(३८४–३२२ इ. स. पू.). जगद्विख्यात ग्रीक वक्ता आणि मुत्सद्दी. अथेन्समध्ये एका संपन्न कुटुंबात तो जन्मला. त्याच्या लहानपणीच त्याचे वडील निवर्तले. त्यांनी मागे ठेवलेल्या संपत्तीचा बराचसा भाग त्याच्या पालकांनीच लुबाडला. पुढे डिमॉस्थिनीझने ह्या पालकांविरुद्ध फिर्याद केली. या निमित्ताने त्याने कायद्याचा आणि वक्तृत्वकलेचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. न्यायालयात त्याचा जय झाला, तरी गेलेल्या संपत्तीपैकी फारच थोडी त्याला परत मिळू शकली. मात्र त्याचे प्रभावी न्यायालयीन वक्तृत्व पाहून वेगवेगळ्या खटल्यांसाठी भाषणे लिहून देण्याची कामे त्याला मिळू लागली. त्याच्या काळी न्यायालयांत संबंधितांना आपापली बाजू स्वतः मांडावी लागे.
आपली भाषणे अन्य कोणाकडून लिहून मात्र घेता येत असत. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत डिमॉस्थिनीझने मुख्यतः हाच व्यवसाय केल्यानंतर तो राजकारणात पडला. अथेन्समधील लोकशाही आणि अथेन्सचे स्वातंत्र्य ह्यासाठी त्याने आयुष्यभर लढा दिला. डिमॉस्थिनीझचे राजकीय जीवन सुरू झाले, तेव्हा मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप ह्याने विस्तारवादी धोरण आखून ग्रीसमधील शहरे हळूहळू मॅसिडोनियन सत्तेखाली आणावयास आरंभ केला होता. पुढे अथेन्सचे स्वातंत्र्यही त्याने हिरावून घेतले. तथापि मॅसिडोनियन सत्तेविरूद्ध अथेनियनांना जागृत करण्याचे आणि त्यांची स्वातंत्र्येच्छा चेतविण्याचे कार्य डिमॉस्थिनीझने हयातभर केले. दुसऱ्या फिलिपच्या विरुद्ध त्याने दिलेली भाषणे ‘फिलिपिक्स’ ह्या नावाने ओळखली जातात. दुसऱ्या फिलिपच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या अलेक्झांडरने डिमॉस्थिनीझला आपल्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तथापि अथेनियनांच्या खास विनंतीवरून ती मागे घेण्यात आली.
टेसिफॉननामक एका अथेनियन नागरिकाने डिमॉस्थिनीझला सुवर्णमुकुट देऊन गौरवावे, अशी सूचना केली होती. डिमॉस्थिनीझचा प्रतिस्पर्धी वक्ता एस्किनीझ ह्याने तिच्याविरुद्ध पवित्रा घेऊन ते प्रकरण न्यायालयात नेले. ह्या संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी डिमॉस्थिनीझने केलेले ‘ऑन द क्राउन’ (इ. स. पू. ३३०) हे भाषण सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यानंतर काही वर्षांनी त्याच्यावर आर्थिक अफरातफरीचा आरोप करण्यात आला; दंडाची आणि तुरुंगवासाची सजा झाली. तथापि तुरुंगातून पळून जाऊन त्याने अज्ञातवास पतकरला.
इ. स. पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अथेन्समध्ये आणण्यात आले; त्याच्या दंडाची रक्कम भरण्यासाठी निधी उभारला गेला. तथापि अलेक्झांडरचा सेनापती अँटिपाटर ह्याने डिमॉस्थिनीझ आणि अन्य व्यक्तींची मागणी केल्यामुळे तो अथेन्समधून पळाला व विष घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या भाषणांची काळजीपूर्वक संपादिलेली हस्तलिखिते अलेक्झांड्रियाच्या विख्यात ग्रंथालयात ठेवण्यात आली. सिसरोसारख्या श्रेष्ठ रोमन वक्त्यावर आणि मुत्सद्यावर त्यांचा प्रभाव पडला. रोमन शाळांतून ही भाषणे अभ्यासली जाऊ लागली. डिमॉस्थिनीझच्या भाषणांतून त्याचा साक्षेपीपणा, उत्कट देशभक्ती आणि तळमळ प्रत्ययास येते. श्रेष्ठ वक्तृत्वाचा त्याने एक आदर्शच निर्माण केला.
कुलकर्णी, अ. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/21/2020