(को-हेंप, कुडझू हेंप; इं. कुडझू व्हाइन; लॅ. प्युरॅरिया लोबॅटा; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही कणखर व जलद वाढणारी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), काहीशी केसाळ, ओषधीय [ ओषधि] वेल मूळची चीन व जपान येथील असून हल्ली तेथे भरपूर लागवडीत आहे. अलीकडे भारतात आणि इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत हिची लागवड केली जाते.ही जमिनीसरपट वाढते,तसेच आधारामुळे उंचीवरही पसरते. हिची मोठी संयुक्त व त्रिदली पाने आणि कोवळ्या फांद्या खाद्य असून लांब (१२ सेंमी.), ग्रंथिल मुळापासून भरपूर पिष्टमय खाद्यपदार्थ मिळतो. हिची सामान्य शारीरिकलक्षणे लेग्युमिनोजी(उपकुल-पॅपिलिऑनेटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात [ अगस्ता]. पानांच्या बगलेत एप्रिल–जूनमध्ये येणाऱ्या २०–५० सेंमी. लांब मंजरीवर सुगंधी, अंजिरी किंवा निळसर फुले असतात. शिंबा (शेंग) सपाट, आयत, अरुंद, ५–१० सेंमी. लांब व केसाळ असून तिच्यात ८–२० बिया असतात.
ही वेल प्रथम १९२६ मध्ये भारतात आणली गेली व तिची लागवड बिहारमध्ये यशस्वी रीत्या केली गेली; तिचा उपयोग चारा, हिरवळीचे खत व जमिनीत ओलावा राखून धुपण्यापासून तिचे संरक्षण यांकरिता होतो असे अनुभवास आले. परंतु म्हैसूर,कूर्ग, द. कारवार व पुणे इ. ठिकाणी त्याउलट अनुभव आला. मलाया व विषुववृत्तीय आफ्रिका येथेही तोच अनुभव आला. उत्तर प्रदेशात व दिल्लीत त्यामानाने लागवड बरी झाली. साधारण ओलसर, उपोष्ण व उबदार समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात या कुडझूची लागवड भूसंरक्षण व हिरवळीचे खत यांकरिता चांगली होते. हिची अभिवृद्धी (लागवड) बिया व मुळे फुटलेले खोडाचे तुकडे यांनी करतात; भारतात फुले येऊन बिया मिळणे दुरापास्त असते, त्यामुळे कलमे लावूनच जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान लागवड करतात. बहुतेक गवत व इतर शिंबावंत पिके चांगली वाढत नाहीत अशा जमिनीत व हवामानात कुडझू चांगली वाढत असल्याने, तसेच खोल जाणाऱ्या मुळांनी जमीन बांधविली जात असल्याने तिची लागवड चांगली ठरते; शिवाय पालापाचोळा जमिनीत गाडल्याने तिची सुपीकता वाढते. पुसा (बिहार) येथील जमिनीत मुळांवरच्या सूक्ष्मजंतूयुक्त गाठींची वाढही चांगली होते, त्यामुळे जमिनीत नायट्रेटाचे प्रमाण वाढते असे आढळून आले आहे. कोंबड्या व पाळीव जनावरांना कुडझूचा चारा उत्तम ठरला आहे. अनुकूल परिस्थितीत वाढविलेल्या पिकांची ग्रंथिल (गाठाळ)मुळे शिजवून भाजीकरिता वापरतात. सुक्या मुळांपासून काढलेल्या पिठात ४०टक्के स्टार्च असून तो कसावाच्या [टॅपिओका] स्टार्चप्रमाणे अन्नात व औषधात वापरता येतो. चीन व जपान येथे को-फेन नावाचे पीठ बनवितात; ते गोड व गंधहीन असून त्याची कांजी करतात. कुडझूच्या मुळांचा काढा जपानात सर्दी, ज्वर व आमांश ह्यांवर देतात. कोवळ्या फांद्या दुग्धवर्धक असतात. फांद्यांपासून मिळणाऱ्या धाग्यांचे दोर व साधे जाडेभरडे कापड बनवितात.
(लॅ. प्यु. फॅसिओलॉइडिस). ही कुडझूची दुसरी जाती, एक काष्ठमय वेल (महालता) असून कुमाऊँ ते आसाम व पुढे ब्रह्मदेश, मलाया व चीन येथे तिचा प्रसार आहे. उष्णकटिबंधातील हवामानात हिची वाढ वरच्या जातीपेक्षा अधिक चांगली होते त्यामुळे तेथे तिची लागवड अधिक फायदेशीर होते. रबर, लिंबे व नारळ यांच्या मळ्यांतील अर्धवट सावलीतील जमिनीतही ह्या कुडझूचे पीक येते. चारा, हिरवळीचे खत व भूसंरक्षण या दृष्टीने हिची यशस्वी लागवड भारतात (कर्नाटक, कूर्ग, वायनाड, अन्नमलई व उत्तर प्रदेश येथे) करण्यात आलेली आहे. कमी पावसाच्या प्रदेशात उन्हाळ्यात फुले, फळे व बिया येतात. आग्नेय आशियातील काही भागांत मुळे चांगली येतात व ती तेथे भरपूर खाल्ली जातात. खोडांपासून काढलेल्या धाग्यांपासून चांगला दोरा व दोऱ्या बनवितात. गळवे व व्रण यांवर कुडझूचा उपयोग करतात.
घोडवेल : (दारी; इं. इंडियन कुडझू; लॅ. प्यु. ट्युबरोजा) ही कुडझूची तिसरी जाती भारतातील काही ठिकाणी लागवडीत आहे . [ घोडवेल].
लेखक : शं.आ.परांडेकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/29/2020
घोडवेल : (दारी; हिं. बिलाइकंद; गु. विदारीकंद; क. ग...