एकोणिसावे शतक (१७९८–१८३७) : हा इंग्रजी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड. त्याची सुरुवात विल्यम वर्ड्स्वर्थ (१७७०–१८५०) व सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२–१८३४) यांच्या लिरिकल बॅलड्स ह्या १७९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाने झाली आणि १८३७ मध्ये राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या गादीवर आली तेव्हा हे युग संपले, असे मानण्यात येते. सर्व ललित कलांच्या विकासात दोन ठळक व बऱ्याचशा परस्परविरोधी अशा प्रवृत्ती दिसून आल्या आहेत. स्वच्छंदतावाद व अभिजाततावाद या नावाने ह्या दोन प्रवृत्तीं ओळखल्या जातात. या प्रवृत्तींमधील फरक साहित्याच्या संदर्भात स्थूल मानाने असा सांगता येईल, की अभिजाततावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा समाजाचा प्रतिनिधी असतो आणि एका विशिष्ट अशा सुसंस्कृत, एकजिनसी वाचकवर्गासाठी लिहीत असतो. सर्वसामान्यतेवर भर, संयम, आदर्शानुसारी नियमबद्धता ही त्याची वैशिष्ट्ये. उलटपक्षी स्वच्छंदतावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा कोणाचाही प्रतिनिधी नसतो आणि तो विशिष्ट वाचकवर्गासाठी लिहीत नसतो. तो स्वत:चाच प्रतिनिधी असतो आणि त्याच्या अंत:करणातल्या घडामोडी, जीवनासंबंधीच्या आणि जगासंबंधीच्या त्याच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ह्याच त्याच्या काव्याचा विषय असतात. भावनांची उत्कटता, संवेदनेची तीव्रता, वैशिष्ट्यदर्शक घटकांवर आणि वेगळेपणावर भर ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये.
इंग्रजी वाङ्मयात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा ठळक आविष्कार दोनदा झाला. सोळाव्या शतकातील प्रबोधनाच्या युगात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस. म्हणूनच या दुसऱ्या आविष्कारास स्वच्छंदतेचे पुनरुज्जीवन असे म्हणतात. या युगाने नवअभिजात युगातील सांकेतिक सौंदर्यकल्पनांविरुद्ध बंड केले.
इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाच्या खाणाखुणा अठराव्या शतकातच दिसू लागल्या होत्या. अठराव्या शतकातील टॉमसनसारख्या कवीचे निसर्गकाव्य, हॉरिस वॉल्पोलच्या गूढ व भीतिदायक वातावरण निर्मिणाऱ्या कादंबऱ्या, बर्न्स, ब्लेक, चॅटरटन इत्यादींचे काव्य, बर्कने अंत:प्रेरणांना दिलेले महत्त्व या अशा काही खुणा होत.
अठराव्या शतकाच्या शेवटीशेवटी इंग्लंडमध्ये स्वच्छंदतावादाचा उदय झाला, ह्याला नवअभिजाततावादातील साचेबंदपणा, सांकेतिकता, तोच-तोपणा हे जसे कारण, तशी आणखीही कारणे होती. अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी आपण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अस्तित्वात आली. ह्या घटनेमुळे इंग्लंडमधल्या व्यापारी कारखानदारांची एक हुकमी बाजारपेठ तर गेलीच; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी, की इंग्लंडमधल्या राजसत्तेला आणि सरंजामदारी वर्चस्वाला मोठा धक्का बसला. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि परिणामत: यूरोपमधील एक बलाढ्य राजसत्ता कोसळली. ह्या क्रांतीमागे राजकीय आणि आर्थिक कारणे होती, तशीच समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या विचारांची प्रेरणाही होती. हादेखील परंपरागत समाजव्यवस्थेला मोठा धक्का होता. इंग्लंडच्या कारखान्यात वाफेची एंजिने बसविण्यात आली तेव्हा उत्पादनाचा वेग वाढला, कारखाने वाढले, शहरांची लोकसंख्या वाढली, कामगारांची संख्या वाढली आणि औद्योगिक कामागारांचा नवा मोठा शोषित वर्ग अस्तित्वात आला. ह्या सर्व घटनांचा संकलित परिणाम म्हणजे सर्वच क्षेत्रांतील अभिजात आदर्शांना आणि व्यवहारवादी विचारप्रणालींना हादरा बसला. राजा आणि प्रजा, शास्ते आणि शासित, व्यक्ती आणि समाज, स्त्री आणि पुरुष ह्यांचे परस्परसंबंध आणि अधिकार तसेच कला-साहित्याची प्रेरणा आणि हेतू ह्या सर्वच प्रश्नांसंबंधी नव्याने विचार सुरू झाला.
मानवी जीवन घडविण्यात निसर्गाचे महत्त्वाचे स्थान आहे. गूढ, अनाकलनीय अनुभवांना व विविध मानसिक अवस्थांना कलादृष्ट्याही महत्त्व आहे. मानवी मनाचे स्वातंत्र्य मुळातच अनिर्बंध आहे व असले पाहिजे, अशा तऱ्हेच्या नव्या जाणिवा इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाचे स्वरूप स्पष्ट करतात.
बालकाच्या निष्पाप व निरागस भावनेतून पाहिल्यास नित्य परिचयाच्या गोष्टी व अनुभव काही वेगळेच दिसतात व त्यांचे अलौकिक स्वरूप कळते, असे वर्ड्स्वर्थने म्हटले. निरागस बाल्यावस्थेच्या तुलनेने प्रौढावस्थेचे आणि चारित्र्य व मन घडविणाऱ्या गोष्टींचे महत्त्व कमी झाले.
वेगळेपण हे स्वच्छंदतावादाचे एक लक्षण असल्यामुळे पुष्कळदा स्वच्छंदतावादी कवी किंवा लेखक नित्याच्या परिचयाचे समकालीन जीवन, वातावरण किंवा अनुभवविश्व ह्यांविषयी लिहिण्याऐवजी स्थलदृष्ट्या किंवा कालदृष्ट्या दूरस्थ जीवनाविषयी लिहितात. इंग्लंडमधील काही स्वच्छंदतावाद्यांना प्राचीन व मध्ययुगीन जीवनातील अनुभवांचे विशेष आकर्षण वाटले. उदा., वॉल्टर स्कॉटच्या (१७७१–१८३२) ऐतिहासिक कादंबऱ्या, जॉन कीट्सचे (१७९५–१८२१) ग्रीक संस्कृतीबद्दलचे प्रेम.
या काळातील सर्वच साहित्यिक निखळ स्वच्छंदतावादी होते, असे नाही, उदा., लॉर्ड वायरन (१७८८–१८२४) व जेन ऑस्टेन (१७७५—१८१७) ह्या कालखंडातील असूनही त्यांच्या लेखनाचे स्वरूप अभिजाततावादाला अधिक जवळचे आहे.
काव्य : स्वच्छंदतावादी कवींच्या दोन पिढ्या आहेत : वर्ड्स्वर्थ, कोलरिज व रॉबर्ट साउदी (१७७४–१८४३) हे पहिल्या पिढीतील. बायरन, पर्सी बिश शेली (१७९२–१८२२) व जॉन कीट्स हे दुसऱ्या पिढीतील.
पहिल्या पिढीतील कवी इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ह्या विभागात राहिलेले. फ्रेंच राज्यक्रांतीने तिघेही सुरुवातीस प्रभावित झाले होते; पण क्रांतीनंतर अत्याचारादी ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे तिघांचाही भ्रमनिरास झाला तथापि स्वातंत्र्य, समतादी तत्त्वांसंबंधीची त्यांची निष्ठा ढळली नाही आणि त्यांच्यात समाजाविरुद्ध बंडखोरीही आली नाही. नेहमीचेच जीवन चिंतनाने आणि सहानुभूतीने अधिक शुद्ध आणि गहिरे करावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या काव्याचे विषय मानव व निसर्ग यांचे संबंध, शैशवावस्थेचे जीवनातील स्थान व सामान्य माणसांच्या जीवनातील अनुभव हे होते. साध्या विषयातील अद्भुतता दाखविण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्वच होते. त्यांच्या काव्यात चिंतनशील वृत्तीचा परिपोष झाला आहे. ह्या कवींनी काव्याची भाषा व वृत्तरचना ह्यांत परिवर्तन घडवून आणले. अतिशय प्रभावी प्रतीके त्यांच्या काव्यात आढळतात.
निसर्गासंबंधी अत्यंत उत्कटतेची आणि तादात्म्याची भावना, निसर्गवर्णनांतून वेगवेगळ्या मनोवस्थांची निर्मिती, संवेदनक्षमतेबरोबरच चिंतनशीलता ह्या सर्वांच्या द्वारा नित्याच्या अनुभवांतून आणि सामान्य व्यक्तींच्या जीवनातून व्यक्तिमानसाचे उन्नयन करणे, त्याला एक विशाल अनुभूती देणे, त्याच्या ठिकाणी एक गूढ आध्यात्मिक भाव निर्माण करणे, ही वर्ड्स्वर्थच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतील.
वर्ड्स्वर्थशी तुलना करता कोलरिजचे मन अधिक विश्लेषणपर, तत्त्वचिंतनपर आणि मूलग्राही होते. त्याच्याही काव्यात भावनांची उत्कटता आणि संवेदनशीलता आहे, तोही निसर्गदृश्यांतून विविध मनोवस्था निर्माण करतो, एक अलौकिक सृष्टी निर्माण करून वाचकाला तो एका वेगळ्या विश्वात नेतो. कुशाग्र बौद्धिकता आणि उत्कट भावनात्मकता ही कोलरिजच्या काव्यात एकवटली आहेत.
साउदी हा वर्ड्स्वर्थ आणि कोलरिज यांच्या सहवासात राहिला तो राजकवीही झाला. पण त्याच्या काव्यात प्रतिभेचा जोम किंवा जिवंतपणा नाही. त्याच्या काही छोट्याछोट्या कविता मात्र चांगल्या आहेत.
कवी म्हणून वॉल्टर स्कॉटचीही ह्याच पिढीत गणना करावी लागले; कारण त्याच्या कविता बहुतेक १८१४ पर्यंत लिहिल्या गेल्या होत्या. तात्त्विकदृष्ट्या त्याचा कोलरिज किंवा वर्ड्स्वर्थशी संबंध नसला, तरी भावनात्मकता, कल्पनाविलास, भूतकालीन जीवनाविषयी आकर्षण, निसर्गाविषयी प्रेम इ. स्वच्छंदतावादी काव्याची वैशिष्ट्ये त्याच्या कवितांत आहेत.
बायरन, शेली व कीट्स फ्रेंच राज्यक्रांतीच्या हत्याकांडाच्या वेळी शैशवावस्थेत होते. त्यामुळे वर्ड्स्वर्थ, कोलरिज वगैरे कवींसारखा त्यांचा भम्रनिरास झाला नाही. नव-अभिजात वाङ्मयीन परंपरेचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यामुळे त्यांच्या काव्यात-विशेषत: शेली व कीट्सच्या-स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा मुक्त विकास झाला; पण त्यांचा स्वच्छंदतावाद वेगळा आहे आणि त्यांचे व त्यांच्यापैकी प्रत्येकाचे वेगळेपण विशेष नजरेत भरण्यासारखे आहे. आणखी योगायोग म्हणजे तिघांनाही वेगवेगळ्या कारणांनी इंग्लंडबाहेर जावे लागले व तिघांनाही इंग्लंडबाहेर आयुष्याच्या ऐन उमेदीतच मृत्यू आला.
१८१५ पर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या होत्या. फ्रान्समधील राज्यक्रांती संपलीच होती; पण नंतर फ्रान्समध्ये सर्वसत्ताधीश होऊन सबंध यूरोप पादाक्रांत करणाऱ्या नेपोलियनचाही इंग्लंडने पराभव केला होता आणि त्याला हद्दपार केले होते. इंग्लंडमध्ये आणि यूरोपमध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित झाली होती. इंग्लंडचा प्रभाव सर्वत्र वाढला होता आणि त्याच्या वैभवाचा मार्ग निर्विघ्न झाला होता; पण खुद्द इंग्लंडात अंतर्गत असंतोष धुमसू लागला होता. फ्रान्सशी झालेल्या युद्धामुळे व्यापारी आणि जमीनदार गबर झाले होते. गरीब जनतेची आणि कामगारांची अवस्था मात्र फारच वाईट झाली होती. बकाल आणि घाणेरड्या वस्त्या वाढल्या होत्या. अन्न महागले होते. कामगारांची निर्घृण पिळवणूक चालली होती. धार्मिक मतभेद तीव्र होत चालले होते. सामान्य जनता मताधिकाराची मागणी करीत होती. सगळी प्रचलित व्यवस्था मोडून काढल्याखेरीज माणूस सुखी होणार नाही, असे विचारी आणि संवेदनशील लोकांना वाटू लागले होते. ह्या पार्श्वभूमीवर बायरन, शेली आणि कीट्स ह्यांची प्रस्थापित समाजाविरुद्ध बंडखोरीची कविता निर्माण झाली.
बायरनच्या वृत्तीतील सामाजिक, राजकीय आणि नैतिक बंडखोरी स्वच्छंदतावादाला जवळ आहे; पण त्याची काव्यरचना, वृत्तांची निवड, काव्यप्रकार हे नवअभिजाततावादाला अधिक जवळ आहेत. वर्ड्स्वर्थ वगैरे कवींचा त्याने उपहास केलेला आहे. पोपला तो सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी मानतो. शेलीच्या काव्यात उत्तुंग कल्पनाविलास, प्रतिभेची भरारी, विलक्षण तरलता, सर्व प्रकारच्या बंधनांविरुद्ध बंडखोरी, तसेच विशाल सहानुभूती आणि व्यापक मानवतावादाची भावना आहे.
संवेदनानुभवाचा आनंद उपभोगणे, मध्ययुगीन आणि प्राचीन ग्रीक वस्तू आणि विषय ह्यांबद्दल ओढ, इंद्रियसंवेद्य अनुभवांतून निर्माण होणाऱ्या भावना आणि भावावस्था व त्यांच्या साहाय्याने सौंदर्याचा आणि सौंदर्याच्या द्वारा चिरंतन सत्याचा साक्षात्कार घडविणे, ही कीट्सच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील. त्याचीही विचारसरणी स्वातंत्र्यवादी आणि सुधारणावादी आहे.
दोन्ही पिढ्यांतील कवींनी विविध वृत्तांत दीर्घकाव्ये रचिली. उदा., वर्ड्स्वर्थचे (द प्रिल्यूड १८०५, प्रकाशित, १८५०), कोलरिजचे द एन्शंट मरिनर, (लिरिकल बॅलड्समध्ये १७९८ मध्ये प्रसिद्ध), बायरनची चाइल्ड हॅरल्ड्स पिल्ग्रिमेज (४ सर्ग, १८१२–१८१८) व डॉन जूअन (१६ सर्ग, १८१९–१८२४) ही काव्ये आणि जॉन कीट्सची ईव्ह ऑफ सेंट अॅग्नेस (१८१९) आणि एंडिमीयन (१८१८) ही काव्ये तसेच शेलीचे अॅडोनिस (१८२१). यांखेरीज ह्या सर्व कवींनी स्फुट भावकविता, सुनीते व उद्देशिका लिहिल्या. स्वच्छंदतावादी काव्याने अठराव्या शतकातील नवअभिजात काव्याची नावनिशाणी जवळजवळ पुसून टाकली.
गद्य : नव-अभिजात युगातील गद्य साधे, सोपे, सुटसुटीत व अर्थवाही होते. त्यात बेबंद कल्पनाशक्तीला स्थान नव्हते. या युगात मात्र गद्याची धाटणी काव्यात्म झाली. प्रत्येकाने स्वत:ची गद्यशैली निर्माण केली. गद्यात प्रतिभाविलासाला अवसर मिळाला. असे असूनही हे गद्य अर्थवाहीच राहील ह्याची शक्य तेवढी काळजी घेतली गेली. त्यामुळे काव्यमय भाषेत असावी तेवढी सहजता या गद्यात आली.
निबंध, कादंबरी व समीक्षा हे या युगातले भरघोस विस्तारलेले गद्यप्रकार. निबंधलेखनाला इंग्रजीमध्ये बेकनपासूनच सुरुवात झाली होती; पण त्याचे निबंध गंभीर, विषयविवेचनपर, उपदेशपर असत. अॅडिसन, स्टील, जॉन्सन, गोल्डस्मिथ ह्यांच्या निबंधांतील सौम्य उपहास, खेळकर विनोद, काही प्रमाणातील आत्मनिष्ठ दृष्टिकोण ह्यांमुळे अठराव्या शतकातच इंग्रजी निबंधाचे स्वरूप बदलू लागले होते. त्यातूनच एकोणिसाव्या शतकाच्या स्वच्छंदतावादी वातावरणात निबंधाचा एक स्वतंत्र प्रकार अस्तित्वात आला. हाच ललित निबंध.
या युगातील श्रेष्ठ ललित निबंधकार चार्ल्स लँब (१७७५–१८३४) हा होय. त्याच्या निबंधांतील कलात्मकता, उत्स्फूर्त आत्मनिवेदन आणि अनौपचारिकतेचा आभास हे गुण लक्षणीय आहेत. टॉमस डे क्विन्सी (१७८५–१८५९), विल्यम हॅझ्लिट (१७७८–१८३०), ली हंट (१७८४–१८५९) व वॉल्टर सॅव्हिज लँडॉर (१७७५–१८६४) हे आणखी काही प्रसिद्ध निबंधकार.
स्वच्छंदतावादी युगात कादंबरीच्या विकासाचे दुसरे पर्व सुरू झाले. नव-अभिजात युगात कादंबरी हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार म्हणून विकसित झाला. तिचे एक तंत्र निर्माण झाले. व्यक्तिरेखाटन, रचना, कथनपद्धती वगैरे तिच्या अंगोपांगांमध्ये विविधता आली. ही कादंबरी वास्तवादी व बोधपर होती. अठराव्या शतकात हॉरिस वॉल्पोलने कादंबरीला स्वच्छंदतेची दिशा दाखविली होती.
या युगातील कादंबरीकारांनी कादंबरीला जास्त कलात्मक स्वरूप प्राप्त करून दिले. यात प्रमुख वाटा वॉल्टर स्कॉटचा. त्याने ऐतिहासिक कादंबरी हा कादंबरीचा एक प्रकार निर्माण केला. त्याच्या कादंबऱ्या सर्वच ठिकाणी ऐतिहासिक सत्याला धरून लिहिलेल्या नसल्या आणि त्यांत इतरही काही दोष असले, तरी पात्रे, प्रसंग आणि स्थळे ह्यांच्या चित्रणात जिवंतपणा आहे आणि त्यांत स्वच्छंदतावादाची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भूतकाळाची कल्पनेच्या साहाय्याने केलेली जिवंत पुननिर्मिती, वाचकाला वर्तमानातून भूतकाळात नेण्याची शक्ती, निसर्गदृश्यांचे जिवंत चित्रण, सुखदु:खात्मक अनुभवांशी निगडित असलेल्या भावनांचे दर्शन, अलौकिक आणि गूढ वातावरणाची निर्मिती ह्या गुणांमुळे आजदेखील त्याच्या कादंबऱ्या आपले स्थान टिकवून आहेत. ह्या काळातील आणखी एक श्रेष्ठ कादंबरीलेखिका जेन ऑस्टेन ही होय. मात्र हिच्या कादंबऱ्या ह्या कालखंडात लिहिल्या गेल्या असल्या, तरी प्रकृतीने त्या अभिजात आहेत. नव-अभिजाततावादाचा काटेकोरपणा, सूक्ष्मता, अलिप्तता आणि संयम ही तिच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्राइड अँड प्रेज्युडिससारख्या (१८१३) कादंबऱ्यांत आपल्या मर्यादित अशा सुखवस्तू मध्यमवर्गीय विश्वाच्या लक्ष्मणरेषेबाहेर लेखिका कधीही जात नाही; परंतु ह्या विश्वाबद्दलच्या अत्यंत सूक्ष्म ज्ञानाने त्यातील व्यक्तिव्यक्तींच्या संबंधांचे नाट्य ती मोठ्या कौशल्याने दाखविते. ह्या चित्रणात भावविवशता अजिबात नाही, तर कमालीचा संयम आहे. ह्या कादंबऱ्या अनन्यसाधारण विनोदबुद्धिने आणि आगळ्या संवेदनाक्षम व्याजोक्तीने नटल्या आहेत. कथाशिल्पाच्या दृष्टीने त्यांत मोठे रचनाचातुर्य आहे, अनुरूप स्वभावदर्शन आहे. लहानशा हस्तिंदती तुकड्यावर केलेली कलाकुसर, हे ह्या कादंबऱ्यांचे केलेले वर्णन त्यामुळे सार्थ वाटते.
साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातही नव-अभिजाततावादी समीक्षा आणि स्वच्छंदतावादी समीक्षा ह्यांतील फरक दिसून येतो. साहित्यविषयक दृष्टिकोणांतील फरकांवर तो आधारलेला आहे. कलेचा हेतू उपदेश हा नाही; उच्च तऱ्हेचे मनोरंजन करणे, जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडविणे व त्यांतून उद्बोधन करणे हे कलाकृतीचे उद्दिष्ट आहे व ते समीक्षेने ओळखावे, अशी अपेक्षा निर्माण झाली.
यावेळचे प्रसिद्ध समीक्षक म्हणजे, कोलरिज, हॅझ्लिट, वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स. ह्यांनी काव्याचे प्रयोजन आणि स्वरूप ह्यांविषयी लिहिले आहे. यावेळच्या समीक्षेचे विषय काव्याचे स्वरूप, भाषा, विषय व कार्य, सर्जनशक्तीचे स्वरूप, काव्याचा हेतू, शेक्सपिअरची व त्याच्या समकालीन नाटककारांची नाटके वगैरे होते. या सर्वांवर प्रत्येकाने स्वतंत्र मते मांडली. या समीक्षेने साहित्य ही स्वतंत्र ललित कला असून तिचे माध्यम शब्द आहे, ही गोष्ट प्रस्थापित केली व साहित्येतर दृष्टिकोणातून साहित्याचे परीक्षण करणे गैर आहे, असे दाखवून दिले. त्याचप्रमाणे एडिंबरो रिव्ह्यू (१८०२), क्वार्टर्ली रिव्ह्यू (१८०९) आणि ब्लॅकवुड्ज एडिंबरो मॅगझीन (१८१७) ह्या नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या परीक्षणलेखांनी साहित्यसमीक्षेत चैतन्य आणले. ह्यांतील लेख काही वेळा राजकीय पक्षदृष्टीने लिहिलेले किंवा पूर्वग्रहदूषित असले, तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही.
याही युगात डॉ. जॉन्सनच्या नव-अभिजात परंपरेचे अनुयायी होतेच. एडिंबरो रिव्ह्यूचा फ्रान्सिस जेफ्री हा अशा समीक्षकांमध्ये अग्रगण्य होता. त्याने स्वच्छंदतावाद्यांवर नेहमी कडाडून टीका केली.
स्वच्छंदतावादी व नव-अभिजाततावादी प्रवृत्तींचे परस्परविरोधी स्वरूप या युगाच्या शेवटी स्पष्ट झाले, तसेच दोहोंपैकी केवळ एकाच वृत्तीचा ऐकांतिक परिपोष करणारी कलाकृती असू शकत नाही, याची जाणीव झाली. यानंतरच्या म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या युगात या दोन्ही प्रवृत्तींचा शक्य तो मिलाफ व्हावा,अशी इच्छा निर्माण झाली व तसे प्रयत्न इंग्रजी साहित्यात झाले.
लेखक : रा. भि.जोशी, ; वा. चिं. देवधर,