उत्तर प्रदेश राज्याच्या फरूखाबाद जिल्ह्यातील नगर. लोकसंख्या २८,१८७ (१९७१). हे कानपूरच्या उत्तरेस ८१ किमी. उत्तर रेल्वेचे स्थानक आहे. याची कुशस्थल, गाधिपुर, कुशिक, कुसुमपुर इ. नावेही प्राचीन साहित्यात व लेखांत आढळतात. रामायणातील आख्यायिकेनुसार याची स्थापना रामपुत्र कुश याच्या कुशनाभ पुत्राने केली असून याचे महोदय असे नाव होते. कुशनाभाच्या कन्यांनी वायुदेवाची मागणी नाकारल्यामुळे त्यांना कुब्जत्व प्राप्त झाले; त्यावरून याला कान्यकुब्ज असे नाव पडले असावे, अशी आख्यायिका मिळते. याचे कनोगिजा व कनगोर असे उल्लेख टॉलेमीने केले आहेत. हर्षवर्धनाच्या काळी ही त्याची राजधानी होती; ह्युएनत्संगने तेथे भरलेल्या धर्मपरिषदेचे वर्णन लिहून ठेवले आहे. प्रतिहारांच्या कारकीर्दीत ही नगरी पुन्हा उर्जितावस्थेस आली होती. अकराव्या शतकात मुहंमद गझनीने जयचंद राठोडाचा पराभव केला व तेव्हापासून कनौज मुसलमानांकडे गेले. पुढे मोगल कारकीर्दीत हे भरभराटलेले शहर होते. येथील जुन्या टेकाडांत व परिसरात भूवराह, कल्याणसुंदर, शिवमुखलिंगे, नृत्यगणेश व विश्वरूप विष्णू इ. सातव्या व आठव्या शतकांतील उत्कृष्ट शिल्पे मिळाली आहेत. ह्याशिवाय जौनपूरच्या सुलतानाने हिंदू देवळांच्या दगडांनी बांधलेली जामा मशीद, जैनस्तंभ असलेली मशीद, सीताकी रसोई इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. पूर्वी शहराला लागून वाहणाऱ्या गंगेचे पात्र आता बरेच दूर गेले आहे. जुन्या पात्राच्या काठावर आता प्राचीन नगरीतील पडक्या इमारतींचे अवशेष दिसतात. अत्तरे, गुलाबपाणी इ. सुगंधी पदार्थांकरिता तसेच गुलकंदासाठी कनौज प्रसिद्ध आहे.
संदर्भ : दीक्षित, रामकुमार, कनौज, लखनऊ, १९५५.
लेखक : शा. नि ओक.; शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/13/2020