एक प्राचीन भारतीय नगर. महाभारतात उल्लेखिलेल्या उत्तर पंचाल देशाच्या राजधानीचे गाव. ह्याचे अवशेष उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील रामनगर ह्या गावी सापडले आहेत. प्राचीन साहित्यात त्याची छत्रवती, अहिच्छत्रा, अहिक्षेत्र, अदिस्दर, अधिच्छत्र वगैरे नामांतरे आढळतात. येथील अवशेषांची प्राथमिक पाहणी कनिंगहॅम यांनी १८६२ मध्ये केली आणि त्यानंतर पुढे १९४०–४४ मध्ये कृ. ना. दीक्षित यांनी तेथे उत्खनन केले. त्या उत्खननांत इ.स.पू. ३०० ते इ.स. १०-११ वे शतक ह्या विविध कालखंडांतील सु. नऊ वस्त्या वा स्तर उपलब्ध झाले आहेत. त्यांतील सर्वांत प्राचीन वस्तीत मातीच्या
वास्तू, राखी रंगाच्या मातीच्या थाळ्या व लेखविरहित नाणी सापडतात; तर नंतरच्या स्तरांत विटांच्या वास्तू व पंचाल नाणी मिळतात. येथील कुषाणकालीन वास्तू व मृत्पात्रेही उल्लेखनीय आहेत. गुप्तकाळातील स्तर-अवशेषांत विटांची देवळे, काही नाणी व शाडूच्या मूर्ती सापडल्या. त्या वैशिष्ट्यपूर्ण असून त्यानंतरच्या काळातील स्तरांत जीवमान खालावल्यासारखे दिसते. पंचाल कालात शहराभोवती मातीची तटबंदी असावी; तथापि त्याचे अधिक वास्तुकलात्मक तपशील अद्यापि उपलब्ध झाले नाहीत.
लेखक : शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020