उत्तर व दक्षिण कोरिया ह्यांमध्ये १९५०–५३ च्या दरम्यान झालेला संघर्ष. हा संघर्ष मुख्यत्वे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टविरोधी विचारसरणीतून उद्भवला. ह्या युद्धाची अनेक कारणे आहेत. तथापि दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर३८° अक्षवृत्तापलीकडे रशियाने उत्तर कोरिया व्यापला आणि अमेरिकेने दक्षिण कोरिया व्यापला. ह्यामुळे कोरिया दोन स्वतंत्र भागांत विभागला गेला. १९४५ मध्ये रशिया-अमेरिकेचा एक संयुक्त आयोग कोरियाच्या एकीकरणासाठी नेमण्यात आला. परंतु रशियाच्या हटवादीपणामुळे तो १९४६ मध्ये बरखास्त झाला.
त्यामुळे पुढे अमेरिकेने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रे येथे १९४७ मध्ये मांडला. संयुक्त राष्ट्रे ह्या संघटनेने कोरियाच्या एकीकरणासाठी आयोग नेमून त्याकरवी कोरियाचे स्वतंत्र सरकार स्थापन व्हावे, असेही प्रयत्न सुरू केले. त्यानुसार दक्षिण कोरियापुरतेच १९४८ मध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक अस्तित्वात येऊन पुढे त्याचा ⇨ सिंगमन ऱ्ही अध्यक्ष झाला. त्याला अमेरिका व इतर काही राष्ट्रांनी मान्यताही दिली. त्याच वेळी रशियाच्या पुरस्काराने उत्तर कोरियात प्रजासत्ताक स्थापण्यात येऊन रशिया, चीन व इतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी त्यास मान्यता दिली.
ह्यामुळे कोरियाच्या दोन विभागांत वैमनस्य निर्माण झाले. अशा स्थितीत उत्तर कोरियाने २५ जून १९५० रोजी दक्षिण कोरियावर आक्रमण केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने तत्काळ त्याच्या संरक्षणासाठी सैन्य पाठविले. त्यात मुख्यत्वे अमेरिकेचे सैन्य होते, ह्याशिवाय इतर पंधरा राष्ट्रांनी सक्रिय साहाय्य केले. ह्या सैन्याचे नेतृत्व प्रथम मॅक आर्थर ह्यांच्याकडे होते, पण पुढे ज. मॅथ्यू रिज्वे ह्याच्याकडे गेले. एक वर्षाने रशियाने शस्त्रसंधीची मागणी केली. त्याप्रमाणे १० जुलै १९५१ रोजी केसाँग येथे दोन्ही पक्षांत बोलणी सुरू झाली. पानमून्जम खेड्याच्या रेषेजवळ म्हणजे ३८° अक्षवृत्ताजवळ युद्धबंदी व्हावी, अशी मागणी होती. मुख्य मुद्दा कैद्यांच्या देवघेवीचा होता.
ही बोलणी अत्यंत संथगतीने चालली होती. दरम्यान दोन्हीकडील चढाई व युद्ध चालू होते. ८ जून १९५३ रोजी पानमून्जम येथे कैद्यांच्या अदलाबदलीसंबंधी एक सर्वसाधारण धोरण मान्य करणारा करार झाला. दरम्यान सिंगमन ऱ्ही याने उत्तर कोरियाचे २५,००० कैदी चाचणीशिवाय सोडले. त्यामुळे पुन्हा वाटाघाटीत काही अडथळे निर्माण झाले. पण नंतर लवकरच २७ जुलै १९५३ रोजी शस्त्रसंधी झाली. तीनुसार ३८° अक्षवृत्त ही दोन्हीची सीमा ठरविण्यात येऊन दोहोंमध्ये दोन किमी. नोमॅन्स लँड ठेवण्याचे तसेच शस्त्रसंधीनंतर तीन महिन्यांच्या मुदतीत दोन्ही पक्षांनी तटस्थ राष्ट्रांच्या देखरेखीखाली कैद्यांची चाचणी घेऊन देवघेव करावी असे ठरले. ह्यात भारताकडे नेतृत्व आले. भारताचे मे.ज. थिमय्या ह्यांची तसेच रुग्ण सेवापथकातून ज. शंकरराव थोरात ह्यांची नियुक्ती झाली. भारताने दोन्ही बाबतीत प्रशंसनीय कामगिरी बजावली.
कोरियन युद्धाचे अनेक दूरगामी परिणाम झाले. हे युद्ध मुख्यत्वे पारंपरिक पद्धतीने झाले, त्यामुळे अण्वस्त्रे वगैरे विशेष वापरात आली नाहीत. परंतु जंतू, विषारी द्रव्ये आदींचा सर्रास उपयोग करून नागरी जीवन विस्कळित करण्याचे प्रयत्न झाले. एवढेच नव्हे तर रस्ते, औद्योगिक कारखाने, रेल्वे, पूल इ. उद्ध्वस्त करण्यात आले. युद्धातील बरेचसे निर्णय लष्करी दृष्ट्या घेण्याऐवजी राजकीय दृष्ट्याच घेण्यात आले. ह्या युद्धातील कैद्यांवर, मुख्यत्वे दक्षिण कोरियाच्या कैद्यांवर कम्युनिस्टांकरवी बुद्धिप्रक्षालनाचे सर्रास प्रयोग करण्यात आले. ह्या युद्धामुळे शीतयुद्धाचे बीज पेरले गेले.
वरील युद्धानंतर कोरियामधील युद्धस्थिती १९७२ पर्यंत फारशी बदललेली नव्हती. शीतयुद्ध चालूच होते. मात्र कोणत्याही बलवान राष्ट्राने कुठेही शिरावे व प्रदेश बळकवावा ह्या धोरणास आता पायबंद बसला आहे; तसेच संयुक्त राष्ट्रे ही संघटना म्हणजे केवळ विचारविनिमय करणारी किंवा शांततेचा उपदेश करणारी संघटना नसून प्रसंगी अन्यायाविरुद्ध शस्त्र आणि सैन्याचा वापर करणारी कृतिशील संघटना आहे, हे ह्यावरून सिद्ध झाले. ह्या युद्धात सु. १०,००,००० लोक ठार, ८,००,००० जखमी, २५,००,००० निर्वासित झाले व जवळजवळ ८०० कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट वा उद्ध्वस्त झाली.
संदर्भ : 1. McCune Shannon, Korea-Land of Broken Calm, New York, 1966
2. O’Ballance, Edgar, Korea: 1950-53, London, 1969.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2020