অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंगळी

इंगळी

 

(सतफल, समुद्रफळ, निवर; हिं. हिज्जल; क. केंपुकणगिन; सं. धात्रीफल, विषया; इं. स्मॉल इंडियन ओक; लॅ. बॅरिग्टोनिया ॲक्युटँग्युला, कुल-मिर्टेसी). सु.  १०–१५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने, पाणथळ जागी व समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतो; शिवाय श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश, उ. ऑस्ट्रेलिया इ. भागांतही तो आढळतो. साल जाड, गर्द तपकिरी; पाने साधी, लहान देठाची, चिवट, दातेरी, लंबगोल पण तळाशी निमुळती, एकाआड एक, ७·५० – १३ × ५ सेंमी.; फुले लहान, लाल, सुगंधी व लोंबत्या मंजरीवर एप्रिल-मे महिन्यांत येतात. संदले व प्रदले प्रत्येकी चार, केसरदले अनेक, लांब व लाल; किंजपुट अधःस्थ [→ फूल; मिर्टेसी]. मृदुफळ २·५ - ४ × १·८ सेंमी. सूत्रल (तंतुयुक्त), जाड सालीचे, एकबीजी, चौधारी व लंबगोल. ह्या वृक्षाची जून पाने व मुळे कडू पण पौष्टिक; बीजचूर्ण कफोत्सारक व वांतिकारक असून डोकेदुखीवर तपकिरीप्रमाणे ओढतात. साल, बी व मूळ मत्स्यविष; पानांचा रस अतिसारावर देतात. साल कातडी कमावण्यास वापरतात. लाकूड मऊ पण टिकाऊ असून ते नावा, विहिरीचा कठडा, कपाटे, गाड्या, किरकोळ सजावटी सामान इत्यादींकरिता उपयोगात आहे.शोभेकरिता हा वृक्ष बागेत लावतात.
लेखक : वि. प. दोंदे
स्रोत : मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate