कोडगू भाषा ही कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला असलेल्या कूर्ग या जिल्ह्याची भाषा असून, ती द्राविडी भाषासमूहातील आहे. तिचे प्रचारातील नाव ‘कोडवु’ हे आहे. तिच्या आजूबाजूच्या द्राविडी भाषांचा विशेषतः कन्नडचा, बराच प्रभाव तिच्यावर पडला आहे. काही नाटके, लोककथा आणि लोकगीते सोडल्यास या भाषेत विशेष साहित्य नाही. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात ७९,१७२ कोडगू भाषिक होते. त्यांपैकी ७८,००२ कर्नाटक राज्यात असून बाकीचे तमिळनाडू, महाराष्ट्र इ. राज्यात होते.
अ, आ, इ, उ, ए, अॅ, ओ.स्वर ऱ्हस्व, दीर्घ किंवा अनुनासिक असतात.
क, ग, च, ज, ट, ड, ण, त, द, न, प, ब, भ, य, र, ल, ळ, व, श, स.
नामात पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग असा भेद आहे. नपुंसकलिंगाला स्वतंत्र अनेकवचन नाही. कार्यानुसार त्यांना विभक्तिप्रत्यय लागतात. विभक्ती सात आहेत : प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्ठी, सप्तमी, व संबोधन.
सर्वनामात प्र.पु. नानु-नाङ्गा; द्वि, पु.नीनु-निङ्गा; तृ.पु. (दूर) पु. आवों, स्त्री, आवा, न. आदु; सर्वांचे अ.व. आयङ्गा किंवा आवु; (समीप) इवों, इवा, इदु; अ.व. पु. स्त्री. अ, व, पु, स्त्री, इय्ङ्गा किंवा इवु, न. इदु.
कोडगूतील विशेषणे विकाररहित आहेत.
क्रियापदांत धातूंना प्रथम कालवाचक प्रत्यय व शेवटी पुरुष व वचनदर्शक प्रत्यय लागतो. आज्ञार्थाचा प्रत्यय एकवचनात शून्य व अनेकवचनात रि किंवा इ आहे. महत्त्वाचे काळ वर्तमान, भविष्य व भूत हे आहेत.
काही वाक्ये : आदु ओरू मानॅ ‘हे घर आहे’. आवों मानेलु उंडु ‘तो घरात आहे’. कुदुरेकु नाSलु काSउंडी ‘घोड्याला चार पाय असतात’. कुदुरेन काSलु ‘घोड्याचे पाय’.
लेखक : ना.गो.कालेलकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/24/2020