অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतिहास साधने

इतिहास साधने

कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो.

अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो. याशिवाय इतिहाससाधनांच्या भाषेवरून उदा., मराठी, फार्सी, डच, इंग्रजी इ. किंवा लेखनासाठी वापरण्यात आलेली माध्यमे उदा., सोने, तांबे, रुपे, कातडे, लाकूड, कागद, भूर्जपत्र, दगड, माती इत्यादींवरूनही इतिहास साधनांचे वर्गीकरण करता येते. समकालीन, उत्तरकालीन तसेच सार्वकालीन व विशिष्टकालीन असेही वर्गीकरण करता येते.

प्रत्येक देशाला आपल्या इतिहासलेखनासाठी इतिहास साधनांचा उपयोग होतो. भारताबाहेर पश्चिमेच्या बाजूस विशेषतः इराणचा पश्चिम भाग, इराक, तुर्कस्तानचा पूर्व भाग, सध्याचा इस्त्राएल, क्रीट व सायप्रस बेटे, ईजिप्त आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडील मेक्सिको वगैरे प्रदेशांत अनेक संस्कृती उदयास आल्या. त्यांसंबंधींच्या अलिखित साधनांत पिरॅमिड, स्फिंक्स, अवाढव्य पुतळे, मंदिरे इत्यादींचा समावेश होतो. या संस्कृती नष्ट होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. या बहुतेक संस्कृतींचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने अनेक वर्षे या संस्कृती अज्ञात राहिल्या.

पंधराव्या शतकापासून म्हणजे यूरोपीय प्रबोधनकाळापासून या संस्कृतींच्या भूमिगत व भूमिवरील अवशेषांकडे काही यूरोपीय विद्वानांचे लक्ष वेधले. त्यांनी या सर्व प्रदेशांत संचार व उत्खनन करून शोधलेल्या अवशेषांपैकी एक भाग लिखित साधनांचा आहे. ही लिखित साधने फार प्राचीन असल्यामुळे त्यांची भाषा व लिपी समजणे कठीण होते. सुदैवाने ईजिप्तमध्ये रोझेटा या स्थळी एक त्रैभाषिक शिलालेख सापडला. त्यावर सामान्यतः एकच मजकूर हायरोग्लिफिक डेमॉटिक व ग्रीक अशा तीन लिप्यांत आहे. त्यातील ग्रीक मजकुराचा काळ हायरोग्लिफिक लिपी समजण्यास फार उपयोगी झाला.

रोझेटा पाषाणलेखाप्रमाणेच इराणमध्ये बेहिस्तून येथेही एक त्रैभाषिक लेख सापडला. त्यातील एक लिपी प्राचीन फार्सी असल्यामुळे उरलेल्या दोन भाषांचे स्वरूप ज्ञात झाले. या दोन लेखांमुळे ईजिप्त, बॅबिलोनिया, सुमेरिया व अ‍ॅसिरिया तसेच हिटाइट व मितानी या संस्कृतींची माहिती देणाऱ्या लिखित साधनांचा उत्तम प्रकारे उलगडा झाला. तथापि क्रीट सायप्रस व भारतातील सिंध प्रदेशात सापडलेल्या अवशेषांतील प्राचीनतम लेखांचा अद्यापि म्हणावा तितका स्पष्ट उलगडा झालेला नाही. अमेरिकेतील माया, इंका इ. संस्कृतींचीही परिस्थिती काही प्रमाणात अशीच आहे.

या संस्कृतींचे अवशेष व त्यांत सापडलेले लेख यांचा अभ्यास करून त्या संस्कृतींची माहिती देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चार्ल्स बुली, रोनी, हेटर्सफेल्ड, हेन्री रॉलिन्सन इ. संशोधकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. भारताच्या पूर्वेकडील ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम, लाओस, चीन, कोरिया, जपान इ. देशांतही त्या त्या प्राचीन संस्कतींचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत. तथापि त्या अवशेषांचे वारसदार आजही त्या त्या देशात रहात असल्यामुळे, त्यांच्या प्राचीन संस्कृतीत सापडलेल्या लिखित साधनांची माहिती होण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. त्यांतील लेखांचा व लिपींचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये पॉल पेल्यो, ग्रुंडवेल, शावानीज, स्व्हेन, हेडीन, ऑरेल स्टाइन इत्यादींचा उल्लेख अवश्य करावयास हवा. उपर्युक्त सर्व देशांत सापडलेली लिखित साधने विटा, लाकूड, कागद, धातूंचे पत्रे, कातडे इ. माध्यमांची आहेत.

तिहास काळाचे अभ्यासाच्या दृष्टीने प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन वा आधुनिक असे तीन कालविभाग पडतात. या प्रत्येक कालविभागांतील लेख व ग्रंथ अशी दोन्ही प्रकारची साधने मिळू शकतात. प्राचीन काळासंबंधी साक्षात ऐतिहासिक माहिती देणारे ग्रंथ फार थोडे आहेत. तथापि नाणी व अलिखित साधनांद्वाराही या काळातील माहिती मिळवता येते. मध्ययुगीन इतिहासाबाबत विविध भाषांतील व विविध लिपींतील लेख, नाणी, समकालीन व उत्तरकालीन ग्रंथ यांचा मुख्यतः उपयोग होतो. मध्ययुगीन काळाच्या पूर्वार्धातील फारच थोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत; पण उत्तरार्धासाठी हजारो कागदपत्रे व शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अर्वाचीन वा आधुनिक काळासाठी तत्कालीन कागदपत्रे, ग्रंथ व वर्तमानपत्रे यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

जागतिक लिखित साधने

प्राचीन लिखित साधनांमध्ये मुख्यत्वे  कोरीव लेखांचा समावेश होतो. हे बहुतेक लेख दगडांवर अथवा विटांवर कोरलेले असून हायरोग्‍लिफिक, क्यूनिफॉर्म, ब्राह्मी, खरोष्ठी वगैरे लिप्यांत ते आहेत. काही लेख पपायरसेवर (ईजिप्त) लिहिलेले आहेत. बहुसंख्य लेख मृतांच्या स्मरणार्थ किंवा अर्पणार्थ कोरले गेलेले आढळतात. मात्र काही लेखांमधून विधिसंहिता (हामुराबीची संहिता) किंवा लष्करी दिग्विजयांचे वर्णन (फेअरो राजांचे पराक्रम) ह्याही गोष्टी आढळतात. लिखित साधनांमध्ये विधिसंहिता, प्राचीन काव्ये, राज्यांच्या जंत्री, वीरकथा, दानपत्रे इ. महत्त्वाचे असून इतिहासलेखनास त्यांचा फार उपयोग झाला आहे. मात्र ह्या साधनांचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. शिवाय कालानुक्रमाची संगती लावणे हे परिश्रमाचे काम आहे. कारण बहुतेक लेखन दंतकथा व पौराणिक कथांनी युक्त असते आणि त्यांवर धर्माचे वर्चस्व आढळते. तथापि तत्कालीन धार्मिक वा सामाजिक अंगांची माहिती त्यांतून मिळते.

विधिसंहितांत हामुराबीच्या संहितेखालोखाल हिब्रूंचे डेकॅलॉग (दहा आज्ञा), रोमनांची बारा परिशिष्टे, केंट व वेसेक्स येथील राजांचे कायदे हेही महत्त्वाचे आहेत. त्या सर्वांमधून प्राचीन कायदेपद्धतीसंबंधी बरीचशी विश्वसनीय माहिती मिळते. प्राचीन काव्यांत गिलगामेश इलियड ओडिसी ही इ. स. पूर्वीची असून बेवूल्फचे डेबोराचे गीत, हेसिअडचे वर्क्‌स अँड डेज आणि ईजिप्शियन स्तोत्रे ही नंतरची आहेत. ह्या काव्यांमधून तत्कालीन समाजस्थितीचे दर्शन घडते. राजांच्या जंत्री, वीरकथा इ. बाबतींत बहुविध साहित्य आतापर्यंत उपलब्ध झाले असून त्यांत जुन्या कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

इसवीसनाच्या प्रारंभी समाजात पुरोहितवर्ग हाच केवळ शिक्षित असल्याने व धर्माला प्राधान्य असल्यामुळे त्याला समाजात मानसन्मान असे. तत्कालीन समाजाची दिनदर्शिका (कॅलेंडर) ही मोठी गरज असे. त्याशिवाय कोणताही सण साजरा करणे अशक्य होते. साहजिकच ह्या कॅलेंडर कल्पनेमधून सण, उत्सवांबरोबरच इतर घटनांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. ह्यामधूनच पुढे इतिवृत्तांची परंपरा निर्माण झाली.

इतिवृत्तांत अँग्‍लो सॅक्सन क्रॉनिकल हे महत्त्वाचे असून त्यात अ‍ॅल्फ्रेड राजाच्या आज्ञेवरून सॅक्सनांचा इतिहास लिहिण्यात आला. ह्या नंतरच्या इतिवृत्तांत सेंट डेनिस (पॅरिस), सेंट ऑल्बन्झ (लंडन), सेंट गॉल (स्वित्झर्लंड) आणि माँटी कासीनो (इटली) ह्या प्रमुख चर्चनी इतिवृत्ते लिहिली. ह्या चर्चमधील पाद्र्यांनी तत्कालीन घडामोडींची माहिती टिपून ठेवून पुढे ती संग्रहित केली. ह्यांतील मॅथ्यू पॅरिसचे क्रॉनिका मेजोरा हे इंग्रजी इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जाते. राल्फ ऑफ डीस, राल्फ हिजडेन, रॉजर ऑफ वेंडोव्हर, टॉमस वॉल्सिंगअम इत्यादींची इतिवृत्ते त्यामानाने कमी प्रतीची व दुय्यम स्थाने मानण्यात येतात. यूरोपातील प्रत्येक देशाने ही इतिवृत्तपरंपरा पुढे चालविली, त्यामुळे यूरोपच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश पडतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate