ऐतिहासिक काळातील इराणी साम्राज्याची स्थापना करणारे लोक आरंभापासून या प्रदेशातील रहिवासी नव्हते. त्यांचे पूर्वज इ. स. पू. अठराशेच्या आसपास ईशान्येकडून झॅग्रॉस पर्वताच्या भागात आले. वांशिक व भाषिक साधर्म्यामुळे ते कॅसाइट, हुरी, मितानी इ. लोकांत मिसळून गेले. इ. स. पू. दहाव्या-नवव्या शतकांत अशाच प्रकारचे स्थलांतर फार मोठ्या प्रमाणावर झाले आणि एकमेकांना निकट असणार्या मीड व इराणी या जमाती या भागात आल्या. त्यांपैकी मीडियन लोक अॅसिरिया-लिडिया या भागाचे सत्ताधीश झाले, तर इराणी लोक दक्षिणेकडे सरकले व इराणी आखातापर्यंत पसरले. आरंभीचे इराणी राजे मीडचे मांडलिक होते, परंतु एकदोन पिढ्यांतच ते स्वायत्त झाले. मीड व इराणी या दोन जमातींत वंश, धर्मकल्पना, भाषा या बाबतींत साधर्म्य होते.
तौलनिक दृष्ट्या संस्कृतीचा काळ अलीकडचा समजतात. अगदी पहिल्या इराणी सम्राटापासून कोरीव लेख, मुद्रा, नाणी वास्तू अशी हरतऱ्हेची साधने उपलब्ध आहेत. या सर्वांत बेहिस्तून येथील डरायसचा शिलालेख प्रसिद्ध आहे. ग्रीस व रोम यांचा इराणशी सतत संबंध येत गेल्याने ग्रीक व रोमन साहित्यांतून व बखरींतून इराणविषयी हरतऱ्हेची माहिती मिळते. आणखी एक साधन उपयोगी पडते, पण त्याचा उपयोग मुख्यत्वे उत्तर कालखंडासाठी होतो. हे साधन म्हणजे चिनी बखरी होत. यांत इराणी सत्तेचा अरबी आक्रमकांशी जो झगडा चालला होता, त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. हे लेख क्यूनिफॉर्म लिपीत आणि पेहलवी व झेंद या प्राचीन इराणी भाषांत मिळतात. पर्सेपलिस, अलवंद, व्हॅन, बेहिस्तून या ठिकाणी सापडलेल्या लेखांतून इराणी सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार व संघटना यांविषयी माहिती कोरविली आहे. प्राचीन पाश्चात्य लेखकांत हीरॉडोस, टॅसिटस, झेनोफन, स्ट्रेबो, डायोडोरस इत्यादींचे ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
इराणच्या इतिहासाचे सोयीकरिता पुढीलप्रमाणे कालखंड पाडले आहेत
(१) अॅकिनेनिडी वंश : (इ.स.पू. ५४६ ते इ.स.पू. ३३०).
(२) सिल्युसिडी वंश : (इ.स.पू. ३२४ ते इ.स.पू. २२६).
(३) आरसॅसिडी वंश : (इ.स.पू. २५० ते इ.स. २२५).
(४) सॅसॅनिडी वंश : (इ.स. २२६ ते ६४१).
यांपैकी पहिला व तिसरा वंश खास इराणी होle, तर दुसर्यावर ग्रीकांश संस्कृतीची दाट छाया पडलेली आढळते.
इ. स. पू. नवव्या शतकापासून पुढील अॅसिरियन व बॅविलोनियन लेखांत ‘परसु’ या जमातीला जिंकल्याचे उल्लेख येतात. इराणी-परसु-राज्य मीडच्या आधिपत्याखाली पन्नास वर्षे असावे. त्यानंतर शेवटचा मीडियन सम्राट अॅस्टायानीज याचा नाश करून सायरस याने स्वतंत्र राज्य स्थापिले. त्याच्या घराण्याचे नाव अॅकिमीनीझ (हखामनेश). सायरसच्या आधीच्या काही राजांची नावे ज्ञात आहेत. सायरस याने मीजियन सत्ता मोडून पश्चिम आशियातील इतर राज्ये खालसा करण्यास प्रारंभ केला. लिडिया, मीडिया, मकरान, समरकंद आणि शेवटी बॅबिलन खालसा करण्यात आले. मध्य आशियाचा प्रमुख भाग ताब्यात आल्यावर प्रगतीच्या दिशा मुख्यत्वे दोन होत्या—नैऋत्य व वायव्य. नैऋत्येला प्राचीन व संपन्न असा ईजिप्त आणि वायव्येला संपन्न असा आयोनिया होता. सायरसनंतर दुसरा कॅम्बायसीझ गादीवर आला. त्याने ईजिप्त पादाक्रांत केला. तेथून आणखी पुढे म्हणजे पश्चिमेकडे लिबियातून कार्थेजकडे आणि दक्षिणेकडून न्यूबियाकडे जाण्याचे त्याचे प्रयत्न फसले. साम्राज्याची ईशान्य बाजू नेहमीच अस्थिर राहिली कारण मध्य आशियातून येणार्या विविध जमातींचा घाला प्रथम याच भागावर पडत असे. प्रत्येक सम्राटाला या भागाकडे सारखे लक्ष पुरवावे लागले. पहिल्या डरायसच्या कारकीर्दीची पहली सात वर्षे कॅम्बायसीझच्या राज्यावर अंमल बसविण्यातच गेली. त्यानंतर त्याने वायव्येकडे मोहरा फिरवून केवळ आयोनियाच नव्हे, तर यूरोपच्या भूमीवरील सिथियावरही स्वारी केली. या मोहिमेचा उद्देश ग्रीसवर स्वारी हा नसून बाल्कन्स भागातून छापे घालणार्या सिथियन टोळ्यांचा बंदोबस्त हाच असावा. परंतु सिथियन टोळ्यांच्या गनिमी काव्याने हैराण होऊन तो परतला. त्याच्या सेनापतींनी मॅसिडोनियावर वर्चस्व स्थापिले व त्याच्या क्षत्रपांनी आयोनियन ग्रीकांतूल भांडणांत प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने भाग घ्यावयास आरंभ केला. इ.स.पू. ४९३ मध्ये ग्रीसवर आक्रमणाच्या हेतूनेच डरायसने बॉस्पोरस सामुद्रधुनी ओलांडली. या युद्धाचा शेवट सॅलामिस व प्लाशिया येथील इराणच्या पराभवाने झाला. दुसर्या डरायसने पेलोपनीशियन युद्धात हस्तक्षेप करून ग्रीक सामर्थ्याचे काहीसे खच्चीकरण केले. मात्र इराणच्या लष्करी वर्चस्वाला आता उतरती कळा लागली. वारसाहक्काच्या कलहात टायग्रिसवरील युद्धात इराणच्या सरकारी सैन्याचा ग्रीकांच्या भाडोत्री फौजेने पराभव केला. तरीही आयोनिया ते ईजिप्त या प्रचंड साम्राज्यावर स्वामित्व टिकविण्यात इराण यशस्वी झाला. अलेक्झांडरने डरायसचा इसस व गॉगामीला या दोन युद्धांत पराभव केला व शेवटी इ.स.पू. ३३० मध्ये डरायसचा खून होऊन अॅकिमेनिडी सत्ता संपुष्टात आली. यानंतर सिल्युसिडी वंशाची कारकीर्द सुरू झाली.
अलेक्झांडरने रायसचा पराभव केल्यानंतर शासनव्यवस्था आपल्या अधिकार्यांच्या ताब्यात देऊन तो हिंदुस्थानकडे वळला. हिंदुस्थानच्या वायव्येकडील बराचसा मुलूख पादाक्रांत केल्यावर त्याने भारतातून काढता पाय घेतला आणि अरबस्तानच्या स्वारीची तयारी करण्याकरिता बॅबिलनमध्ये ठाण मांडले. तेथेच तो इ.स.पू. ३२३ मध्ये मरण पावला. साहजिकच त्याच्या मृत्यूबरोबर त्याने नेमलेल्या क्षत्रपांमध्ये बंडाळी माजली आणि ते स्वतंत्र होऊ लागले. या क्षत्रपांपैकी सेल्युकस हा एक होता. मॅसिडोनियाच्या दुसर्या फिलिप राजाच्या अँटायओकस या सेनापतीचा तो मुलगा. तो अलेक्झांडरचा अत्यंत लाडका सेनापती होता आणि अलेक्झांडरने त्याचे लग्न इराणी युवती अपमा हिच्याशी लावून दिले होते. इराणच्या स्वारीत त्याचे अलेक्झांडरला फार साहाय्य झाले. या ग्रीक व इराणी वंशसंकरामधूनच पुढे सिल्युसिडी वंशाची निर्मिती झाली. या वंशाची राजवट प्राचीन इराणच्या इतिहासात महत्त्वाची मानली जाते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/27/2020
खाल्डिया : युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यात...
बॅबिलोनिया : प्राचीन मेसोपोटोतील (आधुनिक इराक) टाय...