অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परमार घराणे

परमार घराणे

परमार घराणे

एक प्रसिद्ध राजपूत घराणे. परमारांची गणना चार राजपूत अग्निकुलांत होते; पण त्यांचा मूळ पुरुष परमार हा अर्बुद पर्वतावर वसिष्ठ ऋषींच्या होमाग्नीतून उत्पन्न झाला, ही कल्पना त्यांच्या आरंभीच्या कोरीव लेखांत येत नाही. ती पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरितात प्रथम आढळते आणि नंतरच्या त्यांच्या कोरीव लेखांत उल्लेखिलेली दिसते.

परमारांचा मूळ परुष उपेंद्र किंवा कृष्णराज, हा राष्ट्रकूट तिसरा गोविंदा याचा मांडलिक म्हणून नवव्या शतकाच्या आरंभी उदयास आला. गोविंदाने आपल्या उत्तर भारताती स्वाऱ्यांत माळवा जिंकल्यावर तेथे उपेंद्राची आपला मांडलिक म्हणून स्थापना केली असावी.

उपेंद्र आणि त्याचे पुढील तीन वंशज यांच्याविषयी काही माहिती ज्ञात नाही. प्रतीहारांनी माळवा जिंकून घेतला होता. तो त्यांच्या ताब्यात ९४६ पर्यंत होता. नंतर दुसऱ्या वैरिसिंहाने तो राष्ट्रकूटांच्या साहाय्याने जिंकून घेतला आणि धारा (मध्य प्रदेशातील धार) येथे आपली गादी स्थापिली. त्याचा पुत्र दुसरा सीयक (श्रीहर्ष) हाही पराक्रमी निघाला. बलाढ्य राष्ट्रकूट नृपती तिसरा कृष्ण याच्या निधनानंतर त्याने राष्ट्रकूटांचे स्वामित्व झुगारून दिले, तेव्हा राष्ट्रकूट नृपती खोट्टिग याने त्याच्यावर स्वारी केली. नर्मदेच्या काठी दोघांची घनघोर लढाई झाली. तीत खोट्टिगाचा पराभव झाला, तेव्हा सीयकाने राष्ट्रकूट राजधानी मान्यखेट ( मालखेड) वर आक्रमण करून ते शहर लुटले. त्याने दक्षिणेस गोदावरीपर्यंतचा राष्ट्रकूटांचा प्रदेशही काबीज केला.

सीयकांचा पुत्र दुसरा वाक्‌पतिराज किंवा मुंज हा विद्वान तसाच शूरही होता. त्याने शेजारचा कलचुरी नृपती दुसरा युवराजदेव, तसेच मेदपाटचा (मेवाड) गुहिलोत नृपती शक्तिकुमार यांच्या राज्यांवर आक्रमण करून त्यांच्या राजधान्या लुटल्या आणि हूण नृपती, नड्डूलचे चाहमान व गुजरातचा चालुक्य मूलराज यांच्यावर विजय मिळविले. दक्षिणेत राष्ट्राकूटांचा उच्छेद करून उत्तरकालीन चालुक्य नृपती दुसरा तैलप सम्राट झाला होता. त्याचीसुद्धा सहा आक्रमणे त्याने परतवून लावली ; पण नंतर त्याने आपल्या रुद्रादित्यनामक मंत्र्याच्या सल्ल्याविरुद्ध गोदावरी पार करून तैलपाच्या राज्यावर स्वारी केली. तेव्हा त्याचा पराजय होऊन तो पकडला गेला. कैदेतून निसटण्याचा त्याने कट केला होता ; पण त्याच्यावर फिदा झालेल्या मृणालवतीनामक तैलपाच्या भगिनीने त्याची माहिती तैलपाला दिल्यावर त्याने त्याला राजधानीत दारोदार भिक्षा मागावयास लावून त्याचा शिरच्छेद केला (सु. ९९३).

मुंजानंतर त्याचा धाकटा भाऊ सिंधुराज गादीवर आला. त्याने चालुक्यांच्या पराभव करून गोदावरीपर्यंतचा चालुक्यांनी जिंकलेला मुलूख परत मिळविला. त्याने बस्तरच्या नाग राजाच्या सुंदर कन्येशी विवाह करण्याकरिता छत्तीसगढातील राजाचा पराभव केला. या घटनेवर त्याच्या दरबारचा पद्मगुप्त उर्फ परिमल याने रचलेले नवसाहसांकचरित हे मनोहर संस्कृत काव्य प्रसिद्ध आहे.

सिंधुराजानंतर त्याजा पुत्र सुविख्यात भोज हा १००० च्या सुमारास गादीवर आला. त्याने कलचुरी गांगेयदेव आणि राजेंद्र चोल यांच्याशी सख्य करून आपला पिढीजाद वैरी कल्याण चालुक्य नृपती जयसिंह याच्यावर स्वारी केली; पण त्यात त्यांना यश आले नाही. उलट जयसिंहाचा पुत्र पहिला सोमेश्वर याने त्याचा सूड घेऊन परमार राज्यावर स्वारी केली, मांडूचा किल्ला घेतला आणि धारा लुटली. भोजाने चंदेल्ल, ग्वाल्हेरचे कच्छपघात आणि कनौजचे राष्ट्रकूट यांच्याशीही युद्धे केली ; पण त्यांत त्याला फारसे यश आले नाही. त्याने कलचुरी गांगेयदेवाचा पराभव केला. नंतर गांगेयदेवाचा पुत्र कर्ण याने गुजरातचा चालुक्य भीम याच्याशी संधान बांधून माळव्यावर दोन्ही दिशांकडून आक्रमण केले. त्याच सुमारास भोज निधन पावला (सु. १०५५). त्याचा पुत्र जयसिंह याने आपला पिढीजाद वैरी कल्याण चालुक्य नृपती पहिला सोमेश्वर याच्याकडे साहाय्याची याचना केली. त्याने आपला महापराक्रमी पुत्र विक्रमादित्य याला पाठवून जयसिंहाला त्याची गादी मिळवून दिली.

काही वर्षांनी पहिला सोमेश्वर निधन पावल्यावर कलचुरी कर्णाने चालुक्य नृपती दुसरा सोमेश्वर आणि गंग नृपती उदयादित्य यांच्यासह माळव्यावर पुन्हा आक्रमण केले. तेव्हा युद्धाच्या धुमश्चिक्रीय जयसिंह मारला गेला आणि काही काळ राज्यात बेबंदशाही माजली ; पण तीतून भोजाचा बंधू उदयादित्य याने मालवभूमीचा उद्धार केला. यात त्याला शाकंभरीच्या चाहमानांचे साहाय्य झाले.

उदयादित्याचा पुत्र लक्ष्मदेव याने कर्णाचा पुत्र यशःकर्ण याचा पराभव करून सूड घेतला. त्याने अंग, गौड, कलिंग अशा दूरदूरच्या देशांवर स्वाऱ्या केल्या आणि पंजाबचा गझनी अधिकारी महमूद याची स्वारी परतून लावली.

त्याच्या नंतरच्या नरवर्मा आणि यशोवर्मा यांच्या कारकीर्दींत परमारांची गुजरातच्या चालुक्यांशी युद्धे चालूच होती. शेवटी चालुक्यांनी माळवा आपल्या राज्यास जोडून त्यावर वीस वर्षे राज्य केले. नंतर विंद्यवर्म्याने चालुक्यांशी युद्ध करून आपले पैतृक राज्य परत मिळविले. त्याचा पुत्र सुभटवर्मा याने चालुक्यांच्या अनहिलवाड राजधानीवर हल्ला करून सूड घेतला. त्याचा पुत्र अर्जुनवर्मा याच्या काळी यादवांच्या माळव्यावर स्वाऱ्या सुरू झाल्या. अर्जुनवर्म्याने आपला चालुक्य वैरी जयसिंह याच्या कन्येशी विवाह करून परंपरागत वैर शमविण्याच्या प्रयत्न केला. या घटनेवर त्याच्या दरबारातील मदन कवीने रचलेल्या पारिजातमंजरी नाटकाचा काही भाग कोरीव लेखाच्या रूपाने उपलब्ध झाला आहे.

अर्जुनवर्म्याचा पुत्र देवपाल (सु. १२१८-३२) याने यादवांशी संधान बांधून गुजरातवर हल्ला केला. त्याच वेळी चाल्लुक्यांवर मुसलमानांचे आक्रमण झाले होते. त्याच्याविरुद्ध चालुक्यांना मदत न करता त्यांच्या राज्याचे लचके तोडणे, हे आत्मघातकीपणाचे होते आणि त्याचा प्रत्ययही परमारांना लवकरच आला. अल्तमशने नंतर माळव्यावर आक्रमण करून उज्जयिनी लुटली (१२३५). देवपालाचा पुत्र जैतुगी याच्या कारकीर्दीत यादव, वाघेल आणि मुसलमान यांनी माळव्यावर आक्रमण केले. पुढे माळव्याला कष्टतर दिवस आले. त्याच्या राज्याची विभागणी झाली. शेवटी १३०५ मध्ये अलाउद्दीनने माळव्यावर स्वारी केली. परमार नृपती महलकदेव याचा पराभव होऊन त्याने मांडूच्या किल्ल्यात आश्रय घेतला ; पण तेथे त्याला अलाउद्दीनच्या सेनापतीने ठार मारून माळवा खालसा केला.

उज्जयिनी-धारा येथे राज्य करणाऱ्या मुख्य शाखेखेरीज परमारांच्या इतर काही शाखा अबू पर्वताच्या परिसरात वागड, जालोर व भिन्माळ येथे राज्य करीत होत्या. त्यांचा उच्छेद जवळच्या गुहिलोत आणि चाहमान राजांनी करून त्यांचा प्रदेश खालसा केला.

परमारांची कीर्ती, धर्म, विद्या आणि कला यांना त्यांनी दिलेल्या आश्रयामुळे अजरामर झाली. परमार राजांनी अनेक देवालये बांधली; पण त्यांतली आता फारच थोडी अवशिष्ट आहेत. त्यांमध्ये उदयादित्याने आपल्या नावे बांधलेल्या उदयपुरातील नीलकंठेश्वराच्या किंवा उदयेश्वराच्या देवालयाची गणना प्रामुख्याने केली पाहिजे. हे देवालय परमारकालीन स्थापत्य आणि शिल्पकला यांचे सुंदर प्रतीक आहे.उज्जयिनी व धार येथील अवशेषांपैकी भोजाने उभारलेल्या भोज शालेत (विद्याम़न भोजराजाकी निसाळ किंवा कमाल मौला) सर्व प्रकारच्या वेदशाक्याभ्यासाची सोय केली होती. तेथे कित्येक ग्रंथ सुंदर अक्षरांत मोठमोठ्या शिलाखंडांवर अभ्यासकांच्या उपयोगासाठी कोरले होते. त्यांतील काही शिलाखंड व सरस्वतीची सुंदर मूर्ती असे अवशेष शिल्लक आहेत. मुंज, भोज व अर्जुनवर्मा हे आपल्या विद्वत्तेबद्दल आणि कवित्वाबद्दल प्रसिद्ध होते. मुंजाची अनेक सुभाषिते सुभाषित-संग्रहात घेतली आहेत. नवसाहसांकचरिताचा कर्ता पद्मगुप्त परिमल याला त्याचा उदार आश्रय होता. तो पुढे सिंधुराजाने चालू ठेवला. मुंजाच्या आश्रयास दशरूपकाचा कर्ता धनंजय, त्यावरील टीकाकार धनिक, अमिधानरत्नमालेचा कर्ता हलायुध हेही ग्रंथकार होते. भोज हा स्वतः नामांकित तत्त्वज्ञ व २३ ग्रंथांचा कर्ता होता, असे मानतात. त्याचा धनपाल, उत्तर इ. अनेक विद्वान व कवी यांना उदार आश्रय होता. त्याचा तत्त्वप्रकाशनामक शैव तत्त्वज्ञानावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने अलंकारशास्त्रावर शृंगारप्रकाश व सरस्वतीकण्ठाभरण, अर्थशास्त्रावर युक्तिकल्पतरु, व्याकरणावर सरस्वतीकण्ठाभरण, शिल्पशास्त्रावर समरांगण-सूत्रधार, आयुर्वेदावर आयुर्वेद सर्वस्व इ. ग्रंथ रचले होते. त्याची धर्मशास्त्रविषयक मते ‘धारेश्वर’ म्हणून उल्लेखिलेली आढळतात. पण धर्मशास्त्रावरचा त्याचा ग्रंथ सध्या उपलब्ध नाही. त्याच्या दरबारातील अनेक कवींच्या परंपरागत कथा बल्लाळच्या भोजप्रबंधांत संगृहीत केल्या आहेत. अर्जुनवर्मदेवाने अमरुशतकावर टीका लिहिली आहे.

 

संदर्भ : 1. Ganguly, D. C. History of the Parmar Dynasty, Dacca, 1933.

2. Majumdar, R. C., Ed. The Struggle For Empire, Bombay, 1957.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate