प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही; तथापि ईजिप्त, अॅसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे.
बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले.
प्राचीन ग्रीस व रोममधील अनेक कोरीव लेख म्हणजे दगडांवर कोरलेले तह, करारनामे किंवा राजांच्या आज्ञा असून काहींत राजांच्या खाजगी जीवनासंबंधीही माहिती दिलेली आहे. टॉलेमी राजांच्या व रोमन वर्चस्वाखालील ईजिप्तमधील पपायरसेवरही वरील पद्धतीचीच माहिती मुख्यत्वे सापडते. ह्याशिवाय तत्कालीन ग्रीक व रोमन नाण्यांवर राजांची नावे आढळतात.
''ग्रीक हेच पहिले मानवी घटनांचे इतिवृत्त ठेवणारे लोक नसून त्यापूर्वीही अशा प्रकारची नोंद करण्यात आली आहे; परंतु ग्रीकांनी इतिहासाची चिकित्सा करून त्याच्या सत्यासत्यतेची मीमांसा केली, म्हणून इतिहासलेखनाची खरी सुरुवात त्यांच्यापासून झाली'', असे जे. बी. बेरी ह्या ग्रीसच्या इतिहासावरील एका इतिहासतज्ञाचे मत आहे.
ग्रीसमधील सर्वांत प्राचीन लेखकांनी प्रथम महाकाव्ये लिहिली. उदा., होमरचे इलियड. त्यात पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी पाल्हाळिक व दंतकथात्मक पद्धतीने निरुपण केलेले दिसते. त्यानंतरच्या इ. स. पू. सातव्या व सहाव्या शतकांतील रचना पद्यात्मक व पौराणिक होती, परंतु त्यात राजांच्या वंशावळी, त्यांचे पराक्रम ह्यांचे रंजित वर्णन आढळते. ह्या पद्धतीमुळे ढोबळ कालमान मिळू लागला. यानंतर लोकांचे भूगोल, सागरी सफरी, वसाहती वगैरे विषयींचे कुतूहल जागृत झालेले दिसते, साहजिकच त्यांच्या प्रवासांतून मिळालेले अनुभव व त्यांनी पाहिलेले प्रदेश ह्यांची माहिती त्यात सामाविष्ट होऊ लागली आणि त्यामुळे तत्कालीन समाजातील धाडसी पुरुषांना बाहेरचे जग पाहण्याची इच्छा निर्माण झाली.
थोडक्यात इ. स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून हीरॉडोटसला (इ. स. पू. सु. ४८४—४२४) द्यावे लागले; कारण त्याने पुढील पिढीसाठी इतिहास लिहून, तोही गद्यात, त्यात तत्कालीन महत्त्वपूर्ण घटनांची व व्याक्तींची नोंद आणि सविस्तार चर्चा केली. त्याने दंतकथांचा उल्लेख करून तत्कालीन चालीरीतींद्वारे काही अनुमाने काढली.
हीरॉडोटसनंतरचा दुसरा महत्त्वाचा इतिहासकार म्हणजे थ्यूसिडिडीझ (इ. स. पू. सु. ४७१—३९९). त्याने पेलोपनीशियन युद्धाचा वृत्तांत देताना फक्त तत्संबंधित घटना व काळ ह्यांची विश्वसनीय माहिती देण्याचा यत्न केला. आपल्या पूर्वसूरींप्रमाणे त्याने चर्चेत आपणास गोवून घेतले नाही. यानंतरचा इतिहासकार म्हणजे ð झेनोफन (इ. स. पू. सु. ४३०—३५५). तो तर इतिहासाच्या कथात्मक भागातच गुरफटलेला दिसतो. ह्या तीन इतिहासकारांच्या लेखनाचा पुढील इतिहासलेखनावर अनेक बाबतींत परिणाम झाला आणि पुढील इतिहासकारांनी त्यांचे अनुकरण केले.
मानवी संस्कृती अतिप्राचीन काळात ईजिप्तमध्ये विकसित झाली. पण तीवर मॅनेथो (इ. स. पू. सु. ३००) याने ग्रीकमध्ये तयार केलेली ईजिप्तच्या फेअरो राजांची अर्धवट यादी हेच काय ते इतिहासलेखन. बॅबिलोनिया, अॅसिरिया आदी प्राचीन देशांत एखादी मोठी इमारत बांधल्यावर ती बांधवणाऱ्या राजाची वंशावळ, त्या वंशाचे दिग्विजय वगैरे कोरून ठेवण्याची प्रथा होती. हे कोरीव लेख इतिहासाची साधनेच होत. बेरॉसस (इ. स. पू. तिसरे शतक) यांने बॅबिलोनियाचा त्रिखंडात्मक इतिहास ग्रीक भाषेत लिहिला. त्याचप्रमाणे बॅबिलोनिया-अॅसिरिया सरहद्दीच्या भांडणांची हजार वर्षांची हकिकत लिहिलेली होती, असे निर्देश सापडतात. गतकाळाचा आढावा घेण्याची वृत्ती प्राचीन इझ्राएलच्या ज्यूंमध्ये आढळते.
सॉल, डेव्हिड, सॉलोमन या राजांनी इझ्राइल भरभराटीला आणला. साहजिकच बायबलच्या जुन्या करारात ज्यू लोकांचा संगतवार इतिहास सापडतो. त्यातील काही प्रकरणांत इझ्राएलची सिरियाच्या गुलामगिरीतून मुक्तता हा विषय आहे आणि स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाने विजय मिळाला, अशी कारणमीमांसा केली आहे. त्यातील सर्वच लेखन विश्वासार्ह नाही; पण बायबलचा पाश्चात्त्य इतिहासलेखनावर, विशेषतः ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊन लागल्यानंतरच्या काळात, फार मोठा प्रभाव पडला यात शंका नाही. फ्लेव्हिअस जोसीफस (३७ ?—१००) हा ज्यूंचा प्राचीन काळातील शेवटचा राष्ट्रीय इतिहासकार. त्याचे हिस्टरी ऑफ द ज्यूइश वॉर आणि अँटिक्विटीज ऑफ द ज्यूज ही दोन इतिहासविषयक पुस्तके आहेत. त्यांतील लिखाण दर्जेदार नाही, पण त्यांत ज्यू व रोमन लोकांच्या संघर्षाची हकिकत संगतवार आहे.
पाश्चात्त्य इतिहासलेखनाला प्राचीन ग्रीसमध्ये प्रारंभ झाला. आयोनिया द्वीपसमूहातील शहरांचे वृत्तांत, प्रसिद्ध लोकांची भाषणे व कुलवृत्तांत लिहून देणारे धंदेवाईक लेखक आणि मायलीटसचा रहिवासी हेकाटीअस (इ. स. पू. ६ वे शतक) यांच्या लेखनांत ग्रीक इतिहासलेखनाचा उगम सापडतो. हेकाटीअसने वंशावळींमध्ये ग्रीकांच्या खात्रीलायक तेवढ्याच कथा दिल्या आहेत. ही सत्यान्वेषक दृष्टी इतिहासाला दंतकथा, पुराणे यांपासून वेगळे करण्यास पोषक ठरली. हीरॉडोटस याला इतिहासाचा जनक म्हणण्यात येते. निःपक्षपाती सत्यकथन या हेतूनेच त्याने ग्रीस-इराण युद्धांचा इतिहास लिहिला.
पण इतिहासलेखनाचा शास्त्रीय पाया घातला थ्यूसिडिडीझ याने. त्याने पेलोपनीशियन युद्ध आणि अथेन्सच्या प्रभुत्वाचा इतिहास लिहिला. तो घटनांची निवड, आधारांचा तौलनिक अभ्यास व भविष्यकाळातील मार्गदर्शन या द्दष्टींनी अपूर्व आहे. झेनोफनने थ्यूसिडिडीझचीच इतिहासलेखनपद्धती पुढे चालविली. त्याचाच आदर्थ पुढे ठेवून फ्लेव्हिअस अॅरियन (इ. स. दुसरे शतक) याने अलेक्झांडरच्या दिग्विजयांचा इतिहास लिहिला. त्याचे इंडिका हे थोटे प्रकरण भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. पोलिबियसने (इ. स. पू. २०५ ?—१२५) रोमन कालखंडावर लिहिले. इतिहासातील भूगोलाचे महत्त्व, साधनांची छाननी, कारणमीमांसेची आवश्यकता अशा अनेक दृष्टींनी त्याच्या चाळीस खंडीय इतिहासाचे महत्त्व आहे.
सामान्यतः रोमन इतिहासकारांचा दर्जा ग्रीकांपेक्षा कमी, पण त्यातील ज्यूलियस सीझरच्या आठवणी उत्कृष्ट आहेत. सॅलस्टचा (इ. स. पू. सु. ८६—३४) रोमचा इतिहास मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. सुरुवातीचे रोमन इतिहासलेखन ग्रीक भाषेमध्ये झाले. लॅटिन भाषेत लिहिणारा पहिला इतिहासलेखक केटो. टायटल लिव्ही (इ. स. पू. सू. ५९—इ. स. १७) या रोमनच्या सर्वश्रेष्ठ इतिहासकाराने रोमन साम्राज्याच्या वैभवाचे आणि विस्ताराचे वर्णन केले, तर ð टॅसिटस (इ. स. सु. ५५—११७) याने अनीतीमुळे रोमचा नाश होणार, अने भविष्य वर्तविले.
प्लूटार्कने (४६ ?—१२०) ग्रीकमध्ये चरित्रे लिहिली. तर स्विटोनिअसची (सु. ६९—१४०) सीझर-चरित्रे लॅटिन मध्ये आहेत. रोमचा हा शेवटचा महत्त्वाचा इतिहासकार. चौथ्या शतकातील अॅमिएनस मार्सेलायनसच्या (सु. ३३०—४००) इतिहासात रोमन साम्राज्याच्या विनाशाची छाया आहे. रोमन इतिहासकारांवर ग्रीकांचा प्रभाव आहे. भाकडकथा आणि धार्मिक पूर्वग्रहांचा पगडा असलेल्या मध्ययुगीन इतिहासांपेक्षा त्यांचे इतिहास जास्त दर्जेदार आहेत. युसीबिअस (सु. २६०—३४०) या चर्चच्या इतिहासकाराने बरीच हस्तलिखिते जमविली होती; पण बाकीच्या प्राचीन इतिहासकारांनी प्रत्यक्ष अवलोकन व प्रवास यांखेरीज साधनसामग्री कशी जमविली असेल, हे ठरविणे कठीण आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/11/2020