उमय्या खलीफाच्या कारकीर्दीत इस्लामचा खूपच प्रसार होऊन अरब-स्तानाबाहेरच्या जातीजमातींचा इस्लाममध्ये समावेश झाला. पण तत्त्वतः सर्व मुसलमान समान दर्जाचे असले, तरी प्रत्यक्षात अरब लोक स्वतःला श्रेष्ठ समजत. याचे मवाल्यांना म्हणजे अरबेतर मुसलमानांना वैषम्य वाटे. ते उमय्या सत्तेविरुद्ध झगडत. अलीच्या शिया पंथी समर्थकांचाही उमय्यांना विरोध होता. या विरोधाचा अब्बासच्या वंशजांनी फायदा करून घेतला.
अलीला हनफी स्त्रीपासून जे मुलगे झाले, त्यांच्या वंशजांपैकी अबू हाशिम याने आपला वारसाहक्क अब्बासचा पणतू मुहंमद अली याला दिल्याच्या आधारावर अब्बासी पक्षाने उमय्या सत्तेविरुद्ध कूफा येथे बंडाळी आरंभली. त्यानंतर लवकरच अब्बासी पक्षाला अबू मुस्लिम हा कर्तबगार सेनापती लाभला व त्याने मुहंमद अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहिम याला बंडास प्रवृत्त केले. उमय्याच्या सैन्याचा धुव्वा उडवून अबू मुस्लिमने कूफा येथे इब्राहिमचा भाऊ अब्दुल अब्बास यास, इब्राहिम मृत्यू पावल्यावर खलीफाच्या गादीवर बसविले. उमय्या खलीफा दुसरा मारवान याने हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण झॅब नदीकाठी त्याचा पराभव झाला व काही दिवसांनी तो मारला गेला. अशा रीतीने उमय्या खिलाफतीचा अंत होऊन अब्बासी खिलाफतीची स्थापना झाली (७५०). लवकरच बगदाद या नव्या राजधानीत तिचा कारभार चालू झाला. ही खिलाफत ७५०-१२५८ पर्यंत टिकली. या कालखंडात ३७ खलीफा झाले. अब्बासी खलीफांची दुसरी शाखा ईजिप्तमध्ये १२९१-१५१७ पर्यंत होती. त्या शाखेत २१ खलीफा झाले.
अब्बासी खलीफा पैगंबराच्या कुरैश जमातीतले असले, तरी त्यांच्या कारकीर्दीत इराणी चालीरीती, शासनपद्धती व आचारविचार रूढ होऊन इस्लामी संस्कृतीत महत्त्वाचे फेरबदल झाले. शासनात इराणी लोकांचे महत्त्व वाढले. कालांतराने खलीफांची सत्ता नाममात्र राहून खरा अधिकार वजीराकडे गेला व वजीरी ही वंशपरंपरा हक्काने मिळू लागली.
अब्बासी खिलाफतीच्या सुरुवातीचा सु. शंभर वर्षांचा काळ इस्लामी इतिहासातील सुवर्णयुग म्हणून विख्यात आहे. अल् मसूद, हारून अल्-रशीद, अल् मामूनसारखे कर्तबगार राजे व बर्मकी वंशातील नाणावलेले वजीर या काळातच झाले. हारून अल्-रशीद व त्याचा मुलगा अल् मामून यांच्या वैभवशाली कारकीर्दीचे चित्रअरेबियन नाइट्स् या विख्यात कथासंग्रहात प्रतिबिंबित झाले आहे. सुरुवातीपासूनच अब्बासी खलीफांना धार्मिक व राजकीय विरोधाला तोंड द्यावे लागले. शिया पंथीयांच्या पाठिंब्याने अब्बासी राज्यक्रांती घडून आली, तरी राज्यकर्ते म्हणून त्यांनी शिया पंथीयांचा छळ केलाच. शिया पंथीयांशिवाय इतर धार्मिक गटांचाही अब्बासी सत्तेला विरोध होता.
अब्बासी सत्ता दूरवर पसरली होती. पण कालांतराने दूरदूरच्या प्रांतांचे राज्यपाल मध्यवर्ती सत्ता झुगारून स्वतंत्रपणे वागू लागले. खुद्द बगदादमध्येही मध्येही ९४५ मध्ये ‘बुवैहीद’ जमातीच्या मुइझुद्दौला याने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली व ‘अमीर अल् उमरा’ म्हणजे ‘अमीरांचा अमीर’ ही उपाधी धारण करून तो राज्यकारभार चालवू लागला. मात्र त्याने खलीफांच्या नावानेच कारभार केला व शिया पंथी असूनही खलीफांचे सुन्नी पंथी धार्मिक धोरण चालविले. त्यामुळे अकराव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य अब्बासी खलीफांचे व कारभार बुवैदांचा अशी स्थिती होती. बुवैहीदांनंतर राजसत्ता तुर्कांच्या‘सेल्जुक’ जमातीकडे गेली व खलीफाकडे केवळ धर्मप्रमुखपद राहिले.
बुवैहीद व तुर्की राज्यकर्त्योनाही खलीफांचे विस्तृत साम्राज्य टिकविता आले नाही. अनेक प्रांतांत स्वतंत्र राज्ये स्थापन झाली व त्या सर्वांना खलीफांनी मान्यताही दिली. शेवटी चंगीझखान या मंगोल योध्याने मध्य आशियात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. अखेर त्याचा नातू हूलागुखान याने बगदाद काबीज करून अब्बासी खिलाफतीचा शेवट केला (१२५८).
अब्बासी खलीफांच्या कारकीर्दीत अरबांची ऐहिक उन्नती झाली. व्यापारउदीम, उद्योगधंदे वाढून राष्ट्रीय संपत्तीत भर पडली. नॉर्वे-स्वीडनपासून चीनपर्यंत अरब व्यापारी पोहोचू लागले व दूरदूरच्या सफरींमुळे त्यांच्यातील संकुचितपणा बराच कमी झाला. अनेक साहित्यिक, इतिहासकार, दार्शनिक, वैज्ञानिक यांना हारूनादी खलीफांचा आश्रय लाभल्याने विद्या-कलांचा उत्कर्ष होऊन मध्य आशियांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले. हारून व मामून यांच्या प्रोत्साहनाने विख्यात ग्रीक व संस्कृत ग्रंथांचे अरबी अनुवाद झाले व पूर्वपश्चिमेचा ज्ञानसंगम होऊन अरबी भाषा संपन्न झाली. गणित, खगोल, वैद्यक, प्राणिशास्त्र इ. विषयांतील प्राचीन ग्रीक व भारतीय यांच्यापासून मिळविलेल्या ज्ञानात स्वत:च्या शोधांची भर घालून, अरबांनी हा ज्ञानसाठी पाश्चात्त्य जगाला दिला. जागतिक ज्ञान-विज्ञानाच्या विकासात भर घालण्याचे बरेच कार्य अब्बासी खलीफांच्या काळाच व त्यांच्या आश्रयाने झाले, हे त्यांचे ऋण जगाला विसरता येणार नाही.
अब्बासी काळात इस्लामी कलेचा विशेष विकास झाला. तत्पूर्वीच्या कलाविषयक निर्मितीवर ग्रीकांश कलेचा परिणाम प्रामुख्याने जाणवतो. पाचवा खलीफ हारून-अल्-रशीद याच्या काळात अब्बासी कलेचा परमोत्कर्ष झाला. त्याच्या विस्तीर्ण साम्राज्यामध्ये त्या वेळी मोठमोठ्या मशिदी, भव्य प्रासाद, मीनार, किल्ले व सुबक कारंजी बांधली गेली. अलंकरणाचे वैपुल्य हा या काळातील कलेचा आत्मा. समारा येथील भित्तीचित्रांतील अर्धनग्न स्त्रिया, ख्रिस्ती पाद्री, खलीफांच्या मेजवान्यांची दृश्ये यांतून इस्लामपूर्व मानवाकृतिदर्शक शिल्पकलेची परंपरा टिकून राहिल्याचे दिसते. तत्कालीन सजावटीत द्राक्षे, द्राक्षवेल व त्याची पाने यांचे आकृतिबंध, विविध प्राण्यांचे अलकृंत आकार, तसेच पाषाण, शिंपले व रंगीत काच यांच्या तुकड्यांचा वापर केलेल्या कुट्टिमचित्रांचे अनेक प्रकार आढळतात. दक्षिण ईजिप्तमधील वाडी-अल् नाबुन येथील चर्चमधील इस्लामी सजावटीवरून हे वैशिष्ट्य ध्यानात येते. मनुष्याकृतींनी सजविलेली पक्वमृदापात्रे, सुलेखनाचे नमुने, कलात्मक अलंकृत कापड व कलात्मक काष्ठतक्षण इ. कलाविष्कार या काळात आढळतात [ इस्लामी कला ].
पहा : खिलाफत.
संदर्भ : 1. Levy, Reuben, A Baghdad Chronicle, New York, 1929. 2. Spuler, Bertold; Trans. Bagley, F. R. C. The Muslim World-Part I, The Age of the Caliphs, Leiden, 1960.
ओक, द. ह.; चांदवडकर, गो. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020