इज्तिहादचा शब्दश: अर्थ परिश्रमांची पराकाष्ठा. इस्लामी धर्मशास्त्रात या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. श्रेष्ठ धर्मपंडितांनी धर्मार्थ लावताना किंवा कोणत्याही वादग्रस्त मुद्यावर आपला अभिप्राय व्यक्त करण्यापूर्वी, धर्मशास्त्राशी सुसंगत विवेचन करणे, म्हणजे इज्तिहादचा उपयोग करणे. काही पंडित कुराण (कुर्आन) आणि मुहंमदांच्या परंपरा यांच्याशी आपला अभिप्राय सुसंगत आहे की नाही, हे न पाहता स्वत:चे मत सांगत. स्वत:चे मत म्हणजे ‘राय’ व ते सांगण्याची पद्धती म्हणजे ‘इस्तिहासन’. परंतु कुराणात स्पष्ट अभिप्राय दिला असेल किंवा मुहंमदांची स्पष्ट परंपरा असेल अशी उदाहरणे घेऊन वादातील मुद्दा तत्सम किंवा त्यासारखाच आहे असे दाखवून, कुराणातील निर्णय किंवा मुहंमदांचा निर्णय आणि आपले प्रस्तुत मुद्यावरील मत कसे सुसंगत आहे, हे दाखविण्यासाठी परिश्रम करणे म्हणजे इज्तिहाद. यालाच ‘किया’ असे दुसरे नाव आहे. सर्व पंडितांना इज्तिहाद करण्याचा अधिकार नसे. विशेष श्रेष्ठ अशा विद्वानांनाच हा अधिकार मिळे. इज्तिहादचा अधिकार असणाऱ्यांना ‘मुज्ताहिद’ म्हणत. मुज्ताहिदाकडे कोणताही वादग्रस्त प्रश्न नेला, तर त्याची चिकित्सा करण्यासाठी त्याला पारितोषिक मिळे. त्याची चिकित्सा बरोबर ठरली, तर तो दुप्पट बक्षिसास पात्र ठरे. इस्लामच्या पहिल्या तीन शतकांत बहुतेक वादग्रस्त वाटणाऱ्या मुद्यांवर निर्णय घेतले गेले होते. त्यामुळे यापुढे कोणासही इज्तिहाद करण्याचा अधिकार नाही, असा नियम झाला. उलट शियापंथीय पंडितांकडे इज्तिहादचा अधिकार अव्याहतपणे चालू राहिला.
तेराव्या शतकात इब्न तैमीयहने, सोळाव्या शतकात सुयूतीने आणि एकोणिसाव्या शतकात वहाबने इज्तिहादचा अधिकार चालू राहिला पाहिजे, असा दावा केला आणि प्रस्थापित रूढी आणि परंपरागत विचारसरणी यांविरुद्ध बंड पुकारले. विसाव्या शतकातील अनेक धर्मपंडित इज्तिहादचा सर्रास वापर करू लागले आहेत.
लेखक :म. अ. करंदीकर
संदर्भ : 1. Iqbal, Sir Muhammed, The Reconstruction of Religious Thought in Islam, Lahore, 1933.
2. Schacht, Joseph, Origins of Muhammadan Jurisprudence, Oxford, 1950.