आग्नेय आशियातील प्राचीन कंबुज – कंबोज किंवा ख्मेर साम्राज्य म्हणजेच आधुनिक कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक) व लाओसचा प्रदेश होय. या प्रदेशात ५५० ते १४५० च्या दरम्यान मेकाँग नदीच्या खोऱ्यात एक प्रगत संस्कृति नांदत होती. तेथील ख्मेर लोकांमुळे या संस्कृतीस ख्मेर संस्कृती, हे नाव रूढ झाले. भारतीयांचे बृहद्भारतातील साम्राज्य म्हणजे ख्मेर संस्कृती. म्हणून या संस्कृतीचे महत्त्व भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. येतील प्राचीन अवशेषांवर भारतीय संस्कृतीची छटा आजही दृष्टोत्पत्तीस येते. मात्र कंबोडियातील हेच पहिले भारतीय राज्य नाही, तर यापूर्वी या भागात फुनानचे दुसरे मोठे हिंदू राज्य होते.
तथापि हे राज्य सहाव्या शतकाच्या मध्यावर नाहीसे झाले. फुनानचे चेन – ला हे मांडलिक राज्य बलवान झाल्यामुळे फुनानची सत्ता नामशेष झाली, अशी माहिती चीनच्या ‘सुई’ वंशाच्या इतिहासात नमूद केली आहे.
ख्मेर संस्कृतीसंबंधीची माहिती मुख्यत्वे प्राचीन कोरीव लेखांतून, तसेच चिनी बखरींतून मिळते. याशिवाय प्राचीन प्रवाशांचे वृत्तांत, तत्कालीन वाङ्मय व प्राचीन अवशेष देखील या दृष्टीने महत्त्वाची साधने आहेत.
चेन – लाच्या ज्या दोन भावांनी फुनानविरुद्ध बंड पुकारले, त्यांपैकी थोरला भाऊ भाववर्मन् पुढे चेन – लाच्या गादीवर आला व त्यानेच ख्मेर साम्राज्याचा पाया घातला, असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. त्याने ख्मेर साम्राज्याच्या सीमा वाढविल्या. त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ चित्रसेन हा महेंद्रवर्मन् या नावाने गादीवर बसला.
हा पराक्रमी होता. त्याने आपले विजय साजरे करण्याकरिता लिंगमंदिरे बांधली व शंकराला अर्पण केली. याचा पुत्र ईशानवर्मन् याच्या हातात राज्याची सूत्रे येताच (६१६ – २७) याने आपले राज्य पश्चिमेकडे द्वारवतीपर्यंत वाढविले; ईशानपुर नावाचे नवीन शहर वसविले आणि वायव्य कंबोडियातील चक्रकपुरा, अमोधपुरा व भीमपुरा या तीन राज्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्यानंतर अनुक्रमे दुसरा भाववर्मन् (६२७ – ३९) आणि पहिला जयवर्मन् (६३९ – ८१) हे दोन राजे गादीवर आले. त्यांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. जयवर्मनच्या मृत्युनंतर भाववर्मनच्या घराण्याचा शेवट झाला. यानंतर सु. एक शतक अराजक माजले.
चेन – लाचे दोन तुकडे होऊन उत्तर चेन – ला मधून चीनला वकील गेले व चीनच्या साहाय्याने हे राज्य कसेबसे टिकून राहिले. चीनशी जोडलेले संबंध फक्त उत्तर चेन – लापुरतेच मर्यादित होते, मात्र दक्षिण चेन – लावर आठव्या शतकात जावाचे वर्चस्व असावे. याशिवाय ]श्रीविजयचे ]शैलेंद्र यांनीही आपले वर्चस्व स्थापले होते. दुसरा जयवर्मन् (८०२ – ५०) गादीवर येताच, त्याने पुन्हा राज्याची घडी बसविली. तत्पूर्वी हा वंश केवळ नामधारीच राहिला होता. त्याने शिवकैवल्य नामक ब्राह्मणाला धर्मगुरू करून देवराज पंथाची स्थापना केली आणि इंद्रपुर ही आपली राजधानी बनविली. पुढे त्याने हहिहरालय नावाचे दुसरे नगर वसविले आणि कंबोज देशास पूर्वीचे स्वातंत्र्य व वैभव मिळवून दिले. त्यानंतर त्याचा पुत्र जयवर्धन् (८५० – ७७) गादीवर आला. त्याने जयवर्मन् (तिसरा) हे नाव धारण केले. ह्यास हत्तीच्या शिकारीचा छंद होता.
तिसऱ्या जयवर्मनच्या मृत्यूनंतर इंद्रवर्मन् (८७७ – ८९)गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत अनेक मंदिरे बांधली गेली आणि राज्यविस्तारही झाला. त्याच्यानंतर यशोवर्धन् हा यशोवर्मन् हे नाव धारण करून गादीवर आला (८८९ – ९००). तो स्वतः विद्याकलांचा व्यासंगी होता. त्याने संस्कृत भाषेला उत्तेजन दिले. त्याचे कार्यक्षम शासन व धार्मिक धोरण प्रशंसनीय आहे. त्याने यशोधरपुर नावाचे शहर वसविले.
अंकोर संस्कृतीच्या विकासाचे सर्व श्रेय त्याला देण्यात येते. त्याच्यानंतर त्याचे दोन पुत्र हर्षवर्मन् आणि दुसरा ईशानवर्मन् हे अनुक्रमे गादीवर आले. परंतु यशोवर्मनचा मेहुणा चौथाजयवर्मन (९२१ – ४१) याने दुसऱ्या ईशानवर्मनच्या वेळी बंड करून ९२१ च्या सुमारास स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि पुढे ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर (९२८) त्याने सर्व कंबोज राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आपली राजधानी अंकोरपासून ८० किमी. वर जंगलात कोहकेर ह्या ठिकाणी हलविली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हर्षवर्मन् आणि त्यानंतर यशोवर्मनच्या धाकट्या बहिणीचा मुलगा राजेंद्रवर्मन् (९४४ – ६८) गादीवर आला. त्यानंतर पाचव जयवर्मन् (९६८ – १००१) आला. त्यांनी आपल्या पूर्वसूरींची आक्रमक धोरणे स्वीकारून शेजारच्या प्रदेशांवर वर्चस्व प्रस्थापित केले.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020