रशियन राज्यक्रांतीला दीर्घकालीन पार्श्वभूमी आहे.⇨पीटर द ग्रेटच्या काळापासून (कार. १६८२–१७२५) रशियावर झार राजांची अनिर्बंध सत्ता होती. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत पश्चिम यूरोपात पारंपरिक राज्यव्यवस्थांना आव्हाने मिळत होती आणि या आव्हानांसमोर, त्या त्या देशातल्या एकतंत्री अन्याय्य सत्ता पराभूत होत होत्या; मात्र रशियात झारची सत्ता टिकून होती.
रशियन सैनिकांनी १८१२ मध्ये पहिल्या नेपोलियनची दमछाक केली. या लढायांच्या निमित्ताने हे सैनिक पश्चिम यूरोपचा प्रवास करून आले. त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीतून उद्भवलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या कल्पनांचे आकर्षण वाटले आणि मग १८२५ च्या डिसेंबरात काही सैनिकांनीच रशियात संविधाननिष्ठ शासन सुरू व्हावे म्हणून उठाव केला.
दुदैवाने तो उठाव फसला पण पुढील साठसत्तर वर्षांत वेगवेगळ्या चळवळी उद्भवल्या; काहीजणांना आपला भूतकाळ अनुकरणीय वाटत होता. पारंपरिक कॉम्यून्स म्हणजे संघटित शेतीच्या प्रयोगशाळा टिकविल्या पाहिजेत व त्यातून पश्चिम यूरोपात उद्भवलेली भांडवलशाही टाळून मुक्त्त समाजाकडे झेप घेतली पाहिजे, ही विचारसरणी या मंडळींना प्रेरक वाटत होती. दुसरा गट आदर्श शासनमुक्त्त समाजव्यवस्थेचा पुरस्कार करीत होता. राज्य हे जुलमीच असायचे, सबब राज्यविहीन समाज उत्पन्न केला पाहिजे, हे स्वप्न या गटाला आकृष्ट करीत होते. तिसऱ्या गटाला पश्चिमी विचाराचे आकर्षण होते. पश्चिम यूरोपातल्या आधुनिकतेचा रशियाने स्वीकार करावा आणि तत्कालीन अगतिकता संपुष्टात आणावी, ही या गटाची भूमिका होती. चौथा गट दहशतवाद्यांचा किंवा अतिरेक्यांचा होता.
हिंसक कृतींमधूनच राज्यकर्त्यांना धडा शिकवता येईल, ही या गटाची श्रद्धा होती. डिसेंबर १८२५ मध्ये झालेल्या पहिल्या उठावानंतर या निरनिराळ्या गटांनी देशातील असंतोष धगधगता ठेवण्याचे कार्य चालू ठेवले. १८५५ मध्ये सत्तेवर आलेल्या झार दुसऱ्या अलेक्झांडर बादशाहाचे काही सुधारणा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. भूदास पद्धतीच्या जाचातून मुक्त्त झाला असल्याचा कायदा केला, स्थानिक स्तरावरती शासनात काही प्रमाणात लोकांचा सहभाग वाढेल असे कायदे केले, शैक्षणिक सुधारणाही जाहीर केल्या. पण या सर्व सुधारणा अर्धवट ठरल्या.
शेतकरी जमीनदाराच्या तावडीतून सुटला; पण तो ग्रामीण अर्थव्यवस्थेशी बांधला गेला. स्थानिक स्तरावर शासनाला लोकांचा सहभाग हवा होता; पण राष्ट्रीय स्तरावर एकतंत्री कारभार कायम ठेवायचा होता. साहजिकच जनसामान्यांचा असंतोष वाढत गेला. अराज्यवादी तसेच दहशतवादी लोकनेतृत्व करू शकले नाहीत. पण रशियन अस्मितेवर भिस्त ठेवणारा जो गट होता, त्यातूनच समाजवादी क्रांतिकारक पुढे आले; तर पश्चिमीकरणाकडे आकृष्ट झालेल्या गटातून मार्क्सवादी अग्रेसर झाले. या दोन्ही गटांनी झार सत्तेविरुद्ध असंतोष भडकत ठेवला. या दोन्ही गटांपैकी मार्क्सवादी बोल्शेव्हिक अखेर यशस्वी ठरले.
मार्क्सवादी पुढऱ्यांनी १८९८ मध्ये रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीची स्थापना केली व रशियन भूमीवर मार्क्सप्रणीत मार्गाने क्रांती होईल हा विश्वास व्यक्त्त केला. ही क्रांती, अर्थातच शेतकऱ्याच्या नव्हे तर औद्योगिक कामगारांच्या नेतृत्वाखाली घडून येईल, ही क्रांती सरंजामशाहीचे व राजेशाहीचे केवळ भांडवलशाहीत परिवर्तन करून थांबणार नाही, तर समाजवादी परिवर्तनात परिणत होईल आणि मग जगातल्या इतर देशांचे कामगारही एकूण जागतिक क्रांतीचा डोंब उभा करतील वगैरे विचार सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीने मांडण्यास प्रारंभ केला.
याच पार्टीच्या १९०३ मध्ये झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक या नावाचे दोन गट निर्माण झाले.⇨ न्यिकलाय लेनिन या तरुण पुढाऱ्याने काही प्रश्नांबद्दल अधिक आग्रही भूमिका घेतली; तर मार्तोव्ह नामक पुढाऱ्याने दुसऱ्या टोकाची मते मांडली. पक्षात दोन तट पडले. पक्षाच्या वतीने मुखपत्र चालविण्यासाठी मतदान झाले. लेनिनप्रणीत गटास केवळ याच मतदानात बहुमत मिळाले व त्याच्या अनुयायांना बोल्शेव्हिक्स म्हणजे बहुमतवाले असे नाव प्राप्त झाले. तर मार्तोव्हचे नेतृत्व मानणारे मेन्शेव्हिक्स अथवा अल्पमतवाले या नावाने परिचित झाले.
कामगारांच्या लढ्यांमधून जुलमी राजवट धुळीला मिळाली पाहिजे व या अंतिम उद्दिष्टाचा सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीस कधीही विसर पडू नये, ही लेनिनची धारणा होती. पार्टीने कामगारांमध्ये काम करून या अंतिम उद्दिष्टाची जाणीव जागृत ठेवली पाहिजे; अन्यथा कामगारवर्ग रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यातच अल्पसंतुष्ट राहील, हाही लेनिनप्रणीत निष्कर्ष होता. मार्तोव्हला व त्याच्या अनुयायांना म्हणजे मेन्शेव्हिकांना मात्र कामगारांमध्ये भांडवलशाहीच्या विकासाबरोबर, वर्गभावनेचा प्रत्यय येईल ही खात्री वाटत होती. तेव्हा त्यांची पक्षसंघटना व पक्षकार्य याबाबतची भूमिकाही वेगळी होती.
पार्टीमध्ये क्रियाशील सदस्यांव्यतिरिक्त्त हितचिंतक व इतर सदस्यही असावेत, तसेच पक्षाने बव्हंशी भौतिक नियतिवाद स्वीकारून प्रथम बूर्झ्वा डेमॉक्रॅटिक (भांडवलदारी लोकशाही) क्रांतीवरच लक्ष द्यावे व कालांतराने प्रोलिटेअरिअन सोशलिस्ट (कामगार समाजवादी) क्रांती होऊ द्यावी ही विचारसरणी मेन्शेव्हिकांना मान्य होती. लेनिन मात्र पार्टीत केवळ सक्रिय सदस्यांनाच प्रवेश द्यावा आणि या सदस्यांसाठी कठोर अनुशासन असावे, या भूमिकेचा आग्रही पुरस्कर्ता होता. या अनुशासनबद्ध व्यावसायिक क्रांतिकारकांच्या सहाय्याने कामगारांमध्ये वर्गभावना जागविता येईल व अखेर राज्यक्रांती घडविता येईल, ही लेनिनची खूणगाठ होती. केवळ ऐतिहासिक नियतिवादावर विसंबून न राहता कालगती ओळखून व्यूहरचना करणाऱ्या कुशल क्रांतिकारकांची फळी वेगाने उभारली पाहिजे, ही लेनिनची धारणा होती.
शेकडो शेतकऱ्यांनी २२ जानेवारी १९०५ या दिवशी भाकरीच्या प्रश्नावर, पेट्रग्राडमधल्या विंटर पॅलेससमोर उग्र निदर्शने केली व झार बादशहाला जनभावांचे दर्शन घडविले, पण प्रत्येक निदर्शक आपला दुष्मन आहे असे समजणाऱ्या झार राजाने सैनिकांचे घोडदळ या निदर्शकांवर सोडले. तेव्हा जो गोळीबार झाला त्यामुळे जनसामान्यांचा राजावरचा भाबडा विश्वासही संपुष्टात आला. १९०५ नंतर झारने मर्यादित लोकशाही सुरु करण्याचे ठरविले.
पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात चार लोकसभा अस्तित्वात आल्या. झारची इच्छा, या लोकसभांनी त्याच्या धोरणावर शिक्कामोर्तब करावे इतकीच होती. स्टलिप्यिन नामक तत्कालीन प्रधानमंत्र्याने खाजगी शेतीस प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगीकारले, पण कोणतेही धोरण खऱ्या लोकशाही आकांक्षा पूर्ण करणारे नव्हते. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीच्या दोन्ही गटांनी या मर्यादित लोकशाहीचा व सुधारणांचा आपापल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी उपयोग करून घेण्याचे ठरविले. पश्चिम यूरोपातल्या संसदीय लोकशाहीवर श्रद्धा असणारा कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रॅटिक पक्षही त्या काळात सक्रिय होता.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/12/2020