अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे होत असतात. अशा म्हणजे जीवोपजीवी जीवांच्या क्रियेखेरीज इतर कारणांनी होणाऱ्या रोगांचा समावेश अजीवोपजीवीजन्य रोगांत केला जातो. या रोगांमुळे वनस्पतींच्या कोशिकाक्रियांत बिघाड होतो. व्हायरसजन्य रोगांपेक्षा हे रोग भिन्न असतात. कारण हे बहुधा परिस्थितिजन्य असून संक्रामक (फैलावणारे) नसतात. या रोगांची अनेक कारणे आहेत, ती अशी : (१) वनस्पतींच्या वाढीला पोषक तापमान नसणे—तापमान अति-उष्ण अथवा अतिशीत असल्यास प्रत्येकाची भिन्न लक्षणे निरनिराळ्या पिकांवर आढळतात. (२) योग्य प्रकाशाचा अभाव. (३) पोषक हवामानाची अथवा ऑक्सिजनाची न्यूनता (कमतरता). (४) दूषित हवामान. (५) मातीतील आर्द्रता कमी किंवा अधिक असणे. (६) मातीतील कार्बनी पदार्थांच्या विघटनामुळे उद्भवणारे विषारी पदार्थ. (७) पोषक व घटक द्रव्यांची उणीव वा आधिक्य. (८) पीक संरक्षणात तीव्र कवकनाशके व कीटकनाशके यांचा उपयोग. (९) इतर कारणे.यांपैकी एक अथवा अधिक कारणे वनस्पतीच्या वाढीच्या काळात आढळल्यास त्यांचा वनस्पतीवर परिणाम होऊन निरनिराळी लक्षणे उद्भवतात. म्हणूनच या प्रत्येक कारणाचा स्वतंत्ररीत्या विचार कारावा लागतो.
वनस्पतीच्या वाढीस पोषक तापमान नसणे
तीव्र तापमानाचा बऱ्याच वनस्पतींवर परिणाम होतो. नारळीच्या व पोफळीच्या झाडांना दक्षिण लागते (म्हणजे दक्षिणायनातील ऊन बाधते). हे लक्षण कोकणात नेहमीच आढळते. उन्हाच्या तिरपेमुळे खोडावर लांबसर अशा खाचा पडून झाड कमजोर बनते व वादळी वाऱ्यामुळे कोलमडते. कित्येक वनस्पतींवर शेंडा जळणे, भाजल्यासारखे चट्टे पडणे, गाभा काळा पडणे इ. लक्षणे तीव्र तापमानामुळे होतात. पानवेलीची पाने टोकापासून तांबूस होऊन वाळल्यासारखी दिसणे हा उन्हाच्या तडाख्याच्या परिणाम आहे. म्हणून पानमळ्यात गारवा ठेवतात. पाश्चिमात्य देशांत सफरचंदाच्या फळावर भाजल्यासारखे खोलगट चट्टे उन्हाळ्यात तापमान ३८० से. पेक्षा जास्त असल्यामुळे पडतात. त्यामुळे फळांचे अपिरिमित नुकसान होते. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम नाजूक फळे व भाजीपाल्यावरही होतो. गाभुळलेली फळे भाजल्यासारखी करपून त्यांवर खोलगट खड्डे पडतात. कांदेबटाट्यांच्या साठवणीच्या वेळी ऐरणीत अथवा गुदामात तापमान जास्त झाल्यास बटाट्याच्या गाभ्यात काळसरपणा आढळतो. अशा बटाट्यास कीड लवकर लागते व त्यास वेणे म्हणून किंमत कमी येते. शीत तापमान किंवा थंडी वा गारठा एकाएकी पडल्यास वनस्पतींवर विपरीत परिणाम झालेले आढळतात. बटाटे शीतगृहात शून्य ते पाच अंश से. तापमानात ठेवल्यास खराब होतात. त्यांतील स्टार्चाचे शर्करेत रूपांतर होते व आतील भाग काळपट होतो. कित्येकदा आत ‘बांगडी’ ही आढळते पण ही बांगडी सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या बांगडीपेक्षा निराळी असते. यातील वाहकवृंद (वनस्पतीच्या अन्नरसाची ने-आण करणारे जुडगे) काळे पडतात. कित्येकदा बांगडी उशिरा आढळते किंवा आतील गाभा करड्या रंगाचा होऊन खाच पडल्यासारखे चट्टे निर्माण होतात. थंडीच्या कडाक्यामुळे पाने, फुले, मोहोर करपतात. हा परिणाम केळी, फुलझाडे व इतर नाजूक वनस्पतींवर होतो. हळद व द्राक्षावरही असाच परिणाम होतो.
याशिवाय धुक्याचा परिणाम, विशेषत: फळबागांवर, तीव्र प्रमाणात झालेला आढळतो. कडाक्याची थंडी व धुके यांमुळे द्राक्षबागा उध्वस्त होतात. असाच परिणाम केळी, संत्री, मोसंबी व कॉफी या झाडांवरही होऊन ती कुजतात अथवा शेंडा करपून कुजावयास लागतो. बागायतदार शेतीस पाणी देऊन, पालापाचोळा रात्री जाळून बागेत धूर करतात. त्यामुळे बागांचे धुक्यामुळे होणारे नुकसान टळते.
योग्य प्रकाशाचा अभाव
वनस्पतीच्या वाढीस सूर्यप्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते; त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. याउलट, योग्य प्रकाश नसल्यास वाढ संपूर्णतया होत नाही. काचगृहात, अंधुक प्रकाशाच्या जागेवर लावलेल्या वनस्पती अथवा ढगाळलेल्या वातावरणात वाढणारी रोपे एकंदरीत कमजोर होतात. त्यांच्या पानांतील हिरवेपणा नष्ट होतो. खोडावरील पेऱ्यांतील अंतर वाढते व पाने फिकट पोपटी होतात. म्हणूनच अशी झाडे नाजूक बनतात.
पोषक हवामानाची अथवा ऑक्सिजनाची न्यूनता
कित्येकदा पोषक हवामान अथवा ऑक्सिजन योग्य प्रमाणात काही वनस्पतींस न मिळाल्यास, तसेच वाहतुकीस किंवा साठवणीत त्या ठेवल्यानंतर त्यांवर विशिष्ट परिणाम झालेले दिसतात. विशेषत: बटाटे काढताना, त्यांच्या वाहतुकीच्या व साठवणीच्या जागी त्यांवर काळ्या गाभ्याचा रोग पडतो. हा रोग जमिनीतून बटाटे काढण्याच्या वेळी तापमान जास्त असल्यामुळे, वाहतुकीच्या वेळी जास्त तापमान (३८०-४०० से.) आढळल्यामुळे अथवा साठवणीत हवेचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे होतो. त्यामुळे ऑक्सिजनाची न्यूनता होते व गाभ्यातील कोशिका एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) क्रियेमुळे विघटित होऊन गाभा निळसर काळा पडण्यास सुरुवात होते. नंतर तेथील ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या शरीराच्या सूक्ष्म घटकांचा म्हणजे कोशिकांचा समूह) वाळते व आत काळ्या खाचा पडलेल्या दिसतात. लहानसर बटाट्यांवर हे प्रमाण कमी आढळते. यासाठी वेळीच काढणी करावी, थंड वेळेस बटाट्यांची वाहतूक करावी, तसेच बटाट्यांची पोती एकमेकांवर ढिगात न ठेवता अलग अशी व हवेशीर जागी ठेवावी.
दूषित हवामान
औद्योगिक कारखान्यांमधून अनेक विषारी वायू निघत असतात. त्यांमुळे हवामान दूषित होते. याचा परिणाम परिसरात वाढणाऱ्या वनस्पतींवर तीव्रतेने होतो. विशेषत: हरितद्रव्यनिर्मितीत अडथळा येऊन वनस्पतींचे पोषण नीट होत नाही, त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळट पडतात व फुले आल्यास ती गळतात. कित्येकदा फळे पिकत नाहीत. त्यांतील शर्करा व स्टार्चाचे प्रमाण कमी होते व उत्पादनात घट येते. असे विषारी वायू प्रामुख्याने सल्फर डाय-ऑक्साइडासारखे असतात. सल्फर डाय-ऑक्साइडामुळे पाने फिकी पडून तांबूस होतात व गळतात. फळे अपरिपक्व राहतात व आतील गाभ्यात करपतात. फळबागांवर याचा फारच तीव्र परिणाम होतो. आंब्याच्या फळांचा करपा, केळी व द्राक्षवेली करपणे इ. प्रकार प्रकर्षाने आढळतात. अशी लक्षणे हंगामी, वर्षायू (एक वर्ष जगणारी), बहुवर्षायू (पुष्कळ वर्ष जगणारी) फुलझाडे व फळभाज्यांवरही आढळतात.
मातीतील आर्द्रता कमी किंवा अधिक असणे
वनस्पतीतील कोशिकांचा योग्य आकार टिकविण्यासाठी तसेच मूलघटकद्रव्ये विरघळण्यासाठी जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा हवा. मातीत पुरेशी आर्द्रता नसल्यास झाडाची वाढ खुं टते,झाड खुजे बनते, फळाची पक्वता लवकर येते व झाड वाळते; बी पेरल्यानंतर आर्द्रता नसल्यास बी सुरकुतते. मातीत जास्त पाणी साचल्यास उगवण कमी होते व रोपांची वाढ खुंटते. मातीतून मुळांस ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे ती कमजोर बनतात, त्यांची वाढ खुंटते व फिकट पडतात. मातीतील कमीअधिक आर्द्रतेमुळे कित्येक उपयुक्त वनस्पतींवर निरनिराळे रोग पडतात. बटाट्याचा कोरडी कूज हा रोग मातीत पुरेशी आर्द्रता नसल्याने होतो. त्यामुळे गाभ्यात अनियमित आकाराचे डाग उद्भवतात. सफरचंदाच्या फलावर खोलगट चट्टे पडतात. प्रारंभी ते पाणेरी, गर्द वा फिकट हिरवे असून नंतर तपकिरी होतात. अशी फळे चवीला कडवट लागतात. फळे तयार होण्याच्या वेळी हवेतील आर्द्रतेत वेळोवेळी चढउतार झाल्याने फळांवर असा परिणाम दिसतो. मातीतील आर्द्रता कमी झाल्यास टोमॅटोच्या देठावरही चट्टे पडून कूज आढळते. लिंबूवर्गीय फळझाडांना सल लागण्याचे एक कारण काळ्या जमिनीतून पाण्याचा पूर्ण निचरा नसणे हे मानले जाते. त्यामुळे झाड शेंड्यापासून एकाएकी वाळण्यास सुरुवात होते. शेंड्याजवळील पानांचा टवटवीतपणा नष्ट होऊन ती तांबूस, नंतर पिवळसर होतात व वाळतात. भाताच्या शेतात दीर्घ काळ पाणी साचून राहिल्यास पानांचा टवटवीतपणा नष्ट होऊन ती तपकिरी होतात. कडेपासून वाळतात, शेंडा कोमेजतो व बुंधा तपकिरी होतो. अशा रोगास ‘पानसूक रोग’ म्हणतात.
कार्बनी पदार्थांच्या विघटनामुळे उद्भवणारे विषारी पदार्थ
कित्येकदा धसकटे, पालापाचोळा यांसारखे वनस्पतींचे अवशेष शेतात कुजल्यामुळे काही विषारी पदार्थ निर्माण होतात. असे पदार्थ वनस्पतीच्या वाढीस उपद्रवकारक ठरतात. अशा कुजण्यापासून मेदाम्ल पदार्थ निर्माण होऊन रोपांवर परिणाम झालेला दिसतो. रोपे कुजून कोलमडणे, मूळ कूज, मर किंवा एखाद्या मूलद्रव्याच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या विकृती आढळतात.
मातीतील लवणे
मातीत लवणांचे प्रमाण कमीअधिक असते. त्यातील काही विद्राव्य (विरघळणारी) असतात. लवणांची विद्राव्यता मातीच्या पीएच मूल्यावर अवलंबून असते. कित्येक लवणे अम्ल जमिनीत अधिक विद्राव्य बनतात. त्यामुळे मातीतील मूलद्रव्यांत यांची भर पडून त्यामुळे वनस्पतीवर परिणाम होतो. मँगॅनीजाची लवणे अम्ल जमिनीतच अधिक विद्राव्य बनतात. त्यामुळे कपाशीसारख्या वनस्पतींची पाने पांढुरकी, चुरगळल्यासारखी व वाकडी होतात. तसेच पानाच्या शिरा जाड होऊन ठिसूळ बनतात. ज्या शेतात अधिक पाणी दिले जाते अशाच जमिनीत या लवणांचा संचय वाढतो. अम्लयुक्त जमिनीत असा प्रकार जास्त प्रमाणात दिसतो. परंतु अशा जमिनीत झाडास कॅल्शियम व मॅग्नेशियम कमी प्रमाणात मिळून त्यांच्या उणिवेचेही परिणाम झालेले दिसतात. लोह, बोरॉन व मँगॅनीज अधिक विद्राव्य झाल्यामुळे झाडांना इजा पोहचते. मातीतील इतर मूल्यद्रव्यांवरही याचा परिमाण झालेला आढळतो. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे मातीत कार्बनी विषे बनतात. त्यामुळे वनस्पतीच्या पोषणास नायट्रोजन व फॉस्फरस योग्य प्रमाणात मिळत नाहीत. नायट्रोजनाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात; क्वचित तांबूसही होतात. त्यामुळे पाने गळतात व वनस्पतींना कमी फुटवे येऊन फळे लहान व कठीणसर होतात. फॉस्फरसाच्या कमतरतेमुळे पाने फिकी पडतात. मॅग्नेशियम कमी प्रमाणात मिळाल्यास पानांच्या फक्त शिरा हिरव्या व इतर भाग फिका पडतो. बोरॉन अधिक प्रमाणात आढळल्यास कोशिका आकुंचन पावतात, पाने पिवळी पडून करपतात, फांद्या शेंड्यापासून सुकू लागतात व फळांवर खडबडीतपणा येतो.
मातीत क्षारकाचे (अल्कलीचे) प्रमाण जास्त आढळल्यास वनस्पतींच्या मुळांना कॅल्शियम, लोह, जस्त व बोरॉन ही मूलद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे पाने पांढुरकी होऊन निस्तेज बनतात. विशेषत: शेंड्याकडील पाने सुकण्यास सुरुवात होते व हे प्रमाण वाढत जाते. लोहाचे प्रमाण कमी झाल्यास पांढरीच्या जमिनीत लावलेल्या उसाची पाने पांढुरकी पडतात. फळांचा आकार लहान होतो व ती निस्तेज बनतात. जस्ताच्या उणिवेमुळे मोसंबीच्या पानांच्या शिरा हिरव्या व इतर भाग पिवळा बनतो. त्यामुळे पानांचा आकार व पेऱ्यांची लांबी कमी होते. अशीच लक्षणे सफरचंद, कोको व मका यांवर आढळतात. याउलट नायट्रोजनाचे प्रमाण वाढल्यास झाडांची वाढ खूप होते. त्यामुळे फलधारणा व पक्वता उशिरा होते. तृणधान्ये जमिनीवर लोळतात व अशी अमर्याद वाढ कवकजन्य रोग व कीड वाढण्यास पोषक बनते. तसेच पोटॅशियमाच्या शोषणास विलंब लागतो किंवा त्याची कमतरता भासते.
( ८) पीकसंरक्षणात तीव्र कवकनाशके व कीटकनाशके यांचा होणारा परिणाम : रोग व कीड यांच्या नाशाकरिता कवकनाशके व कीटकनाशके यांचा सर्रास उपयोग करतात. ती योग्य प्रमाणात मारल्यास उपयुक्तही ठरतात. याउलट त्यांचे प्रमाण तीव्र असल्यास रोग व कीड-नाशानंतर वनस्पतीवर विपरीत परिणाम होतात. बोडा मिश्रण व इतर ताम्रयुक्त कवकनाश कांचे प्रमाण तीव्र झाल्यास कोवळी पाने जळतात, कित्येकदा त्यांना छिद्रे पडतात व क्वचित गळतातही. फळांवर त्यांच्या रंगाचे ठिपके आढळतात, त्यांची वाढ ओबडधोबड होते, ती भेगाळतात, खडबडीत होतात, लवकर परिपक्व अथवा कठीणसर बनून क्वचित गळतात. बोर्डो मिश्रणामुळे काकडीच्या वेली, गुलाब, टोमॅटो, सफरचंद इत्यादींवर परिणाम झालेला दिसतो. त्यांची वाढ खुंटते, पानावर वेडेवाकडे चट्टे पडतात अथवा ती पिवळसर होतात.
कीटकनाशकांमुळेसुद्धा कमीअधिक प्रमाणात असेच अपाय झालेले आढळतात. आर्सेनिकयुक्त कीटकनाशकामुळे पाने गळतात. कीटकनाशकात तेलयुक्त द्रावण वापरल्यास फळझाडांना इजा पोहोचते. पॅराथिऑनामुळे सफरचंदाची फळे राठ व बारीक होतात. बीएचसीमुळे काकडीच्या पानांवर परिणाम होतो व बटाट्यांना वास लागतो. गंधक-चुना मिश्रणामुळे पानावर व फळांवर ठिपके पडतात, क्वचित फळे गळतात तसेच शेंडा व कडा वाळतात. २-४ डीसारख्या तणनाशकांचा परिणाम तणाशिवाय इतर वनस्पतींवर होतो. अशा वनस्पती विकृत होतात अथवा मरतात. एकदा तणनाशक वापरलेला पंप पुन्हा धुवून कीटकनाशकासाठी वापरल्यासही कपाशीची पाने पंजासारखी व पिवळी झालेली आढळतात.
इतर कारणे
झाडांवर वीज पडल्यास ती मरतात व भोवतालच्या झाडांची वाढ खुंटते; बटाट्याच्या शेतात पीक वाढत नाही. वावटळीमुळे झाडे मुळासकट उपटली जातात, फांद्या मोडतात, फुलोरा व फळे गळतात. आंबा व संत्र्याच्या बागेत असा प्रकार आढळतो. गारांच्या मारामुळे फळे गळतात अथवा त्यांना इजा पोहोचते. फुलोरा गळाल्यामुळे अशा झाडांना पुन्हा फळे येत नाहीत.
सारांश, अजीवोपजीवी कारणांमुळे वनस्पतींना अनेक रोग उद्भवतात. कारणे समजावून घेऊन त्वरित उपाय अमलात आणल्यास पीकसंरक्षणास अमोल मदत होते. (चित्रपत्र ५९-६०)
संदर्भ: 1. McMurtrey, J. E. Jr. Environmental Non-parasitic Dangers in Plant diseases, the Handbook of Agriculture,United
states Department of Agriculture, 1953.
2. McNew, G. L. The Effect of Soil Fertility in Plant Diseases, The Handbook of Agriculture, U.S.D.A., 1953.
3. Miller, P. R. The Effect of Weather in Plant Diseases, The Handbook of Agriculture,U.S.D.A., 1953. 4. Walker, J. C.
Plant Pathology, New York, 1957.
लेखक: राणे, म. शं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश