मानवाने हेतुत: मांडलेल्या वा रचलेल्या दगडांच्या वर्तुळांना मिळालेली सामान्य संज्ञा. अशी वर्तुळे जगातील बहुतेक देशांत सापडली आहेत आणि त्यांच्या मूळ उद्देशानुसार त्यांना निरनिराळी नावेही आहेत. ती कोणत्याही एकाच कालखंडातील नाहीत. मृतांचे दफन, यज्ञयाग, बलिदान, कालमापन, ज्योतिषविषयक गणिते अशा विविध कार्यांच्या संदर्भात त्यांचा उपयोग होत असे.
भारतात आंध्र आणि तमिळनाडू राज्यांत मध्याश्मयुगीन अश्मवर्तुळे सापडली आहेत. मोठमोठ्या ग्रॅनाइट दगडांच्या ६ ते ९ मी. व्यासाच्या वर्तुळात मानवी सांगाडे पुरण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारांत दगडगोट्यांच्या वर्तुळाभोवती मोठमोठे दगड परिघरेषेवर ठेवीत. यूरोपात अशी अश्मवर्तुळे फार प्राचीन काळची आहेत. भारतातील अश्मवर्तुळांचा काल मात्र इ.स.पू. ३ रे शतक असा बराच अलीकडचा येतो.
लेखक : शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/14/2020