অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप

(९ मे १५४० – १९ जानेवारी १५९७). गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र.प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.

तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले.

प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले.

अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले.

२१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे.

राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’

 

संदर्भ : 1. Mujamdar, R. C. Ed. The Mughul Empire, Bombay, 1974.

२. गहलोत, जगदीशसिंह, राजपूतानेका इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.

लेखक : देशपांडे सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate