(कडू वृंदावन, इंद्रफळ; हिं. माकल, घोरंबा; गु. इंद्रक; क. तुमटीकाई; सं. चित्रफला, महेंद्रवारुणी; इं. बिटर अॅपल, कोलोसिंथ; लॅ. सिट्रुलस कोलोसिंथस; कुल-कुकर्बिटेसी). जमिनीवर पसरणारी किंवा वर चढणारी ही वेल विशेषेकरून जंगलात आढळते. भारत (कोकण, दख्खन, गुजरात; विशेषतः समुद्र किनारी) व उष्णकटिबंधातील इतर देशांत ही आढळते. हिची अनेक शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; पाने मोठी व खंडित; फुले मध्यम, बाहेरून हिरवी व आतून पिवळी; मृदुफळ ५·८ सेंमी. व्यासाचे, गोलसर, हिरवट, गुळगुळीत; मगज (गर) रसाळ, तांबूस अथवा पिवळसर, चव अत्यंत कडू; बीजे फिकट पिंगट, लांबट व लहान; वाळलेला मगज हेच ‘कोलोसिंथ’ औषध होय; तो कडू व रेचक असून अधिक घेतल्यास वेदना होऊन शौचास रक्त पडते. मूळ उगाळून वा फळाचा मगज कुचल्याबरोबर गळवे व फोडांवर लावतात. गूळ, मिरी व मुळाचा समभाग घालून बनविलेल्या गोळ्या संधिवातावर देतात. मगज पित्तशामक, ज्वरशामक व कृमिनाशक; बियांपासून मिळणारे तेल दिव्याकरिता वापरतात.
कडू इंद्रायण : (१) स्त्री-पुष्प व पुं-पुष्प यांसह फांदी; (२) फळ
लेखक : व. ग. क्षीरसागर,
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.