे दंड नसलेले एकमेव अक्षर आहे. "र'ची जोडाक्षरे पूर्वीप्रमाणेच चार प्रकारे करायची आहेत. (1) र् + व = र्व, पर्वत (2) र् + ह = ऱ्ह, वऱ्हाड (3) प् + र = प्र, प्रकाश (4) ट् + र = ट्र, राष्ट्र द या अक्षराला र जोडताना द्र असे पूर्वीप्रमाणेच लिहायचे आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 1 मे 2010 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. 50 वर्षांच्या कालखंडात मराठी भाषा, लिपी व लेखनाच्या संदर्भात राज्य शासनाने 1962, 1966 व 2009 असे तीनदा शासन -आदेश काढले. पहिल्या दोन आदेशांनंतर त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी व मराठीच्या लेखनात एकरूपता आणण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्यातून गेल्या 40-45 वर्षांत थोडेफार लेखन रुळले आहे. असे असताना पूर्वीचे आदेश अधिक्रमित करून आता 2009 साली तिसरा शासन-आदेश प्रसृत करण्यात आला आहे.
या आदेशात बदल करून पूर्वीचे लेखन आणि नवीन लेखन यांना पर्याय द्यावा, त्याम ुळे लेखनातील गोंधळ टाळता येणे शक्य होईल. सन 2010 साली महाराष्ट्र शासनाने न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा सल्लागार मंडळाची स्थापना केली.
मराठी भाषेविषयी काम करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे कार्य अधिक सक्षमतेने होण्यासाठी हा प्रयत्न चांगला होता; मात्र चपळगावकर यांनी या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने शासनस्तरावर चाललेल्या कामाला खीळ बसली आहे. या कामाला गती मिळण्यासाठी मराठी भाषातज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, भाषाभ्यासक यांची मदत घेऊन वरील शासन-निर्णयात सुधारणा करता येणे शक्य आहे. सामान्य नागरिकांनीही केवळ भाषाप्रेम व्यक्त न करता भाषा जाणून घेऊन तिचा योग्य वापर करावा, म्हणजे मराठीची चिंता करण्याची वेळ आपणावर येणार नाही.
- माधव राजगुरू (author@esakal.com)
अंतिम सुधारित : 8/3/2020