कुर्नूल. आंध्र प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १,३६,७१० (१९७१). आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेनंतर ही काही काळ त्याची राजधानी होती. हिंद्री-तुंगभद्रा संगमावर हे वसले असून, सिकंदराबाद–द्रोणाचलम् रेल्वेमार्गावर सिकंदराबादपासून २४२ किमी. आहे. विजयानगरच्या अच्युतरायने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष व पहिल्या मुसलमान सुभेदाराची १६१८ मधील कबर हिंद्रीकाठी आहे. येथे तांदूळ सडण्याच्या, कापूस पिंजण्याच्या, तेलाच्या व पिठाच्या गिरण्या असून सतरंज्या, भरड सुती कपडा, कातडी कमावणे, वनस्पती तूप, साबण, पाट्या, पेन्सिली इत्यादींचे उद्योग आहेत. यांशिवाय चटया व नवारी विणणे आणि अत्तरे बनविणे हेही कुटिरोद्योग येथे चालतात. आसमंतातील ज्वारी, कापूस, भात व मिरची इ. शेतमालाची ही मोठी बाजारपेठ असून येथे दळणवळणाच्या उत्तम सोयी आहेत. तीन महाविद्यालये, इतर शिक्षणसंस्था व हातमागशिक्षण केंद्र आहे.
आंध्र प्रदेशातील अश्मयुगीन गुहांबद्दल व अवशेषांबद्दल हे प्रसिद्ध आहे. भावनसी व तुंगभद्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या परिसरांत इ. स. पू. २५००० वर्षांपूर्वीचे विविध प्रकारचे अश्मयुगीन अवशेष अलीकडे उपलब्ध झाले. प्राचीनतम अश्मयुगातील गुहा भारतात थोड्या आहेत. कुर्नूलजवळ बिल्ल सुर्गम या गुहासमूहात अश्मयुगातील दगडी हत्यारे, सस्तन प्राण्यांचे जीवाश्म, मासे पकडण्याचे हाडांचे गळ इ. वस्तू मिळाल्या. १९१४-१५ च्या सुमारास रॉबर्ट ब्रूस फूट यांनी त्यांचे संशोधन केले. त्यांच्या मते हाडांच्या वस्तू फ्रान्समधील अश्मयुगीन मॅग्डेलेनियम संस्कृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. फूटनंतर पुढे काही वर्षांनी एल्. ए. कॅमेड व एम्. सी. बर्किट यांना अश्मयुगातील हत्यारांबरोबरच आंतराश्मयुगातील गारगोटीच्या छोट्या छिलक्यांची हत्यारे मिळाली, मात्र बी. एस्. गुहा यांनी या परिसरात१९५७-५८ मध्ये केलेल्या उत्खननात हत्यारे वा जीवाश्म मिळाले नाहीत. एन्. इझाक यांनी १९६० मध्ये वरील परिसराची पाहणी करून संशोधन केले. त्यांच्या मते येथील सूक्ष्म अश्मयुगीन हत्यारे काळजीपूर्वक केलेली असून ती हातकुऱ्हाड संस्कृतीमधील असावीत त्यांच्या काळ सोहन संस्कृतीपर्यंत नेणे हे आश्चर्यकारक वाटले, तरी अतिशयोक्तीचे नाही. कारण तेथे अश्मयुगाच्या तीन अवस्था स्पष्ट दिसतात. अशा प्रकारची हत्यारे भारतात इतरत्र क्वचितच आढळतात.
संदर्भ : 1. Foote, R. B. The Foote Collection of Indian Prehistoric and Protohistoric Antiquities, Madras, 1916.
2. Isaac, N. The Stone Age Culture of Kurnool, PoonaUniversity, Poona, 1960.
लेखक : शा. नि ओक.; शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/11/2020