जगातील सर्वांत प्राचीन प्रगत संस्कृती. ती प्राचीन मेसोपोटेमियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात (विद्यमान इराक) नांदत होती. या संस्कृतीचा विकास टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या दुआबात इ. स. पू. ३५००—१९०० दरम्यान झाला. दक्षिणेकडे इराणचे आखात व अरबस्तानचे वाळवंट, पश्चिमेस युफ्रेटीस नदी, उत्तरेस समाराच्या जवळ अरबस्तानाचे वाळवंट व पूर्वेला टायग्रिस या सुमेरच्या प्राचीन सीमा होत. यांतील नैर्ऋत्येचा भाग हा सुमेर होय. सुमेर येथे पहिली वस्ती इ. स. पू. ४५००—४००० दरम्यान प्रोटो-युफ्रेटीअन किंवा उबेडियननामक लोकांनी केली होती. त्यांनी दलदलीच्या प्रदेशातील पाणी हटवून शेतीस उपयुक्त जमीन तयार केली. शेती व पशुसंवर्धनाबरोबरच त्यांनी व्यापार व अन्य उद्योगधंदे सुरु केले. विणकाम, गवंडीकाम, भांडी बनविणे हे त्यांपैकी काही होत.
रंगीत नक्षीची खापरे, पातळ कौलासारख्या विटांची घरे व मंदिरे, नदीतील लव्हाळ्याच्या मोळ्यापासून उभारलेल्या कुडाच्या झोपड्या, गारगोट्यांची पाती बसविलेले खापरी विळे, दगडी कुऱ्हाडी, खापरी गोफणगुंडे व क्वचितच कोठे आढळणारी तांब्याची कुऱ्हाड ही उबेडियन संस्कृतीची वैशिष्ट्ये होत. उबेडियनांच्या मेसोपोटेमियातील अन्तःप्रवसनानंतर विविध सेमिटिक लोकांनी तिथे प्रवेश केला आणि उबेडियनांच्या सांस्कृतिक विशेषांत आपली वैशिष्ट्ये घातली. त्यानंतर या प्रदेशात सुमेरियन स्थिरावले.
या काळातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमेरियन समाजाचे नियमित संघटन होय. त्यांनी अर, ऊरुक (ईरेक), अमा, इरिडू, लॅगॅश, निप्पुर, सिपेअर, कीश, अश्काक, लराक, अदाब, लार्सा, बाद-तिबिरा, अक्कड वगैरे नगरराज्ये स्थापन केली. या नगरांमधून सुमेरियनांनी सुरेख व भव्य प्रासाद आणि मंदिरे बांधली. शिवाय नगराभोवती संरक्षणासाठी भक्कम तटबंदी बांधली. त्यांतून परिपक्व नागर संस्कृती नांदू लागली.
सुरुवातीस राजकीय सत्ता मूलतः नगरातील नागरिकांच्या हाती होती; परंतु विविध नगरराज्यांमध्ये वैर निर्माण झाल्यावर तिथे राजेशाही आली. अर्थात हा राजा म्हणजे सर्वोच्च धर्मगुरु (पटेसी) होय. त्यामुळे या धर्मगुरुसत्ताक राज्यपद्घतीत (थिऑक्रटिक) प्रत्येक राज्य हे स्थानिक देवतेची संपत्ती मानण्यात येऊन सर्वोच्च धर्मगुरुकडे शासकीय व धार्मिक प्राधिकार असत. या नगरराज्यांत परस्परांत एकमेकांत युद्घे होत. त्यांपैकी जे बलवत्तर असेल, त्याने शेजारची नगरराज्ये जिंकून राज्यविस्तार केला. साहजिकच त्यांना लहान साम्राज्याचा दर्जा प्राप्त झाला. अर, ऊरुक ही त्यांपैकी महत्त्वाची राज्ये होत.
इ. स. पू. २३०० च्या सुमारास ऊरुकची सत्ता सबंध सुमेर प्रदेशावर काही काळ होती. त्यावेळी अक्कडचा सेमिटिकवंशीय पहिला सॅरगॉन (कार. २३३४ — २२७९) याने सुमेर पादाक्रांत केले. त्याच्या साम्राज्याचा विस्तार इराणच्या आखातापासून भूमध्य समुद्रापर्यंत होता. सुमेरची सत्ता या घराण्याकडे अनेक वर्षे होती. इ. स. पू. २१८० मध्ये रानटी टोळ्यांनी अक्कडच्या सेमिटिकांचा पराभव केला. त्यानंतर इ. स. पू. २१२५ मध्ये सुमेरियन लोकांनी अक्कड जिंकून ते अरच्या राज्याचा भाग बनले. अर या नगरराज्याच्या तिसऱ्या घराण्याने (थर्ड डायनेस्टी) सुमेरवर नियंत्रण मिळविले आणि ईलम व अॅसिरिया हे प्रदेश पादाक्रांत करुन सुमेरियन संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर अरेबियन द्वीपकल्पातून आलेल्या सेमिटिक जमातींनी सुमेरवर अधिसत्ता प्रस्थापित केली.
सुमेरमध्ये शेती, पशुपालन (मेंढपाळी) व मच्छिमारी हे व्यवसाय करणाऱ्या स्थिरपद समाजाचा पुरावा उत्खननांतून मिळाला. या समाजात पुढे व्यापारउदीमासाठी व्यावसायिक वर्ग होता. शेती, व्यापार व धर्मकारण पटेसीच्या हाती होते. त्याला सेनानायकाचीही मदत असे. शेतीसाठी त्यांनी कालवे बांधले व जादा पाण्याचा निचरा करण्यासाठी चरही खोदले होते. बार्ली, गहू, खजूर आणि भाजीपाला ही त्यांची प्रमुख पिके होत. त्यांनी गुरेढोरे जोपासली आणि त्यांच्या पैदाशीस उत्तेजन देऊन कळप वाढविले. लोकरीच्या उत्पादनात ते आघाडीवर होते. त्यापासून ते उत्कृष्ट वस्त्रनिर्मिती करीत असत. त्यांची अर्थव्यवस्था देवतेला केंद्रस्थानी ठेवून गुंफलेली होती आणि सर्व जमीन देवतेच्या मालकीची असून सर्वांना पुरेल एवढे धान्य ठेवून उर्वरित मंदिराच्या कोठारात जात असे; मात्र सर्व समाज शेतावर राबत असे.
सामाजिक दृष्ट्या अरऊरुक या नगरराज्यांचे कालखंड महत्त्वाचे असून त्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. त्या काळात सबंध बॅबिलोनियावर ऊरुक संस्कृती पसरलेली दिसते. नक्षीकाम नसलेली, तांबडी व भुऱ्या रंगाची, तोट्या व उचलण्यासाठी कान असलेली मृत्पात्रे ही या काळाचे वैशिष्ट्य होय. ही मृत्पात्रे तत्कालीन कुंभारांनी चाकावर तयार केलेली होती. या समाजात कारागीर जडजवाहीर, मृत्पात्रे, शस्त्रास्त्रे, चिलखते वगैरे तयार करीत. चांदी, तांबे, सुवर्ण व शिसे त्यांना ज्ञात होते. मंदिरे प्रशस्त व दगडांच्या चौथऱ्यावरती बांधलेली होती.
भिंतींच्या सजावटीची एक अभिनव पद्घत त्यांनी वापरली होती. तीत मातीच्या गिलाव्यामध्ये भाजक्या मातीचे लांब शंकू खोचलेले आढळले. शिवाय भिंती व स्तंभांवर भौमितिक रचनाबंध आढळून आले आहेत. ऊरुकच्या उत्तरकाळात आवर्त मुद्रा (सिलिंडर-सिल्स) मिळण्यास प्रारंभ होतो. या काळातील सर्वांत महत्त्वाचा शोध म्हणजे लेखनविद्या होय. सुमेरियनांनी इ. स. पू. ३००० च्या सुमारास क्यूनिफॉर्म ह्या चित्रलिपीचा शोध लावला. या लिपीची चिन्हे पाचराच्या आकाराच्या कलमी हत्याराने तयार करुन ती ओल्या मातीच्या गोळ्यात घालून नंतर सूर्यप्रकाशात वाळवीत. अशा प्रकारच्या चित्रांकित हजारो मातीच्या इष्टिका (मुद्रा) उत्खननांत सापडल्या आहेत.
सुमेरियन भाषेमुळे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व वाङ्मयीन स्थितीविषयी माहिती मिळते. तद्वतच या नगरांतील कायदे व धर्म यांवर प्रकाश पडतो. या लोकांना गणितशास्त्र, वैद्यक, खगोलशास्त्र यांचेही बऱ्यापैकी ज्ञान होते. सुमेरियनांनी लेखकांना (कोरक्यांना) प्रशिक्षण देण्यासाठी काही विद्यालयसदृश व्यवस्था केली होती. त्यांची शासकीय व मंदिरसंस्थांची दप्तरे सुरक्षित असल्याचे आढळले आहे.
चाके असलेले रथ, बैलगाड्या यांचा सर्रास उपयोग होत होता. अरच्या उत्खननातील राजांची थडगी महत्त्वाची असून तिथे अनेक मंदिरे, मातीचे मनोरे, अनेक मजली घरे, शाळा, लेखमुद्रा इ. मिळाल्या, तसेच एका पिंपाकृती मृत्पात्रावर काही वस्तूंची यादी कोरलेली आढळली. शिवाय एका मंदिराच्या विटेवर ‘अ-अनि-पद’ याचे नाव आढळते. शिवाय तांत्रिक विद्याही सुमेरियन समाज शिकला होता.
सुमेरियन इतिहासाचे स्थूल मानाने तीन भाग पडतात : पहिला खंड अरच्या राजघराण्याचा. दुसरा अक्कडच्या वर्चस्वाचा व तिसरा सुमेरियन सत्तेच्या पुनर्स्थापनेचा. या प्रत्येक खंडातील राजांची नावे असलेली वंशावळींची सूची उपलब्ध झाली आहे. या तीनही कालखंडांच्या इतिहासाविषयी सुमेरियन बखरीत विपुल माहिती आहे.
अरचा पहिला प्रलयोत्तर राजा मेस-अनि-पद हा स्वतःस कीशचा अधिपती म्हणवितो. तो प्रत्यक्ष सत्ताधीश असला, तरी कीशवर त्याने विजय मिळविलेला असावा. याचा पुत्र अ-अनि-पद (इ. स. पू. २५८०). होय. उबाइडनजीकच्या एका मंदिरावरील लेखात निन्-खुर्गस देवतेचे मंदिर अरचा राजा मेस-अनि-पद याचा पुत्र अरचा राजा अ-अनि-पद याने बांधले, असा लेख आहे. याने निप्पुर च्या एका मंदिराचा जीर्णोद्घार केला.
निप्पुर व कीश ही गावे अरपासून १६३ किमी. च्या त्रिज्येत येतात. एवढया मोठ्या प्रदेशावर यांचे स्वामित्व असावे, असे दिसते. हे साम्राज्य फार काळ टिकले नाही, नगरराज्ये पुन्हा स्वतंत्र झाली. यापुढचा नाव घेण्यासारखा राजा उरुकागिना. हा लॅगॅशचा अधिपती होता. त्याच्या काही राजाज्ञा उपलब्ध आहेत. या सर्व नियमांचा उद्देश सामान्य, दरिद्री अशा लोकांना जीवित सुसह्य व्हावे हाच होता. धनिकवर्ग व पुरोहित यांनी चालविलेली समाजाची पिळवणूक थांबविण्यात आपण यशस्वी झालो असे तो म्हणतो. ही सगळ्यात साधी, प्राचीन, छोटी पण न्यायी अशी विधिसंहिता होय.
एकीकडे हा ऊरुकागिना आपल्या नागरिकांचे जीवित सुरक्षित व सुखी करण्यात गर्क असताना अमा या गावाचा पटेसी लुगल झगिसी हा बलिष्ठ बनला. त्याने अर, ऊरुक अशा शेजारी नगरराज्यांवर अंमल बसविलाच; पण एवढयावरच समाधान न मानता उत्तर व पश्चिम दिशांकडे मोठाल्या मोहिमा केल्या.
तो लेखात आपल्या स्वतःला 'उगवतीपासून मावळतीपर्यंत पसरलेल्या भूमीचा अधिपती ' म्हणवितो, तसेच दक्षिण सागरापासून (इराणी आखात) टायग्रिस-युफ्रेटीसच्या पलीकडच्या उत्तरेकडील समुद्रापर्यंत (भूमध्य) आपली सैन्ये पोहोचल्याचा हवाला देतो. लुगलझगिसी याने लेगॅशचा विनाश करुन ऊरुकागिना याला पदभ्रष्ट केले. आपल्या यशाचे श्रेय तो एन्लिल देवतेच्या कृपेला देतो आणि अर, ऊरुक, निप्पुर येथेही त्याने मोठा दानधर्म केला; परंतु या श्रद्घाळू भक्ताचा मुख्य हेतू राज्याचा विस्तार आणि सुमेरियापासून भूमध्य सागरापर्यंतचे व्यापारी मार्ग सुरक्षित राखणे, हाच होता, याविषयी दुमत नाही.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/6/2020
इराक : नैर्ऋत्य आशियातील एक अरब प्रजासत्ताक राष्ट...
मितानी संस्कृति : उत्तर मेसोपोटेमियाच्या उत्तर भाग...
कॅसाइट : मेसोपोटेमियातील प्राचीन एलामाइट जमातीपैकी...