অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 68 वा वर्धापनदिन मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करीत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.

हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.

हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.

आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.

भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैद्राबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला.

लेखक - अरुण सूर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate