रबरी चेंडू व तातीने विणलेल्या रॅकेटने खेळावयाचा एक मैदानी खेळ. विसाव्या शतकात या खेळाचा सर्वत्र प्रसार झाला. हा खेळ सुटसुटीत, थोडक्या जागेत, थोडक्या वेळात, दोन किंवा चार खेळाडूंनी खेळणे शक्य असल्यामुळे तो जगातील सर्व देशांत व बहुधा सर्व ऋतूंत खेळला जातो. यूरोपीय देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. देशांतल्या स्त्रियाही उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध आहेत. या खेळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर डेव्हिस कपचे सामने आणि जागतिक पातळीवर इंग्लंडमध्ये विंबल्डन येथे सामने होतात व अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांत होणारे राष्ट्रीय पातळीवर सामने जागतिक महत्त्वाचे मानण्यात येतात.
टेनिसचा चेंडू हा रबराचा, आत ठराविक हवेचा दाब असलेला, पृष्ठभागावर पांढरी लोकरीची फ्लॅनेल (तंतू वर असलेले कापड) लावलेला, २१/२ ते २५/८ इंच व्यासाचा (सु. ६·३५ सेंमी.) आणि २ ते २१/१६ औंस (५६ ते ५८ ग्रॅम) वजनाचा असतो. त्याची उशी (बाउन्स) तो १०० इंच (२·५० मी.) उंचीवरून जमिनीवर टाकला असता ५३ ते ५८ इंच (१·२८ ते १·४१ मी.) असावी लागते. टेनिसची रॅकेट ही वेताची, लाकडाची अगर धातूची बनविलेली असते. तिची लांबी २७ इंच (६८·५८ सेंमी.) व वजन १२ औंसापासून १४ औंसापर्यंत (३३६ ग्रॅम ते ३९२ ग्रॅम) खेळाडूच्या आवडीनिवडीप्रमाणे असते. रॅकेटचे डोके अंडाकृती असून त्याची लांबी १२ इंच (३०·४८ सेंमी.) व रुंदी १० इंच (२५·४० सेंमी.) असते. ते सामान्यतः तातीने, क्वचित प्लॅस्टिकच्या धाग्याने किंवा धातूच्या तारेने विणलेले असते. रॅकेटचा दांडा (हँडल) सु. १५ इंच (३८·१० सेंमी.) लांब असून त्याची मूठ कातडी अगर रबरी पट्ट्याने बांधलेली असते. त्यामुळे ती पकडण्यास सुटसुटीत असते. टेनिसच्या खेळाचे मैदान ७८ फूट (२३·७६ मी.) लांब व ३६ फूट (१०·९६ मी.) रुंद, लांबट चौकोनी असते. त्याच्या आतील दोन्ही बाजूंस ४१/२ फूट (१·३६ मी.) रुंदीचे समांतर पट्टे असतात. त्यांना बाजूपट्टे (लॉबी) म्हणतात. दुहेरी खेळात त्यांना मैदानाचा भाग म्हणून मानण्यात येते. मैदानाच्या मध्यभागी रुंद विणीचे जाळे असते. ते मैदानाबाहेर रोवलेल्या दोन खांबांवरून ताणून जमिनीपर्यंत लोंबकळत असते. त्याची उंची मध्यभागी ३ फूट (९१·४ सेंमी.) व खांबालगत ३१/२ फूट (१·०६ मी.) असते. ते हलू नये म्हणून मध्यभागी रुंद नवारीने जमिनीत पुरलेल्या आकडीत अडकविलेले असते. या जाळ्यापासून दोन्ही बाजूंस २१ फूट (६·३९ मी.) अंतरावर जाळ्यास समांतर अशा दोन आरंभखेळी रेषा (सर्व्हिस लाइन्स) प्रत्येकी २७ फूट (८·४५ मी.) लांब, एका आतील बाजूपट्ट्यापासून दुसऱ्या आतील बाजूपट्ट्यापर्यंत आखलेल्या असतात. या दोन्ही आरंभखेळी रेषांचा मध्य सांधणारी १३१/२ फूटांवर (४·१० मी.) रेषा असते. या रेषेच्या योगाने दोन आरंभखेळी रेषांमधील टेनिसचे मैदान दोन समान भागांत विभागले जाते. तसेच जाळ्यापासून ३६ फुटांवर असलेल्या दोन्ही पायारेषांवर (बेस लाइन्स) मध्य दाखविणारी ४ इंच (१०·१६ सेंमी.) लांबीची मैदानाची डावीउजवी बाजू दाखविणारी खूण-रेषा असते. टेनिस मैदान मुद्दाम राखून कापून तयार केलेल्या हिरवळीचे (लॉन) किंवा सिमेंट, ॲस्फाल्ट, चिकणमाती (क्ले) वा खडी-मुरूम-वाळू यांनी सपाट व कठीण (हार्ड) बनविलेले असते. त्यावर वरील सर्व रेषा २ इंच (५·०८ सेंमी.) रुंदीच्या खडू-चुन्याने आखलेल्या असतात. एकेरी (सिंगल्स) खेळात २७ फूट X ७८ फुटांचे मैदान व दुहेरी खेळात ३६ फूट X ७८ फुटांचे (बाजूच्या दोन्ही पट्ट्यांसह) मैदान वापरतात. या खेळात खेळाडू सामान्यतः पांढरा टी-शर्ट, पांढरी अर्धी चड्डी, पायात पांढरे मोजे व सपाट रबरी तळ असलेले कॅन्व्हॉसचे पांढरे बूट वापरतात.
चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वी वरच्या वर हवेत मारलेला टप्पापूर्व टोला (व्हॉली), जमिनीवर टप्पा पडतो न पडतो तोच मारलेला अर्धटप्पा टोला (हाफ व्हॉली), जमिनीवर चेंडूचा टप्पा पडून एक उशी घेतल्यानंतर मारलेला पूरोहस्त (फोरहँड) व पार्श्वहस्त (बॅकहँड) टोला, डोक्यावर रॅकेट आणून मारलेला जोरदार फटका (स्मॅश) इत्यादी.
टेनिसच्या खेळाचे मूळ ईजिप्त व इराण या देशांत इ. स. पू. ५०० च्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एका चेंडूच्या खेळात सापडते. ग्रीक आणि रोमन काळांतही अशा प्रकारचा एक खेळ खेळत असत. त्याला ‘रॉयल टेनिस’ म्हणत. त्यानंतर राजे लोकांनी तो आपल्या राजवाड्यांच्या प्रांगणात नेला. तेव्हापासून त्याला ‘कोर्ट-टेनिस’ म्हणत. आधुनिक टेनिसचा खेळ किंवा ‘लॉन-टेनिस’ हा गेल्या शतकात, १८७४ मध्ये मेजर वॉल्टर सी. विंगफील्ड याने शोधून काढला व तो लवकरच लोकप्रिय झाला. १८७५ मध्ये ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’ने या खेळाचे प्रथम नियम तयार केले व तेव्हापासून या खेळाची खरी प्रगती होत गेली. १८७७ मध्ये या खेळाच्या पहिल्या स्पर्धा सुरू झाल्या. त्या लंडनच्या विंबल्डन या उपनगरात भरल्या होत्या. १८८८ मध्ये इंग्लंडमध्ये ‘लॉन टेनिस असोसिएशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फतच हल्ली या खेळावर नियंत्रण चालते. त्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत हा खेळ सुरू झाला. तेथे त्याच्या संस्था स्थापन झाल्या. पुढे १९१२ साली इंग्लंडमध्ये ‘इंटरनॅशनल लॉन टेनिस असोसिएशन’ ची स्थापना झाली व तिच्यामार्फत या खेळात जागतिक नियंत्रण आणि संलग्नपणा आला. या संस्थेने केलेले नियम आता जगभर प्रमाणभूत मानतात.
यात १९६८ पूर्वी फक्त हौशी खेळाडूंनाच भाग घेता येत असे. आता त्या हौशी व धंदेवाईक खेळाडूंना खुल्या झाल्या आहेत. यात पुरुषांच्या एकेरी व दुहेरी, स्त्रियांच्या एकेरी व दुहेरी आणि स्त्री-पुरुषांच्या मिश्र स्पर्धा असतात. जगातील बहुसंख्य राष्ट्रांचे हौशी व धंदेवाईक खेळाडू या स्पर्धांना अत्यंत महत्त्व देतात; कारण त्यांतील विजयावर त्यांना व त्यांच्या राष्ट्राला जागतिक बहुमान मिळतो. त्यात जगातील विविध राष्ट्रांतील नामवंत खेळाडू भाग घेत असल्यामुळे खेळाचा दर्जाही उच्च असतो. वरील पाच प्रकारच्या स्पर्धांशिवाय १९४९ पासून उत्तेजनार्थ मुलांच्या एकेरी व मुलींच्या एकेरी स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. भारताच्या कृष्णनने १९५४ मध्ये मुलांच्या स्पर्धांत अजिंक्यपद मिळविले होते.
टेनिस हा जरी वैयक्तिक खेळ असला, तरी त्याला सांघिक स्वरूप देता येते व हे कार्य अमेरिकेच्या डी. एम्. डेव्हिस या नामवंत खेळाडूने केले. त्याने आपल्या नावाचा एक चषक बहाल करून १९०० सालापासून राष्ट्राराष्ट्रांमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी पहिले सामने घडवून आणले. ते सामने मोठ्या चुरशीने चालू आहेत. पहिल्या वर्षीचे सामने अमेरिकेने जिंकले (१९००). या सामन्यांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व फ्रान्स यांचाच वरचष्मा दिसतो. अमेरिकेने डेव्हिस कप २३ वेळा, ऑस्ट्रेलियाने २० वेळा, इंग्लंडने १२ वेळा व फ्रान्सने ७ वेळा जिंकलेला आहे. या स्पर्धांत १९७४ साली भारताचा संघ रशियासारख्या प्रबळ संघाचा पराभव करून निर्णायक फेरीपर्यंत येऊन पोहोचला होता. या स्पर्धा फक्त पुरुषांसाठीच आहेत.
डेव्हिस कप स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक राष्ट्रास एकेरी लढतीसाठी दोन खेळाडू व दुहेरीसाठी दोन खेळाडू, असा ४ खेळाडूंचा संघ नोंदवावा लागतो. एका राष्ट्राच्या दोन खेळाडूंना विरुद्ध राष्ट्राच्या दोन खेळाडूंशी स्वतंत्रपणे उलटसुलट असे एकूण चार एकेरी सामने खेळावयाचे असतात. एका राष्ट्राची जोडी विरुद्ध दुसऱ्या राष्ट्राची जोडी असा एकच दुहेरी सामना असतो. एकेरी व दुहेरी मिळून एकूण ५ सामने खेळावयाचे असतात. या पाचांपैकी कोणतेही तीन सामने जिंकणारा संघ विजेता ठरतो.
या स्पर्धांत सोयीसाठी चार विभाग पाडलेले आहेत : (१) अमेरिका-विभाग, (२) यूरोप किंवा पाश्चिमात्य-विभाग, (३) पूर्व-विभाग व (४) द. अमेरिका-विभाग. त्या त्या विभागात बाद-पद्धतीने सामने होतात. या चारी विभागांतील विजेती राष्ट्रे उपांत्य व अंतिम सामने खेळून त्यांत जे राष्ट्र विजयी होईल, त्याला गतवर्षीच्या विजयी राष्ट्राशी आव्हान-सामना खेळावा लागत असे; पण ती पद्धत बंद करण्यात आली आहे.आदल्या वर्षीच्या विजयी राष्ट्राला आपल्या विभागात इतरांप्रमाणेच सामने खेळावे लागतात.
या स्पर्धा १९२३ पासून खास स्त्रियांच्या साठीच आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांत फक्त इंग्लंड व अमेरिका यांतील स्त्री खेळाडू भाग घेतात. यात ५ निवडक खेळाडूंचा संघ नोंदवितात व त्यांच्यात ५ एकेरी व २ दुहेरी असे एकूण सात सामने होतात. त्यांतील ४ सामने जिंकणारा संघ विजयी ठरतो. आतापर्यंत अमेरिकेने ३० वेळा आणि इंग्लंडने ७ वेळा हा कप जिंकला आहे.
या स्पर्धा दरसाल विंबल्डनच्या स्पर्धांनंतर न्यूयॉर्कजवळील फॉरेस्ट हिल्स येथे भरतात. विंबल्डनला आलेले जगातील प्रमुख खेळाडू यांत भाग घेतात; कारण त्या विंबल्डनच्या खालोखाल महत्त्वाच्या मानल्या जातात.
अमेरिकेच्या खुल्या टेनिस स्पर्धांप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स व इटलीमधील टेनिस स्पर्धाही महत्त्वाच्या मानतात. विंबल्डन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन व फ्रेंच टेनिस स्पर्धा सलगपणे एकाच वर्षी जिंकणाऱ्या खेळाडूने टेनिसमध्ये ‘ग्रँड स्लॅम’ मिळविली, असे मानतात. तो एक जागतिक वैयक्तिक बहुमान असतो. १९३८ साली अमेरिकेचा डॉन बज, १९५३ साली अमेरिकेची स्त्री खेळाडू मॉरीन कॉनोली व १९६२ साली ऑस्ट्रेलियाचा रॉड लेव्हर यांनी हा बहुमान मिळविला आहे. दुहेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फ्रँक सेजमन व केन मॅक्रॅगॉर या जोडीने १९५१ मध्ये हा मान मिळविला.
ब्रिटिश अमदानीत टेनिसचा खेळ भारतात आला. हा खेळ खर्चाचा असल्यामुळे सामान्य लोकांपर्यंत जाऊ शकला नाही. उच्च सधन वर्गातील लोक, महाविद्यालयीन विद्यार्थी इ. हा खेळ खेळतात. भारतात या खेळाचे नियंत्रण करणारी संस्था ‘ऑल इंडिया लॉन टेनिस असोसिएशन’ ही असून तिला राज्यांतील संस्था संलग्न आहेत. भारतात राज्यपातळीवर तसेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, मध्य, उत्तर अशा विभागीय पातळ्यांवर व अखिल भारतीय पातळीवर टेनिसच्या खुल्या स्पर्धा भरत असतात. त्यांत भारतातील प्रमुख खेळाडू व काही विदेशी आमंत्रित खेळाडू भाग घेतात. आशियाई खुल्या स्पर्धा व डेव्हिस कप स्पर्धाही अधूनमधून भारतात घेण्यात येतात.
भारतात जुन्या जमान्यात म्हणजे साधारणतः १९२५–४० या काळात गौस महंमद, युधिष्ठिरसिंग, नरेशकुमार, बॉबजी, सवूर, सुमंत मिश्रा, जिमी मेहता हे प्रसिद्ध खेळाडू होते. सध्या रामनाथन् कृष्णन, जयदीप मुकर्जी, प्रेमजीतलाल, एस्. मिश्रा, विजय आणि आनंद अमृतराज असे नामवंत खेळाडू आहेत. त्यांपैकी कृष्णन आणि विजय अमृतराज या दोघांनी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची बहुमोल कामगिरी केली आहे.
१९२० पासूनच्या गेल्या ५० वर्षांत अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स इ. देशांत बरेच नामवंत खेळाडू झाले. त्यांत बिल टिल्डेन, डॉन बज, बॉबी रिग्ज, जॅक क्रॅमर, पँको गाँझॅल्स, चक मॅकिन्ले, बज पॅटी, जी. मुलॉय इ. अमेरिकेचे पुरूष खेळाडू आणि ए. एल्. ब्रो, मॉरीन कॉनोली, ए. गिब्सन, शर्ले फ्राय, बिली जीन किंग इ. स्त्री खेळाडू प्रसिद्ध आहेत. इंग्लंडचे फ्रेड पेरी, बनी ऑस्टिन, ए. जे. मोट्रॅम इ. पुरुष खेळाडू व ॲन हॅडॉन जोन्स, सी. ट्रूमन, अँजेला मॉर्टिमर इ. स्त्री खेळाडू विशेष उल्लेखनीय होत. ऑस्ट्रेलियात जी. पॅटरसन, फ्रँक सेजमन, ल्यू होड, केन रोजवॉल, रॉड लेव्हर, ए. कूपर, जॉन न्यूकोंब, नील फ्रेझर, रॉय एमर्सन इ. पुरुष खेळाडू व बी. एच्. मोल्सवर्थ, नॅन्सी बोल्टन व मार्गारेट कोर्ट इ. नामवंत स्त्री खेळाडू आहेत. फ्रान्समध्ये हेन्री कॉशे, जे. बोरोट्रा, व्हान पेट्रा हे पुरुष खेळाडू व सुझान लँग्लेन ही स्त्री खेळाडू प्रसिद्ध आहे. यांशिवाय जर्मनीचे व्हॉन क्रॅम, बंगर्ट, कुन्के, स्पेनचा मॅन्युएल सांताना, ब्राझीलचा ऑल्मेडो, द. आफ्रिकेचा क्लिफ ड्रिस्डेल, एक्वादोरचा पी. सेग्युरा, भारताचा कृष्णन, जपानचा वतानबे, फिलिपीन्सचा अॅम्पॉन, रशियाचा मेत्रेव्हिली हे जागतिक दर्जाचे खेळाडू समजले जातात. १९७५ च्या आगेमागे टेनिसमध्ये जिम कॉनर्स, बोर्ग, गिल्येर्मो व्हायलस, राऊल रॅमीरेझ, इली नस्तासे असे कित्येक तरुण खेळाडू पुढे आले आहेत.
१९७० च्या सुरुवातीपासून अमेरिकन खेळाडू या खेळात फार मोठ्या संख्येने पुढे येऊ लागलेले आहेत. या खेळातील ऑस्ट्रेलियन वर्चस्वालाही याच काळात ओहोटी लागल्याचे दिसते. कित्येक नामवंत ऑस्ट्रेलियन खेळाडू अमेरिकेत येऊन सतत खेळत असतात. दुसरे म्हणजे या खेळामुळे खेळाडूंना मिळत असलेला अफाट पैसा हे त्याच्या वाढत्या जागतिक आकर्षणाचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसाच्या रकमा फार मोठ्या असतात. ‘ग्रां प्री’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी होऊ लागल्या आहेत. २० ग्रां प्री स्पर्धांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या ८ खेळाडूंसाठी ‘मास्टर्स’ नामक सुरू झाली आहे. या सर्व स्पर्धा अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत.
टेनिसच्या खेळास चापल्य लागते. मागे, पुढे व बाजूला पळून, वाकून किंवा उडी मारूनही चेंडू टोलवावा लागतो. त्यामुळे शरीरास भरपूर व्यायाम होतो. वयाच्या पंधराव्या वर्षी खेळास सुरुवात केल्यास ऐन तारुण्यात चांगला खेळ खेळता येतो. तसेच हा खेळ वयाच्या ६० वर्षांनंतरही खेळता येतो.
संदर्भ :
1. Aberdare, M. G.; Lyndhurst, Bruce, The Story of Tennis, London, 1959 .
2. Cornel, L. Better Tennis, London, 1963.
3. Talbert, W. F.; Old, B. S. The Game of Doubles in Tennis, London, 1957.
4. Tilden, W. T. How to Play Better Tennis, New York, 1957.
लेखक: शा. वि. शहाणे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020