(?१५४?–११ मे १६२६). अहमदनगरच्या निजामशाहीतील एक कर्तबगार आणि मुत्सद्दी मुख्यप्रधान. त्याच्या पूर्वायुष्याबाबत आणि घराण्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म एका सामान्य हबशी (ॲबिसीनियन) कुटुंबात झालाअसे बहुतेक इतिहासकार मानतात. ख्वाजा बगदादी या व्यापाऱ्याने त्याला बगदाद येथे विकत घेऊन भारतात आल्यानंतर पहिला मुर्तजा निजामशाहचा प्रधान चंगीझखान यास अहमदनगर येथे गुलाम म्हणून विकले. चंगीझखानच्या आकस्मिक मृत्यूनंतर अंबरची पुढील सु.वीस वर्षे अहमदनगर आणि विजापूर येथील शाही फौजेत एक सामान्य शिपाई म्हणून चाकरी करण्यात गेली. त्या वेळी त्याने चांदबीबीला मदत करून बहादुर निजामशाह (कार. १५९५१६००) यास गादीवर बसविण्यास सक्रिय सहाय्य दिले आणि मोगलांना प्रतिकार केला. पुढे मलिक अंबरने आपल्या पराक्रमाने १५० घोडेस्वारांच्या पथकाचे सेनापतिपद मिळविले. त्यानंतर तो काही दिवस चौल व दाभोळ येथे स्वतंत्रपणे राहत असे.
निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे त्यास संधी लाभली व तो दोनचार हजार स्वार जमवून निजामशाहीत आला आणि मोगलांना प्रतिकार करू लागला. चांदबीबीच्या खूनानंतर मोगलांनी अहमदनगर घेतले (१६ ऑगस्ट १६००) आणि बहादुरशाहला कैद करून पुढे ग्वाल्हेरच्या किल्ल्यात ठेवले. या सुमारास मलिक अंबरने मोगलांना बीदरमध्ये सतावण्यास सुरूवात केली व ते घेतले. त्यानंतर त्याने नगरवर स्वाऱ्या केल्या. त्याने निजामशाहीतील अनेक सरदारांच्या मदतीने शत्रूकडे गेलेले मुलूख हळूहळू पादाक्रांत केला व विजापूर येथे निजामशाहीचा वारस असलेल्या अलीस बोलावून परांडा येथे दुसरा मुर्तजा निजामशाह (कार. १६००−१०) हे नाव देऊन त्यास राज्याभिषेक केला.
अंबर त्याचा मुख्यप्रधान आणि पेशवा व वजीर-इ-कुल आणि मम्लुकत-मदारी झाला. त्याने आपली मुलगी मुर्तजास देऊन संबंध अधिक दृढतर केले. मलिक अंबर मुख्यप्रधान झाल्यानंतर त्याच्यापुढे अंतर्गत शत्रू आणि मोगल यांच्यापासून निजामशाहीचे रक्षण करणे आणि राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य होते. त्याने लष्करी दृष्ट्या सोयीच्या अशा स्थळी जुन्नरला राजधानी हलविली (१६०७). आपल्या प्रबळ प्रतिस्पर्धी राजूला दौलताबादेतून हुसकावून व पुढे पकडून तुरूंगात डांबले आणि नंतर ठार मारले. मोगलांशी मुकाबला करण्यासाठी त्याने दुसरा इब्राहिम आदिलशाहीशी मैत्रीचा करार केला. आदिलशाहने सुरूवातीस अंबरला सहकार्य देऊन मोगलांचा दारूण पराभव करून तह केला (१६१०) आणि अहमदनगर व वऱ्हाड हे भाग मोगलांपासून परत मिळविले. राजधानीचे ठिकाण दौलताबाद येथे नेले. या प्रतिकारात व लढ्यांत शहाजी भोसले, लखुजी जाधव वगैरे मराठे सरदारांचे गनिमी युद्धतंत्र त्यास फार उपयोगी पडले.
हळूहळू निजामशाहीचा राज्यविस्तार करून त्याने प्रशासनव्यवस्था कार्यक्षम केली. इतिहासप्रसिद्ध ‘मलिकंबरीधारा’ व्यवहारात आणली. त्यामुळे जमीन महसुलाच्या बाबतीत अनेक सुधारणा झाल्या. दौलताबादजवळ खडकी हे नवीन शहर बसवून तेथे अनेक सुरेख वास्तू बांधल्या आणि ते राजधानीचे ठिकाण केले.
मोगलांशी लढा देण्यासाठी आदिलशाही, कुत्बशाही यांच्याशी मैत्री करून संयुक्त आघाडी उघडली. पुढे सोलापूरच्या किल्ल्यासंबंधी संघर्ष (१६२५) होण्याच्या अगोदर मलिक अंबरने विजापूरच्या अंमलाखाली असलेल्या बीदरवर स्वारी केली (१६१९) आणि ते जिंकले. पुढे त्याचे विजापूरशी वितुष्ट आल्यानंतर आदिलशाहने मोगलांची मदत मागितली आणि आपले बऱ्हाणपूरचे सैन्य परत बोलाविले. त्यावेळी मुल्ला मुहम्मद लारीच्या नेतृत्वाखाली विजापूर-मोगलांची मोठी फौज विजापूरच्या दिशेने अंबरवर चालून आली. अखेर भातवाडी या ठिकाणी मोगल, आदिलशाह व कुब्तशाह यांच्या संयुक्त फौजेचा मलिक अबरने निर्णायक पराभव केला (१६२४).
नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या निजामशाहीचे पुनरूत्थान झाल्यामुळे या युद्धाला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. यानंतर अंबरने दाभोळ व सोलापूरही जिंकले (१६२५) व काही काळ मोगलांच्या दक्षिणेतील राज्यविस्तारास पायबंद घातला. उत्कर्षाच्या शिखरावर असताना तो अंबरापूर येथे मरण पावला.
त्याच्या मृत्यूनंतर फत्तेहखान या त्याच्या मुख्यप्रधानपद आले; पण तो क्रूर व अदूरदर्शी होता. त्याने मुर्तजा निजामशाहचा खून करून आपल्या हुसेन या मुलास गादीवर बसविले. निजामशाही राज्य मलिक अंबरनंतर दहा वर्षांतच नष्ट झाले. (१६३६).
मलिक अंबर चाणाक्ष, कल्पक, मुत्सद्दी व उदान्त धोरणी असा शूर सेनापती होता. कार्यक्षम प्रशासक आणि लोकहितवादी म्हणूनही त्याची ख्याती आहे. त्याच्या रयतवारी पद्धतीमुळे त्याचे इतिहासात नाव अजरामर झाले. त्याने जुन्या ग्रामसंस्थांनादेखील पुन्हा उर्जितावस्थेस आणले.
पहा : निजामशाही
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. Mughal Empire, Bombay, 1974.
2. Radhey Shyam, The Kingdom of Ahmadnagar, Delhi, 1966.
3. Tamaskar, B.G. The Life and Work of Malik Ambar, Delhi, 1978.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/16/2020