कर्नाटक राज्यातील चालुक्यकालीन मंदिरांचे प्रसिद्ध स्थळ. विजापूर जिल्ह्यात बदामीच्या ईशान्येस सु. २४ किमी. वर आहे ह्याचे आर्यावर्त, अय्यापोलिल, आय्याओले, एवल्ली यांसारखे उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतात. दुसऱ्या पुलकेशीच्या शिलालेखात (६३४) त्याचा ‘ऐय्याओले’ असा उल्लेख आला आहे. त्यावरूनच पुढे एवल्लि-ऐहोळे असे नामांतर झाले असावे, असे म्हटले जाते.
येथे पाचव्या ते सातव्या शतकाच्या दरम्यान ७० मंदिरे होती. त्यांपैकी अवशिष्ट मंदिरांत लाडखान, दुर्गा, हुच्चिमल्लीगुडी, कोंतकुडी, गलगनाथ, मेगुती वगैरे काही आणि शैव न जैन गुंफा सुस्थितीत आहेत. बहुतेक मंदिरे हिंदुधर्माची असून मेगुती हे मंदिर जैनधर्मीय आहे. येथील वास्तुशिल्पकला द्राविड व नागरशैली यांच्या मिश्रणातून निर्माण झाली असून मंदिरांची छते गुप्तशैली दर्शवितीत, तर स्तंभयुक्त सभामंडप पूर्णत: चालुक्यशैलीचे निदर्शक दिसतात. लाडखान हे सर्वात प्राचीन मंदिर (पाचवे शतक) असून त्यातील सपाट छप्पर, नक्षीदार दगडी जाळ्या आणि गर्भगृहाभोवतीचा प्रदक्षिणापथ वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या प्रवेशस्तंभावर सातवाहन शिल्पशैलीतील आणि गुप्त आकृतिबंधातील नदीदेवतांची आणि यक्ष-गंधर्व मिथुनांची शिल्पे आढळतात. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुलाकृती आहे. क्वचित काही ठिकाणी बौद्ध चैत्यगृहाचे अनुकरण दिसते. हुच्चिमल्लीगुडी मंदिराचे विधान काटकोन-चौकोनी असून गर्भगृहासमोर अंतराल आहे. ह्यातही बौद्धचैत्यगृहाचे अनुकरण दिसते. मेगुती मंदिराच्या बांधणीस गुप्त व द्राविडशैलीची छाप दिसते. दुसऱ्या पुलकेशीने पल्लवांबरोबर सुरू केलेला संघर्ष पुढे कित्येक वर्षे चालू राहिला. त्यामुळे पल्लवांची छाप येथील वास्तुशिल्पावर पडली. एवढेच नव्हे तर येथील शैव गुंफा पल्लवांनीच खोदली. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात.
संदर्भ : 1. Cousens Henry, The Chalukyan Architecture of the Kanerese Districts, Calcutta, 1926.
2. Govt. of India, Temples of South India, Delhi, 1960.
लेखक : शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/23/2020