भारतातील प्राचीन बौद्ध अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ. कसिया या नावाने हे सध्या प्रसिद्ध असून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात गोरखपूरच्या पूर्वेस सु. ५४ किमी. वर छोटी गंडक या नदीकाठी ते वसले आहे. प्राचीन संस्कृत व बौद्ध साहित्यांत, तसेच चिनी प्रवाशांच्या वर्णनांत त्याची कुशावती, कुसिनारा, अनिरुद्धव, कुशस्थली, कुसावती, किउ-शि-न, की-लो, कुशनगर, कुशीग्रामक आदी भिन्नभिन्न नामांतरे आढळतात. या स्थानाची १८७६ साली प्रथम पाहणी झाली. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व-खात्यातर्फे तेथे उत्खनन झाले. त्यात रंभर आणि माता-कुंवर-का कोट या स्थानी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाण स्तूपाचे व चैत्यमंदिराचे अवशेष, तसेच बुद्धाची परिनिर्वाणावस्थेतील एक भग्न मूर्ती सापडली. स्तूपात गुप्तकालीन ब्राह्मी लिपीची अक्षरे कोरली आहेत. तेथे एक ताम्रपट्टिका मिळालेली असून तीवर शाईने लिहिलेला भाग एखाद्या बौद्धधर्मीय ग्रंथाचा असावा. वरील अवशेषांव्यतिरिक्त गुप्तकालीन विहार, मंदिरे, कुशाणकालीन (कडफिसस व कनिष्क) तसेच कुमारगुप्ताची नाणी, शेकडो मृण्मुद्रा आणि बाराव्या शतकातील विहारांचे अवशेषही तेथे मिळाले आहेत. या ठिकाणी आणखी उत्खनने झाली. तथापि अशोककालीन महापरिनिर्वाण स्तूप अद्यापि सापडला नाही. अवशिष्ट गुप्तकालीन स्तूपाखाली तो असावा, असे तज्ञांचे मत आहे.
बौद्धपूर्व काळात मल्ल जनपदाची ही राजधानी होती, तर बुद्धाच्या वेळी ती गणराज्य होती. त्या वेळी कुशावतीचे कुशिनारा हे नाव रूढ झाले असावे.
फाहियान (चौथे शतक) व ह्यूएन्त्संग (सातवे शतक) ह्यांनी ह्या स्थळास भेट दिली होती, असे त्यांनी केलेल्या समान वर्णनांवरून दिसते. अशोकानेही या नगरीस भेट दिली होती, असे दिव्यावदानात म्हटले आहे. अकराव्या-बाराव्या शतकांत येथे कलचुरी राजांचे आधिपत्य होते. तेराव्या शतकात मुसलमानांच्या आक्रमणामुळे हे नगर उद्ध्वस्त झाले.
सध्या बौद्ध यात्रेकरूंचे ते एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे.
लेखक : शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/25/2020