(२७ मे १३३२–१७ मार्च १४०६). प्रसिद्ध अरब इतिहासकार आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाचा प्रणेता. त्याचे पूर्ण नाव अबू झैंद अल् अब्द रहमान इब्न मुहम्मद इब्न खल्दून. ट्यूनिशियात ट्यूनिस ह्या गावी जन्मला. १३७४ पर्यंत तो नोकरीच्या निमित्ताने अनेक स्थळी भटकला आणि अखेर इतिहासाच्या अभ्यासाकडे त्याने लक्ष वळवले. ईजिप्तच्या मामलूक सुलतानाने कैरो येथील अल्-अझार विद्यापीठात त्यास प्राध्यापक नेमले (१३८२) आणि पुढे कैरो शहराचा प्रमुख काझी म्हणून त्याची नियुक्ती केली. १४०० साली तैमूरलंगास प्रतिकार करण्यासाठी धाडलेल्या सैन्यात इब्न खल्दून होता.
इब्न खल्दूनने सात खंडांत किताब अल् इबर... ह्या नावाने जगाचा इतिहास लिहिला. त्यात जवळजवळ सर्व तत्कालीन वंश, प्राचीन वंश तसेच रोमन गणराज्ये इत्यादींची माहिती नमूद केली आहे. ह्या इतिहासाच्या मुकद्दिमामध्ये म्हणजेच प्रस्तावनाखंडात त्याने आपले आत्मचरित्र सांगून तत्कालीन समाजस्थिती, आर्थिक व्यवस्था, न्याय पद्धती आणि धार्मिक जीवन यांचा इतिहासावर कसा परिणाम होतो, याची सर्वांगीण मीमांसा केली आहे.
त्याने निवडलेली ऐतिहासिक साधने अधिक विश्वसनीय असून त्यास प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली आहे. त्याच्या इतिहासापेक्षा त्याचा मुकद्दिमा महत्वाचा ठरला. त्याचा इतिहासाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन अपूर्व मानला जातो. त्यावेळेपर्यंत इतिहासमीमांसा त्या रीतीने कोणीही केली नव्हती; म्हणूनच स्टडी ऑफ हिस्टरीच्या तिसऱ्याखंडात,आतापर्यंतच्या जागतिक इतिहासविषयक तत्वज्ञान्यांत इब्न खल्दून सर्वश्रेष्ठ आहे असे गौरवोद्गार प्रख्यात इतिहासज्ञ आर्नल्ड टॉयन्बींनी काढले आहेत. १९५७ मध्ये त्याच्या सर्व खंडांचे इंग्रजीत भाषांतर मुद्दसीन महदीने केले. त्याच्या मुकद्दिमा या प्रस्तावनाखंडाचे हिंदीत भाषांतर झाले आहे.
संदर्भ : Ibn Khaldun; Trans. Rosenthal, Franz, The Muquddimah, 3 Vols., New York, 1958.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020