অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुरु गोविंदसिंग

गुरु गोविंदसिंग

२२ डिसेंबर १६६६—७ ऑक्टोबर १७०८). शिखांचे दहावे व अखेरचे गुरू. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर हे यांचे वडील. आईचे नाव गुजरी. जन्म बिहारमधील पाटणा येथे. लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ते ओळखले जात. त्यांनी दोन विवाह केले होते; जीतो व सुंदरी ही त्यांच्या पत्नींची नावे. अजितसिंग,जुझारसिंग, जोरावरसिंग व फतहसिंग ही त्यांची चारही मुले पुढे लढायांत मारली गेली.

गुरू तेगबहादुर यांच्या वधानंतर (१६७५) वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोविंदसिंग गादीवर आले. आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित केला व शिखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. ‘खंडेदाअमृत’ नावाचा एक शिख दीक्षाविधीही त्यांनी सुरू केला. या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले व ‘पंच ककार’ (केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण) धारण करू लागले. त्यांच्या अनुयायांना ‘खालसा’(म्हणजे अत्यंत शुद्ध) म्हणून संबोधले जाते. खालसा पंथाचे ते संस्थापक होत. आपल्या धार्मिक शिकवणुकीत त्यांनी एकेश्वरवादी मताचा पुरस्कार केला. शौर्य व राष्ट्रभक्ती या गुणांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत अग्रस्थान दिले. आपल्या अनुयायांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक शिस्तबद्ध फौज त्यांनी तयार केली व औरंगजेबाविरुद्धच्या अनेक लढायांत विजय मिळविले. आपल्यानंतर शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ⇨ग्रंथसाहिब यासच गुरुस्थानी मानावे, असा आदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.

औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांत दिल्लीच्या तख्ताबद्दल चाललेल्या तंट्यात गोविंदसिंगानी औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र बहादुरशाह याची बाजू उचलून धरली व त्यास तख्तावर येण्यास मदत केली. त्यामुळे बहादुरशाहाने गोविंदसिंगांचा मोठा सन्मान केला. पुढे बहादुरशाहाचा धाकटा भाऊ कामबख्श याचे बंड मोडून काढण्यासाठी गोविंदसिंग बहादुरशाहाबरोबर दक्षिणेस गेले असताना, नांदेड मुक्कामी एका पठाणाने अचानक हल्ला करून गोविंदसिंगाचा वध केला.

गोविंदसिंगांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. त्यांचे संस्कृत, फार्सी, पंजाबी व व्रज भाषांवर चांगले प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथरचना फार्सी, पंजाबी, व्रज व हिंदी या चारही भाषांत आहे. त्यांची भाषाशैली ओजस्वी असून आपल्या काव्यात त्यांनी विविध छंदांचा उपयोग केला आहे. दसम ग्रंथ (दशम ग्रंथ—दहाव्या गुरूंचा पवित्र ग्रंथ) या ग्रंथात गोविंदसिंगांच्या पंजाबी, हिंदी, फार्सी रचना संकलित केलेल्या असून, जाप (जापु)साहिब, विचित्र नाटक (आत्मचरित्र), ज्ञान प्रबोध, अकाल उस्तति, जफरनामा (शुद्ध फार्सी भाषेत औरंगजेबाला उद्देशून लिहिलेला पत्ररूप पद्यग्रंथ) या त्यांतील काही प्रमुख रचना होत.विद्यासागर, गोविंद गीता, चांदी-दी वार हे त्यांचे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक विद्वानांकरवी संस्कृत साहित्यकृतींचे हिंदी व पंजाबी भाषांतून त्यांनी अनुवादही करून घेतले.

नांदेड येथे त्यांची समाधी (श्री हुजूर अबचलनगर सचखंड अकालतख्त श्रीगुरूद्वारा) असून ते शिखांचे एक महत्त्वाचे धर्मक्षेत्र मानले जाते. जानेवारी १९६७ मध्ये त्यांची तीनशेवी जयंती राष्ट्रीय पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरी केली.


संदर्भ : 1. Guru Govind Singh Foundation, Chandigarh, The Tenth Master, Delhi, 1967.

2. Singh, Gopal, Guru Govind Singh, Delhi, 1966.

लेखक : आहलूवालिया राजेंद्र सिंह (इं.); पोरे, प्रतिभा (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate