অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ईलम

ईलम

 

नैर्ऋत्य इराणमधील लुरिस्तान व खुझिस्तान ह्या प्रदेशांतील इ. स. पू. ४५०० – ६४० च्या दरम्यानची एक प्राचीन संस्कृती. हा प्रदेश डोंगर, दऱ्याखोरी तसेच कारखेह व कारून ह्या नद्या ह्यांनी व्यापला आहे. टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या सपाट प्रदेशांतही ह्या संस्कृतीचा प्रसार झाला होता. येथे सापडलेल्या अवशेषांवरून, इ.स.पू. २०,००० वर्षांपूर्वी येथे मानवी वस्ती होती, असे काही फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्यांचे म्हणणे आहे; परंतु जेम्स ब्रेस्टेडसारख्या तज्ञांना हे मत अतिशयोक्तीचे वाटते. इ. स. पू. ४५०० च्या सुमारास कुर्दिस्तान व वायव्य इराण या प्रदेशांतून ईलम हे भटके लोक येथे येऊन स्थायिक झाले. त्यांच्या वसाहतींचे सांस्कृतिक व राजकीय केंद्रस्थान शूशान म्हणजेच प्राचीन स्यूसा होय. ह्या प्रदेशात प्राचीन काळी अनेक लहान मोठी राज्ये होती. इतर तत्कालीन संस्कृतींच्या इतिवृत्तांवरून त्यांचा इतिहास कळतो, पण तोही त्रोटक व तुटक अशा स्वरूपाचा आहे.
ईलममधील अनेक राज्यांपैकी अवन, अ‍ॅन्शॅन, सीमाश व स्यूसा ही विशेष प्रसिद्ध पावली. मात्र स्यूसाव्यतिरिक्त इतरांचे भौगोलिक स्थान अद्यापि निश्चित झालेले नाही. शेजारच्या अक्कड, सुमेर व आशुर ह्यांचे वर्चस्व ह्या प्रदेशावर अधूनमधून होते. प्रथम सारगॉन ह्याने ईलम प्रदेश पादाक्रांत केला होता. ह्यातून ईलम बाहेर पडले व ईलमने अर ही बॅबिलोनियाची राजधानी जिंकली. पुढे इ. स. पू. १७९५ मध्ये पुन्हा हामुराबीने ईलम जिंकले. यामुळे ईलमला काही काळ पारतंत्र्यात काढावा लागला. पण पुढे ईलमचे पुनरुज्‍जीवन होऊन इ. स. पू. १२०० च्या सुमारास शुत्रूकनख्‌खुन्तेसारख्या काही समर्थ राजांच्या कारकीर्दीत ईलमचे साम्राज्यात रूपांतर झाले. त्याच्या वारसांनीही त्याचे धोरण स्वीकारून ईलमचे सामर्थ्य वाढविले. त्यामुळे इ. स. पू. ६४० मधील दुसरा सारगॉन व असुरबनिपाल ह्यांच्या ईलमवरील यशस्वी स्वारीपर्यंत सु. ६०० वर्षांचा काळ हा ईलमचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. प्राचीन पुराणातील हकिकतींप्रमाणे ईलम आक्रमणापासून ऊरूकचा बचाव करण्यासाठी खुद्द गिलगामेश याला धावून यावे लागले. मात्र पुढे अ‍ॅसिरियन साम्राज्याचा उदयाबरोबरच ईलमच्या वर्चस्वाचा लोप होऊ लागला.
ईलम लोक आधीपासूनच शेती करीत असावेत किंवा शेतीमुळेच ते ह्या भागात प्रथम आले असावेत. शेतीच्या जोडीला ते पशुपालनही करीत असत. ह्या लोकांची तांत्रिक प्रगती काहीशी आश्चर्यकारक वाटते. रोजच्या वापरातील दगडी अवजारे छिलके काढून बनविलेली असली, तरी पुढे आयुधांसाठी तांब्याचा वापर अधिक प्रमाणावर होत गेलेला आढळतो. ईलमसारखी सुबक व आकर्षक मृत्पात्रे इतर तत्कालीन संस्कृतींत क्वचितच आढळतात. मृत्पात्रांवर फळाफुलांच्या, पशुपक्ष्यांच्या तसेच भौमितिक आकृत्या चित्रित केलेल्या आहेत. मृत्पात्रे चकचकीत असून, विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चाकावर बनविलेली आहेत. ह्याशिवाय या संस्कृतीच्या लोकांनी चाकाचा वापर वाहनांसाठीही केल्याचे आढळते. इ. स. पू. सु. १८०० नंतर युद्धासाठी रथांचा उपयोग करण्यास मेसोपोटेमियातील काही संस्कृतींत आरंभ झाला होता. रथांचा युद्धासाठी असा उपयोग प्रथम करणाऱ्या लोकांत ईलमच्या लोकांचा समावेश होतो. या सर्वांच्या जोडीला येथे हायरोग्‍लिफिक लिपीचा उपयोग करण्यास, म्हणजे लेखनकलेसही आरंभ झालेला होता. ह्या लिपीतील काही व्यापारविषयक याद्या उपलब्ध झालेल्या असून यानंतरच्या काळात क्यूनिफॉर्म लिरीचा सर्रास वापर केलेला आढळतो. आर्थिक क्षेत्रातील त्यांची प्रगती व भरभराट मुख्यत्वे ईजिप्त, भारत यांसारख्या दूरच्या प्रदेशांशी त्यांच्या होणाऱ्या व्यापारावरून दिसून येते.
मृत्पात्रे, भाषा ह्यांप्रमाणेच धार्मिक बाबतींतही ईलम लोकांचे काही खास देव होते. त्यांत इंशुशिनाक (स्यूसाचा प्रमुख देव), ह्युबन, नख्खुन्ते आणि किरिरिशा ह्या देवता प्रसिद्ध होत्या.
ईलमच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासात अनेक त्रुटी आढळून येतात. या त्रुटी भरून काढण्यात पुरातत्त्वीय अथवा वाङ्‌मयीन पुराव्याची फारशी मदत होत नाही; असे असले, तरी ईलमचे सांस्कृतिक जीवन सुमेरिया व बॅबिलोनिया यांपेक्षा फारसे भिन्न होते, असे वाटत नाही. काही विद्वानांच्या मते ईलमला स्वत:चे असे सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व नव्हते. मेसोपोटेमियाच्या सांस्कृतिक प्रेरणांचा प्रसार करण्यात मात्र त्याने मोठा हातभार लावला.
लेखक : म.श्री.माटे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate