विसर्गसंधी - विसर्गापूर्वी नेहमी स्वरच असतो. विसर्गानंतर मात्र स्वर किंवा व्यंजन कोणताही वर्ण असू शकतो.
१. विसर्गाचा उ - विसर्गापूर्वी ‘अ’ आणि विसर्गानंतर ‘अ’ आल्यास विसर्गाचा ‘उ’ होता. विसर्गापूर्वीचा ‘अ’ व विसर्गाचा ‘उ’ यांचा गुणसंधिनियमानुसार ‘ओ’ होतो. पुढील ‘अ’ चा लोप होतो. लोप झालेल्या ‘अ’ च्या जागी अवग्रह (ऽ) चिन्ह वापरतात.
धूर्तः + अवदत् = धूर्त + उ + अवदत् = धूर्तो अवदत् = धूर्तोऽवदत्
दिवसः + अस्ति = दिवसोऽस्ति
सः + अहम् = सोऽहम्
कः + अहम् = कोऽहम्
२. विसर्गाचा उ - विसर्गापूर्वी ‘अ’ आणि विसर्गानंतर मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ असा बदल होऊन मागील ‘अ’ व ‘उ’ यांचा गुणसंधिनियमानुसार ‘ओ’ होता.
अर्थः + हि = अर्थो हि
जगतः + जनकः = जगतो जनकः
अभिषेकः + न = अभिषेको न
बालः + वदति = बालो वदति
३. विसर्गाचा लोप - तीन वेगवेगळया कारणांमुळे विसर्गाचा लोप होतो. (विसर्ग नाहीसा होता)
अ) विसर्गापूर्वी ‘अ’ व विसर्गापुढे ‘अ’ खेरीज कोणताही स्वर आल्यास विसर्गाचा लोप होता.
बालः + इच्छति = बाल इच्छति
कः + एषः= क एषः
अतः + एव = अत एव
नृपः + इच्छति = नृप इच्छति
आ) विसर्गापूर्वी ‘आ’ व नंतर कोणताही स्वर अथवा मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा लोप होता.
बालिकाः + अपि = बालिका अपि
क्रियाः + नश्यन्ति = क्रिया नश्यन्ति
मृगाः + धावन्ति = मृगा धावन्ति
खगाः + उड्डयन्ते = खगा उड्डयन्ते
इ) ‘एषः’ व ‘सः’ यांच्या पुढे ‘अ’ शिवाय कोणताही वर्ण (स्वर किंवा व्यंजन) आल्यास विसर्गाचा लोप होतो. त्यांचा पुन्हा स्वरसंधी होत नाही.
एषः + कविः = एष कविः
सः + सदा = स सदा
सः + उच्यते = स उच्यते
एषः + बालकः = एष बालकः
४. विसर्गाचा र् - विसर्गाच्या मागे ‘अ’, ‘आ’ खेरीज कोणताही स्वर किंवा मृदुव्यंजन आल्यास त्या विसर्गाचा ‘र्’ होतो. पुढे स्वर आल्यास ‘र्’ मध्ये मिसळून पूर्ण अक्षर बनते व मृदुव्यंजन असल्यास ‘र्’ त्या व्यंजनावर लिहितात.
रविः + अपि = रवि + र् + अपि = रविरपि
लक्ष्मीः + इति = लक्ष्मीरिति
भक्तेः + एव = भक्तेरेव
अग्निः + दहति = अग्निर्दहति
महाकविः + गुणादयः = महाकविर्गुणाढ्यः
५. विसर्गाचा श - विसर्गाच्या मागे कोणताही स्वर व विसर्गापुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास विसर्गाचा ‘श्’ होतो. परंतु विसर्गापुढे ‘श्’ आल्यास त्याचा विकल्पाने ‘श्’ होतो.
पुत्राः + च = पुत्राश्च
कः + छात्रान् = कश्छात्रान्
वृक्षः + छिद्यते = वृक्षश्छिद्यते
यतिः + चिन्तयति = यतिश्चिन्तयति
विरुध्दः + शकटः = विरुध्दश्शकटः किंवा विरुध्दः शकटः
६. विसर्गाचा ष् - विसर्गापुढे ‘ट्’, ‘ठ्’ आल्यास विसर्गाचा ‘ष्’ होतो. परंतू विसर्गापुढे ‘ष्’ आल्यास त्याचा विकल्पाने ‘ष्’ होतो.
कविः + टीकाम् = कविष्टीकाम्
जनाः + टिट्टिभम् = जनाष्टिट्टिभम्
तस्याः + ठालिनी (कमरपट्टा) = तस्याष्टालिनी
छात्रः + षष्ठः = छात्रष्षष्ठः किंवा छात्रः षष्ठः
बालाः + षट्पदम् = बालाष्षपदम् किंवा बालाः षटपदम्
७. विसर्गाचा स् - विसर्गापुढे ‘त्’, ‘थ्’ आल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो. परंतु विसर्गापुढे ‘स्’ आल्यास विसर्गाचा विकल्पाने ‘स्’ होतो.
गङ्गायाः + तटे = गङ्गायास्तटे
बालः + तत्र = बालस्तत्र
कः + त्वम् = कस्त्वम्
कृष्णः + तु = कृष्णस्तु
बालः + स्पृशति = बालस्स्पृशति किंवा बालः स्पृशति
८. विसर्गापुढे ‘क्’, ‘ख्’, ‘प्’, ‘फ्’ पैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो.
स्रोत - संस्कृतदीपिका
अंतिम सुधारित : 8/6/2020
या माहितीपटात मार्केटमधील रोजगाराच्या संधी कोणत्य...
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत...
‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे आपल्या देशात पर्यावरण क्...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कौशल्य वि...