অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओक

ओक

फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो. भारतात आढळणार्‍या ओक या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्वर्कस इन्फेक्टोरिया आहे. आतापर्यंत क्वर्कस या प्रजातीच्या सु. ६०० जाती आढळल्या आहेत. ओकच्या बहुतांशी जाती उत्तर गोलार्धातील उष्ण प्रदेशात आढळल्या असून भारतात केवळ ३० जाती माहीत झाल्या आहेत.

ओक वृक्षाची वाढ अतिशय मंद गतीने होते. साधारण वीस वर्षांनंतर याला फुले येतात. बरेचसे वृक्ष २०० ते ४०० वर्षे जगतात. काही वृक्ष तर ८०० वर्षांहूनही जास्त जगल्याचे आढळले आहे. या वृक्षांची उंची १३० मी. पेक्षा अधिक आढळली आहे.

भारतात आढळणार्‍या ओक वृक्षाची उंची २-५ मी. असून साल करड्या रंगाची असते. पाने साधी, ४-६ सेंमी. लांब, दातेरी व पिवळसर असतात. फुले लहान, एकलिंगी व एकाच झाडावर असतात. नरफुले अनेक व लोंबत्या कणिशावर, तर मादीफुले एकटी किंवा दोन-तीनच्या झुबक्याने येतात. फळे कठिण कवचाची असून फळांच्या बुडाला कपाच्या आकाराचे कवच असते. म्हणून या फळांना शंकुकवची फळे असेही म्हणतात. फळे रंगाने तपकिरी, पिवळी, आकाराने गोल किंवा लंबगोल व एकबीजी असतात. फळे ६ ते १६ महिन्यांत पिकतात.

हिमालयीन ओक वृक्षाची फळे पाचक, शीतल, स्तंभक आणि बद्धकोष्ठकारी असतात. पित्त, खोकला, अंतर्गत रक्तस्त्राव, अतिसार, हगवण व तोंड येणे इत्यादींवर ओकची फळे गुणकारी ठरतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. केशकलप करण्यासाठीही या फळांतील रंग वापरतात.

ओक वृक्षाचे लाकूड बळकट व टिकाऊ असून जळण, घरबांधणी, जहाजे, शेतीची अवजारे, लाकडी पूल, रेल्वेचे तळपाट (स्लिपर्स), लाकडी पिंपे, सजावटी सामान आणि काठ्या बनविण्यासाठी वापरतात. तसेच या लाकडापासून कागद आणि बुचे तयार करतात.

 

लेखक - लाळे वि. ज्ञा.

स्त्रोत:  कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate