व्यंजनसंधीच्या सर्व प्रकारात दोन पदांचा संधी होताना पहिल्या पदाच्या शेवटी कोणते ना कोणतेतरी व्यंजनच येते.
१. अनुनासिकाखेरीज इतर कोणत्याही वर्गीय (क्, च्, ट्, त्, प्, वर्गातील) व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येते.
एतद् + त्वया = एतत्त्वया
उद् + तिष्ठति = उत्तिष्ठति
ककुभ् + प्रान्तः = ककुप्प्रान्तः
सम्राड् + करोति = सम्राट् करोति
२. अनुनासिकाखेरीज इतर कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे जर स्वर किंवा मृदु व्यंजन आले तर आधीच्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते.
उदा. वाक् + ईश्वरः = वागीश्वरः
बालात् + अपि = बालादपि
पृथक् + भविष्यंति = पृथग्भविष्यति
सम्राट् + आगच्छति = सम्राडागच्छति
३. शब्दाच्या शेवटी येणार्या अनुनासिकाखेरीज वर्गीय व्यंजनापुढे जर अनुनासिक आले तर अगोदरच्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक किंवा तिसरे व्यंजन विकल्पाने येते.
वाक् + निश्चय = वाङ्निश्चय किंवा वाग्निश्चय
षट् + मासाः = षण्मासाः किंवा षड्मासाः
अज्ञानात् + मया = अज्ञानान्मया किंवा अज्ञानाद्मया
सम्यक् + नमति = सम्यङ्नमति किंवा सम्यग्नमति
‘मय’ व ‘मात्र’ यासारखे प्रत्यय लावताना वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिकच येते. विकल्पाने तिसरे व्यंजन येत नाही.
वाक् + मय = वाङ्मय (‘वाग्मय’ होत नाही)
चित् + मात्रम् = चिन्मात्रम् (‘चिद्मात्रम्’ होत नाही)
४. ‘त्’ वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे ‘च्’ वर्गातील कोणतेही व्यंजन किंवा ‘श्’ आला असता पूर्वीच्या त् वर्गातील व्यंजनाच्या जागी त्याच क्रमाने च् वर्गातील व्यंजन येते. केवळ ‘श्’ पुढे आला असता ‘श्’ चा विकल्पाने ‘छ्’ होतो.
तस्मात् + चलति = तस्माच् + चलति = तस्माच्चलति
अस्मद् + जननी = अस्मज् + जननी = अस्मज्जननी
महत् + छत्रम् = महच् + छत्रम् = महच्छत्रम्
तस्मात् + शास्त्रम् = तस्माच् + शास्त्रम् = तस्माच्छास्त्रम् किंवा तस्माच्शास्त्रम्
५. ‘त्’ वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे ‘ट्’ वर्गातील कोणतेही व्यंजन आले असता ‘त्’ वर्गातील व्यंजनाच्या जागी ‘ट्’ वर्गातील व्यंजन त्याच क्रमाने येते.
उद् + डयनम् = उड्डयनम्
अलिखत् + टिप्पणी = अलिखट्टिपणी
सुमहान् + डमरुः = सुमहाण्डमरूः
६. पदाच्या अंती असणार्या ‘न्’ व्यंजनापूर्वी र्हस्व स्वर व पुढे कोणताही स्वर आला असता त्या ‘न्’ ला द्वित्व होते.
अनिच्छन् + अपि = अनिच्छन्नपि
तस्मिन् + एव = तस्मिन्नेव
खादन् + इव = खादन्निव
परंतु ‘न्’ व्यंजनापूर्वी जर दीर्घ स्वर असेल तर ‘न्’ ला द्वित्व होत नाही.
देवान् + इव = देवानिव
लोकान् + अपि = लोकानपि
७. पदाच्या अंती असणार्या ‘न्’ व्यंजनापुढे ‘त्’, ‘थ्’, ‘च्’, ‘छ्’ किंवा ‘ट्’, ‘ठ्’ आले असा त्या ‘न्’ चा अनुस्वार व विसर्ग दोन्ही होतात. अनुस्वार हा अगोदरच्या अक्षरावर टिंब देऊन दाखविला जातो. नंतर विसर्गसंधीच्या नियमानुसार ‘त्’ ‘थ्’ पुढे असता विसर्गाचा ‘स्’ होतो. ‘च्’, ‘छ्’ पुढे असता विसर्गाचा ‘श्’ होतो. ‘ट्’, ‘ठ्’ पुढे असता विसर्गाचा ‘ष्’ होतो.
वृक्षान् + तान् = वृक्षां: + तान् = वृक्षांस्तान्
स्पृशन् + तु = स्पृशं: + तु = स्पृशंस्तु
कस्मिन् + चित् = कस्मिं: + चित् = कस्मिंश्चित्
तान् + छात्रान् = तां: + छात्रान् = तांश्छात्रान्
जनान् + ठक्कुरः = जनां: + ठक्कुरः = जनांष्ठक्कुरः
तान् + टीकाकारान् = तां: + टीकाकारान् = तांष्टीकाकारान्
८. पदाच्या अंती असणार्या ‘त्’ वर्गीय व्यंजनापुढे ‘ल्’ व्यंजन आल्यास ‘त्’ वर्गीय व्यंजनाऎवजी ‘ल्’ हे व्यंजन येते. जर पूर्वीचा वर्ण ‘न्’ अस्तो तेव्हा त्याऎवजी येणारा ‘ल्’ हा ‘लँ’ (अनुनासिक युक्त ‘ल्’) होतो. त्यातील अनुनासिक ( ँ) हे चिन्ह अगोदरच्या स्वरावर देतात.
नृपात् + लभते = नृपाल्लभते
उद् + लसति = उल्लसति
तान् + लिखति = ताँल् + लिखति = ताँल्लिखति
तान् + लोकान् = ताँल् + लोकान् = ताँल्लोकान्
९. अनुनासिकाखेरीज पदाच्या शेवटी असलेल्या कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे ‘ह्’ व्यंजन आल्यास त्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते व ‘ह्’ च्या जागी मागील व्यंजनाच्या वर्गातील चौथे व्यंजन विकल्पाने येते.
वाक् + हरेः = वाग्घरेः किंवा वाग्हरेः
सम्राट् + हर्षयति = सम्राड्ढ्र्षयति किंवा सम्राड्हर्षयति
१०. कोणत्याही र्हस्व स्वरापुढे किंवा ‘आ’ ह्या उपसर्गापुढे (किंवा अव्ययापुढे) ‘छ्’ व्यंजन आल्यास त्या ‘छ्’ च्या मागे ‘च्’ व्यंजन जोडले जाते.
तरु + छाया = तरुच्छाया
आ + छादनम् = आच्छादनम्
वृक्ष + छेदः = वृक्षच्छेदः
परंतु दीर्घ स्वरापुढे ‘छ्’ व्यंजन आले तर त्याच्या मागे ‘च्’ व्यंजन विकल्पाने लावतात.
देवी + छागः = किंवा देवीछागः
तया + छिन्नः = तयाच्छिन्नः किंवा तयाछिन्नः
स्त्रोत - संस्कृतदीपिका
अंतिम सुधारित : 8/10/2020
या माहितीपटात मार्केटमधील रोजगाराच्या संधी कोणत्य...
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता...
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कौशल्य वि...