অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्वंद्व युद्ध

इतिहास

दोन सशस्र माणसांतील पूर्वनियोजित युद्ध. सामान्यतः प्रतिष्ठेसाठी, केलेल्या आरोपाच्या समर्थनासाठी, आरोपाचे खंडन करण्यासाठी, मतभेदांच्या निर्णयासाठी किंवा अतीद्वेषामुळे द्वंदयुध्दे खेळली जात. पश्चिमी देशात मध्ययुगातील मानापमानाच्या, सभ्यतेच्या, दिलदारपणाच्या कल्पना त्यांच्या बुडाशी असत. ईश्वर न्यायाच्याच बाजूने कौल देणार, ही भावनाही त्यामागे असे. मानवी बुद्धीच्या पलीकडील गोष्टीचा निर्णय करण्याचा मार्ग  म्हणजे द्वंद्वयुद्ध असे मानण्यात येई प्रतिष्ठेसाठी अशा युद्धाचे आव्हान स्वीकारावेच लागत असे यात स्त्री किंवा अशक्त माणूस सापडला तर प्रत्यक्ष यूद्धात त्याच्या नातेवाईकाला किंवा दूसऱ्या  माणसाला त्याचा प्रतिनिधी म्हणून लढता येत असे. काळाच्या ओघात असे प्रतिनिधित्व स्विकारणारांचा व्यावसायिक वर्गही निर्माण झाला. त्यांना ‘चँपीयन’ म्हणत. ही द्वंद्वयुध्दे दिवाणी किंवा मुलकी कारणांपेक्षा दुष्कृत्यांसाठीच मर्यादीत ठेवण्याची प्रवृत्ती असे. या द्वंद्वयुद्धात विरोधकाला नेहमी ठार करण्याचाच हेतू नसे. अनेक प्रसंगी रक्त निघाल्यावर किंवा नियोजीत बार झाल्यावर लढत बंद होई.

राष्ट्रीय स्वरूप असलेली तसेच व्यक्तिगत न्यायनिर्णय, प्रतिष्ठा व शूरोदारता यांच्या संदर्भात द्वंद्वयुध्दे होत. न्यायदानात दोषी-निदोर्षी ठरविण्यासाठी व सत्यासत्यतेचा निर्णय घेण्यासाठी द्वंद्वयुद्ध हे एक प्रकारचे  दिव्य करविले जाई. राष्ट्रीय द्वंद्वयुद्धामध्ये राष्ट्राच्या सेनेतर्फे प्रतीनिधी म्हणून सर्व विजेत्यांमध्ये युद्ध होई. ज्या सैन्याचे सर्व विजेते विजयी ठरत, त्या देशात विजय झाला असे मानत ऊदा., डेव्हिड व गोलायथ अथवा सोहराब आणि रूस्तुम यांची द्वंद्वयुध्दे. खाजगी तंट्यात होणारी द्वंद्वयुध्दे प्रतिष्ठात्मक असत. प्रतिष्ठायुद्धात पराभूत झालेल्या व्यक्तीस जीवनाचरितार्थ चालू ठेवणे दूःसह होई एस्किमो समाजात प्राणघातक शस्त्राऐवजी प्रतिस्पर्धा एकमेकांवर अर्वाच्य किंवा वर्मभेदी शब्दास्त्रांचा मारा करीत. जो अवाक होई, तो पराभूत समजत. शूरोदारता द्वंद्वयुद्ध हे क्षत्रियवर्गात किंवा सरदारांत प्रायः घोऱ्यावर बसून लढले जाई. ते ‘जूस्ट’ वा ‘टूर्नामेंट’ यांच्यासारखे असे.

शौर्याची चाचणी करावयाच्या उद्देशातून जर्मानिक टोळ्यांत द्वंद्वयुद्धांची सुरवात झाली, असे म्हटले जाते या युद्धांचा उल्लेख प्राचीन कायद्यांत सापडतो. पूर्वी अशी युध्दे कायदेशीर मानण्यात येत. सोळाव्या शतकापर्यत त्यांचा प्रसार मर्यादित होता. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत पिस्तुले वापरण्यात सुरवात झाली. व्दंव्दयुद्धाच्या द्वारा न्याय मिळविण्याची कल्पना ख्रिश्चन चर्चला मान्य असली, तरी अशा युद्धात होणाऱ्या हिंसक आणि प्राणघातक कृत्यांना त्यांचा विरोध असे.

भारतातील द्वंद्वयुध्दे

भारतातील द्वंद्वयुध्दे धर्मयुद्धांच्या नियमांनुसार होत असत. त्यांचे शस्त्र गदा किंवा खड्‌ग असे. मुष्टियुद्ध, मल्लयुद्ध हेही द्वंद्वयुद्धाचेच प्रकार होत बाहुयुद्ध, गदायुद्ध किंवा खड्‌गयुद्ध जमिनीवरून होत असे, अश्वारूढ किंवा गजारुप द्वंद्वयुद्धाचे प्रकारची मान्य होते. रामायण, महाभारत, पूराणे इ. ग्रंथांतून अनेक द्वंद्वयुद्धाची वर्णन सापडतात. वाली-सुग्रीव, कृष्ण-चाणूर. भीम-कीचक, भीम-दुर्योधन, भीम-जरासंघ यांच्यात झालेली युद्धे प्रसिद्धच आहेत. भारतात न्यायदानात द्वंद्वयुद्धांला कधीही स्थान दिले नव्हते. न्यायसंस्थांना दिव्य म्हणूनही द्वंद्वयुद्ध मान्य नव्हते.  संग्रामांतच संग्रामाचा एक भाग म्हणून द्वंद्वयुध्दे होत. समाजकंटक, धर्मनीतीला सोडून वागणारे दृष्ट राजे यांच्या निर्दालनासाठी नेत्यांनी, महावीरांनी द्वंद्वयुध्दे करणे सर्वसंमत होते. सामान्यत-संग्राम नीतीप्रमाणे (धर्मयुद्ध संकेत) द्वंद्वयुध्दे लढली जात.

यूरोपातील द्वंद्वयुध्दे

यूरोपात सहाव्या शतकापासून बर्गडीचा राजा गंडोबॅड यांने द्वंद्वयुद्धाला प्रेरणा दिली. सरंजामदार व सरदार यांच्यामुळे त्याला स्थैर्य आले. फ्रान्सचे राजे चौथा हेन्री व तेरावा लुई यांच्या अमदानीत एकंदर आठ हजार सरदार या प्रकारच्या युद्धात मेले. आंतरराष्ट्रीय तंट्यांचा निकाल प्रत्यक्ष राजे द्वंद्वयुद्धाने करत. जर्मनीत १९१४ पर्यत राष्ट्रवाद व स्वच्छंदतावाद या कल्पनांनी मोहित झालेले विद्यार्थी व लष्करी अधिकारी मोठ्या प्रमाणात युध्दे करत. इटलीत द्वंद्वयुद्धाचे नीतिनियम ठरवून त्यास नैतिक व सोज्वळ रूप देण्याचा देण्याचा प्रयत्न झाला प्रतीनिधीतर्फे यूद्ध करण्याची प्रथा पडली. स्त्रिया, धर्मगुरू अशाही व्यक्ती युद्धे करत. युद्धकला शिक्षक त्याचप्रमाणे धंदेवाईक योद्धे यांना मोठी मागणी असे. द्वंद्वयुद्धास कधीकधी कायद्याची मान्यता देण्याचे व बंदी घालण्याचे प्रयत्न झाले. तरीसुद्धा शासकीय न्यायसंस्था अपुऱ्या असतात, म्हणून द्वंद्वयुद्धसंस्था अपरिहार्य आहे; असाही प्रवाह ऐकू येतो. औद्योगिकीरण, मध्यमवर्गाचा उदय व न्यायसंकेतप्रगतीमुळे द्वंद्वयुद्ध ही रानटी न्यायनिर्णयप्रथा अस्तंगत झाली. कॅनडा-अमेरीके मध्ये सतराव्या शतकापासून द्वंद्वयुध्दे होत. जॉर्ज वॉशिग्टनचा मित्र अलेक्झांडर हॅमिल्टन आणि तत्कालीन उपराष्ट्रपती आरॉन बर तसेच अँड्रू जॅक्सन (पुढे राष्ट्रपती) आणि चार्ल्स डिकिन्सन यांच्यात द्वंद्वयुद्धे झाली .१८५९ मध्ये गुलामगिरीदेष्टा सिनेटर डेव्हिड बॉड्‌रिक व गुलामगिरीचा चाहता भूतपूर्व न्यायाधीश डेव्हिड टेरी यांच्यात झालेली द्वंद्वयुध्दे जगप्रसिद्ध आहेत. जपानमध्ये सामुराई क्षत्रिय द्वंद्वयुध्दे करीत. द्वंद्वयुद्धाच्या साक्षीदार नसत. कोणाची तलवार अतितीक्ष्ण आहे, वेळी हे ठरविण्याकरिता योध्यांनी स्वतःची तलवार स्वतःच्याच पोटात खुपसण्याचे प्रकारही घडले आहेत. अशी विलक्षण द्वंद्वयुध्देही इतिहासात पाहावयास मिळतात. चीनमध्ये प्राचीन काळी संग्रामांतर्गत द्वंद्वयुध्दे होत. तुर्कस्तानात द्वंद्वयुद्धे एकमेकांस कपाळाने ढकलीत. ढकलण्यात ज्याची दमछाक होई तो स्वतःच गळ्यावर कट्यार फिरवून मृत्यू पावे. रशियात ट्यूटॉनीक वांशीकांच्या सान्नीध्यामुळे सरदार-दरकदारात द्वंद्वयुध्दे होत सामान्यतः द्वंद्वयुध्दे मान्य नव्हती. राज्यक्रांती नंतर द्वंद्वयुद्धांना कायमची बंदी झाली.

द्वंद्वयुद्धाचे नियम आणि इतर तपशील मोठा मनोरंजक वाटतो. १७७७ सालचे आयरिश नियम (गॅलवे संहिता), १८३६ साली शातोव्हिलार्ड आणि द. कॅरोलायनाचा भूतपूर्व गव्हर्नर जॉन हाइड विल्सन यांनी १८३८ साली प्रसिद्ध केलेले द्वंद्वयुध्दाचे नियम मंनोरंजक आहेत. त्यावरून द्वंद्वयुद्धामागील प्रवृतीची चांगली ओळख घडते.

लेखक: श्री. पु. गोखले ; हे. वि. दीक्षित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate