वायव्य फ्रान्समधील पूर्वाश्म संस्कृतीचे सुप्रसिद्ध केंद्र व एक नगर. लोकसंख्या १,६०६ (१९६२). फ्रान्सच्या वायव्येस ऑरेच्या नैर्ऋत्येस १४ किमी. वर ब्रिटनीच्या किनाऱ्यावर हे खेडे वसले आहे. या ठिकाणी इ.स.पू. दुसऱ्या सहस्त्रकातील विविध तऱ्हेची अश्मवर्तुळे आणि थडगी सापडली आहेत. काही किलोमीटर लांब उभी केलेली दगडांची रांग हे कारनॅकचे वैशिष्ट्य असून त्यांतील काही दगड सहा मीटर उंचीचे आहेत. त्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रचंड उभ्या दगडांच्या रांगा, अश्मपेटिका, दगडी बांधणीच्या खोल्या, भुयारे इ. प्राचीन अवशेष असून ह्या संस्कृतीचा स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड व आयर्लंड या देशांशीही तसेच ग्रीसमधील मायसीनी या संस्कृतीशीही संपर्क आला होता असे दिसते. उत्खननांत या थडग्यांबरोबरच घंटेच्या आकाराच्या धारदार दगडी कुऱ्हाडी, गारगोटीच्या (फ्लिंट) दगडाची हत्यारे, बाणाची टोके इ. विविध अवशेष मिळालेले आहेत. अद्यापि या संस्कृतीचे पूर्णतः अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. येथे १९०० ते १९४० च्या दरम्यान उत्खनन झाले. त्यात मिळालेल्या अवशेषांचे व इतर वस्तूंचे वस्तुसंग्रहालय इथे आहे.
संदर्भ : Daniel, G.E.The Prehistoric Chamber Tombs of France, London, 1960.
लेखक : शां भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
मध्य ईजिप्तमधील नाईल नदीच्या पूर्वकाठी वसलेले प्रा...