ऐन २४-३० मी. पर्यंत उंच वाढतो. या वृक्षाची साल जाड, करडी-काळसर असून त्यावर उभ्या–आडव्या लांबट रेषा असतात. पाने मोठी, साधी, समोरासमोर, अंडाकृती व आखूड देठाची असून थोडी लवदार असतात. फुले फिक्कट पिवळ्या रंगाची असून उन्हाळ्यात स्तबकात येतात. फळे आठळीयुक्त व पिवळसर असून त्यांच्यावर आडव्या रेषा असतात. पाने मार्च महिन्यात गळतात व नवीन पाने जूनमध्ये येतात.
लाकडाचा बाहेरचा भाग तांबूस पांढरा तर मध्यभाग काळसर तपकिरी असतो. ऐनापासून मिळणारे लाकूड कठिण, मजबूत व टिकाऊ असते. सागाप्रमाणेच या लाकडाचा उपयोग जहाजबांधणी, शेतीची अवजारे, घरबांधणी इत्यादींकरिता होतो. तसेच जळण व कोळसा बनविण्यासाठीही हे लाकूड वापरतात. ऐनाच्या सालीपासून टॅनीन व काळा रंग मिळतो. साल व फळे संग्रहणी व अतिसार अशा विकारांवर औषध म्हणून देतात. तसेच जखमांवर पाण्यात उगाळून लावतात.ऐनाच्या फांद्यांपासून लाख व पिंगट रंगाचा डिंक मिळतो. या डिंकाचा उपयोग धुपासारखा होतो. तसेच सौंदर्यप्रसाधनांतही याचा वापर केला जातो. टसर जातीच्या रेशीम कीटकांच्या अळ्यांच्या संवर्धनासाठी ऐनाच्या पानांचा वापर करतात. कर्नाटक राज्यातील बंदिपूर राष्ट्रीय वनात वास्तव्यास असणारे काही रहिवासी उन्हाळ्यात या वृक्षाच्या खोडात साचलेले पाणी पिण्यासाठी वापरतात. पोटदुखीवर हे पाणी गुणकारी असते, असा एक समज आहे.
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020