অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जादूचे खेळ

चमत्कृतिपणे खेळ. अशक्य वा अस्वाभाविक वाटणारी गोष्ट वा घटना घडवून आणणे जादूच्या खेळांत आवश्यक असते. अनपेक्षितता व शीघ्र हालचाली हे या खेळांचे वैशिष्ट्य असते. जादूच्या खेळांतील चमत्कारांमुळे लहानथोर त्यांकडे आकृष्ट होतात. रासायनिक, यांत्रिक विद्युत् इ. प्रकारच्या साधनसामग्रीने आणि हातचलाखीने जादूगार एकट्याने किंवा मदतनीसांचे साह्य घेऊन निरनिराळे चमत्कार करून दाखवित असतो. आपल्या चमत्काराचा प्रभाव व लोकांचे आकर्षण टिकविण्याकरिता जादूगार आपल्या कलेचे रहस्य उघड करीत नाही.

जादूगार चमत्कार दाखविण्याकरिता भुताखेतांना आवाहन करतो, अशी समजूत जवळजवळ अठरावे शतक संपेपर्यंत होती. त्यामुळे काही जादूगारांवर पूर्वी खटले भरण्यात आले, तर काहींना फाशी देण्यात आले; पण हळूहळू समज दूर होत गेला

जादूटोणा, जारणमारण, चेटूक इ. अतिभौतिक प्रकार व जादूचे खेळ यांमध्ये फरक आहे. जादूटोण्यादी प्रकारांत देवी चमत्कारावर भर असतो; जादूच्या खेळांचे तसे नाही. दैवी चमत्कार व जादूचे खेळ यांचा कोठलाही संबंध नाही. व्यक्तीचे कौशल्य हा जादूच्या खेळांचा पाया आहे व लोकांचे मनोरंजन करणे हे उद्दिष्ट आहे. जादूचे खेळ करणे कलेत मोडते व ही कला प्रत्येक देशात आढळते. भारतात वैदिक काळापासून या कलेसंबंधीचे उल्लेख मिळतात; पण त्यावर संकलित माहिती उपलब्ध नाही.

प्राचीन काळी जादू आणि धर्म या गोष्टी एकरूप होत्या. आदिम जमातींत ही एकरूपता विशेषत्वाने जाणवते. काही प्रगत प्राचीन संस्कृतींतही धर्मश्रद्धा दृढ करण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणांचा व क्लृप्त्यांचा उपयोग करून अनेक चमत्कार किंवा अलौकिक घटना करून दाखविण्यात येत. भारतात मंत्र, तंत्र वा हस्तकौशल्य असणाऱ्या व्यक्तींच्या, त्याचप्रमाणे पायिक, कापालिक यांसारख्या पंथीयांच्या किमया व चमत्कार यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांतून आढळतात.

बर्लिन म्युझीयममधील कागदपत्रांवरून इ. स. पू. ४००० पासून ही कला अस्तित्वात असावी, असे दिसते. त्यांतील माहितीनुसार डेडी याने कूफू किंवा कीओटस नावाच्या ईजिप्शियन राजाच्या (इ. स. पू. तिसरे सहस्त्रक) उपस्थितीत मुंगसाचे डोके एका पक्ष्याला लावले होते. इंडियन रोप ट्रिकसारख्या जादूच्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला व नंतर त्याची माहिती इतरत्र झाली, असे काहींचे म्हणणे आहे. गावोगाव फिरून जादूगार जादूचे खेळ करून दाखवित. मध्ययुगात जादूगार अधिक प्रवास करीत आणि आपल्या दौऱ्याची नियमित आखणीही करीत. त्यामुळे त्यांचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. त्यांचे प्रयोग रस्त्यावरील चौकात अगर बागेत होत. ते ज्या चौकात किंवा मार्गावर खेळ करीत, ते पुष्कळदा जादूगारांचे चौक व मार्ग म्हणून ओळखले जात. काही जादूगार तंबू उभारून प्रयोग करीत. नवीन छापील पत्ते उपलब्ध झाल्यामुळे जादूच्या खेळाला नवीन क्षेत्र मिळाले. काही जादूगार आपल्या खेळानंतर औषधविक्री करीत. पुढे अशा प्रकारच्या औषधविक्रीस कायद्याने बंधन घालण्यात आले.

जादूच्या स्वयंचलित्राचा (मॅजिकल ऑटोमा) उपयोग पहिल्यांदा १७८१ साली फिलिप ब्रेसलॉ याने केला. बासरीच्या तालावर नाचणारी यांत्रिक बाहुली, दिवा विझवून दुसरा एक दिवा लावणारा यांत्रिक पक्षी हे त्याचे काही नमुने. जादूच्या खेळांच्या साधनांत वाढ झाल्यामुळे जादूच्या प्रयोगाकरिता स्वतंत्र व कायमच्या जागेची आवश्यकता निर्माण झाली. मोठे दिवाणखाने, गोदामे इ. भाड्याने घेऊन त्यांचे रूपांतर छोट्याशा नाट्यगृहात करण्यात येऊ लागले. चोरकप्पे असलेल्या व कपड्याने झाकलेल्या मेजांचा व छुप्या साहाय्यकांचा जादूगार उपयोग करू लागले. मेजावर ठेवलेली वस्तू क्षणात अदृश्य होणे किंवा त्या जागी दुसरीच वस्तू उत्पन्न करणे, अशा प्रकारचे प्रयोग नुसते आदेश देऊन जादूगार साहाय्यकांच्या मदतीने करू लागले. पुढे शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग जादूगार करू लागले. लोकांनीही अशा प्रयोगांचे स्वागत केले. याच काळात जादूगार स्वत:स प्रोफेसर म्हणवून घेऊ लागले.

जादूच्या खेळास आवश्यक असलेली साधने, मोठी दालने व प्रयोगमंच उपलब्ध झाल्यामुळे जादूच्या खेळांचे प्रयोग विस्तृत प्रमाणावर होऊ लागले. प्रयोगमंच नानाविध उपयुक्त शोभेच्या उपकरणांनी भरगच्च दिसत असत. असे मंच, जादूगाराचा आगळा वेधक पोशाख यांमुळे जादूच्या प्रयोगात भव्यता आली. बार्‌टोलोमेओ बॉस्को (१७९०–१८६३), लुडविंग लिओपोल्ड डॉब्लर (१८०१–६४), अलेक्झांडर हाइमबर्गर (१८१९–१९०९) इ. प्रवासी जादूगारांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी निरनिराळ्या देशांत आपले जादूचे प्रयोग दाखविले. शास्त्रीय कल्पनेचा उपयोग करून कागदी भुताचा (पेपर घोस्ट) प्रयोग डंकेल (१८०५–७४) हा जादूगार करीत असे. या प्रयोगात आरशावर भुताचे रूप दिसे. प्रकाशयोजनेने भुताला दाखविणे व अदृश्य करणे शक्य होत असे. पुढे जादूच्या प्रयोगात भ्रम निर्माण करण्यास आरशाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. जादूच्या दिव्याचा उपयोग प्रथम रॉबर्टसनने (१७८३–१८३७) केला.

रॉकर्ट हौदिन (१८०५–७१) या फ्रेच जादूगाराने जादूच्या उपकरणांत खूप नाविन्य आणले. विविध खेळ सादर करण्यापूर्वी त्यांची काळजापूर्वक व पद्धतशीर वर्गवारी केली. त्यामुळे त्यास आधुनिक जादूकलेचा जनक म्हणतात. विद्युत्‌चुंबकाचा उपयोग करणारा हौदिन हा पहिला जादूगार आहे. १८४९ मध्ये मुलाला अवकाशात तरंगता ठेवण्याचा प्रयोग त्याने केला; परंतु हा प्रयोग पुष्कळ वर्षांपूर्वी भारतात करण्यात आला होता, असे म्हणतात. त्याने केलेले खेळ जरी जुनेच असले, तरी त्यांत त्याने परिपूर्णता आणली. त्याचा अनुयायी जॉर्जेस मेलिस (१८६१–१९३८) याने जादूच्या प्रयोगात चित्रपट–कॅमेऱ्याचा उपयोग केला. टॉमस विल्यम टॉबिन याने आरशाच्या साह्याने वस्तू झाकण्याचा प्रयोग केला. त्यायोगे एखाद्याचे मुंडके तोडलेल्या स्वरूपात दाखविणे शक्य झाले.

जॉन नेव्हिल मास्किलिन (१८३९ – १९१७) याने जादूच्या खेळांत मोलाची भर घातली. त्याने लंडनमध्ये जादूच्या खेळांकरिता प्रेक्षागृह उभारले. बंद पेटीतून सुटका करून घेण्याचा तसेच अवकाशात कोठल्याही आधाराशिवाय लटकणाऱ्या मनुष्यास वरखाली करण्याचा प्रयोग त्याने केला. १८७५ साली पत्ते खेळणारा व मोजणी करणारा सायको नावाचा व १८७७ साली प्रसिद्ध व्यक्तींची रेखाचित्रे काढणारा यंत्रमानव त्याने तयार केला. डेव्हिड डायटन (१८६८ – १९४१) हा प्रसिद्ध इंग्लिश जादूगार त्याचा भागीदार होता. बौटिअर डी कोल्टा (१८४५–१९०३) या मास्किलिनच्या खेळात काम करणाऱ्या जादूगाराने अदृश्य होणारी स्त्री (व्हॅनिशिंग लेडी) व उडत्या पक्ष्यांचा पिंजरा (फ्लाइंग बर्ड केज) हे नवीन प्रयोग सुरू केले. डी कोल्टा याने आधुनिक काळ्या कलेत सुधारणा केली. प्रकाश शोषून घेणाऱ्या वस्तूंनी जर इच्छित वस्तू झाकली, तर ती वस्तू दिसत नाही.

यायोगे कोणतीही वस्तू अदृश्य किंवा उलट प्रयोगाने दृश्य होऊ शकते. काही अमेरिकन जादूगार विशिष्ट खेळातील निपुणतेबद्दल प्रसिद्ध आहे. उदा., पत्त्यांचे जादूगार हॉवर्ट थर्स्टन (१८६९–१९३६) व नाण्यांचे जादूगार टॉमस नेल्स डाउन्स (१८६७–१९३८). होरेस गोल्डिन (१८७३–१९३९) याचा महिलेस मधोमध करवतीने कापण्याचा प्रयोग उल्लेखनीय आहे. चिनी जादूगारांत चिगंलिंग फू (१८५४–१९१८) हा प्रसिद्ध आहे.

भारतातही जगाला आपल्या जादूच्या खेळांनी चकित करणारे जादूगार निर्माण झाले आहेत. आकाशात तरंगणाऱ्या दोरीच्या जादूच्या प्रयोगाबद्दल (इंडियन रोप ट्रिक) आजही जगात कुतूहल आहे. या प्रयोगात जादूगार आपल्याजवळचा दोर हवेत फेकतो. फेकल्यानंतर या दोराचे एक टोक जमिनीवर राहते आणि दुसरे टोक आकाशात पुष्कळ वर जाऊन तो दोर तसाच उभा राहतो. जादूगाराचा साथीदार हा दोर चढून वर जातो आणि अदृश्य होतो. जादूगाराने त्याला खाली बोलाविले तरीही तो खाली येत नाही.

त्यानंतर जादूगार तोंडात सुरी धरून अधांतरी उभा असलेला दोर स्वतः चढून जातो. त्याने हवेत वार करताच अदृश्य झालेल्या साथीदाराचे हात, पाय व धड यांचे तुकडे होऊन ते जमिनीवर पडतात. हे तुकडे पाहताच त्या साथीदाराची आई आक्रोश करू लागते. नंतर जादूगार साथीदाराचे तुकडे पेटीत घालून ते नाहीसे करतो व काही  मंत्र म्हणून आकाशात फुंकर मारून त्या साथीदाराला काही उतरण्याची आज्ञा देतो. हा आदेश मिळाल्यानंतर अदृश्य झालेला व तुकडे झालेला साथीदार सुखरूपपणे त्याच दोरावरून खाली उतरतो आणि प्रेक्षकांसमोर उभा राहतो.

या अद्‌भूत प्रयोगाचे संशोधन करण्यासाठी लंडन मॅजिक सर्कल या संस्थेने पुष्कळ प्रयत्न केले. हा प्रयोग करणारे कोणी आहेत का, हे पाहण्यासाठी भारतात आलेल्या तीन तुकड्याही निराश होऊन परत गेल्या. १९५० साली कराचीत वास्तव्य करणाऱ्या एका गृहस्थाने या संशोधकांना उघड्या मैदानात केलेल्या या खेळाचा एक चित्रपटही दाखविला; पण चित्रपट खोटा असल्याचे चौकशीनंतर प्रसिद्ध झाले. लंडनच्या संस्थेने हा प्रयोग करून दाखविणाराला दहा हजार पौडांचे बक्षिस जाहीर केलेले असले, तरी हा प्रयोग करून दाखविणारा किंवा असा प्रयोग ‘स्वतः पाहिलेला आहे’ असे सांगणारा कोणी माणूसही पुढे आलेला नाही.

प्राचीन काळात जादूच्या विषयात भारताने नाव मिळविले होते. जादूच्या अनेक खेळांचा जन्म भारतात झाल्यानंतर त्यांचे ज्ञान इतर देशांत फैलावले. अशा खेळांपैकी अधांतरी बसणाऱ्या माणसाचा एक प्रयोग असा : या प्रयोगात जादूगार एका माणसाला अधांतरी बसवून दाखवितो. त्या माणसाचा एक हात एका मंचावर ठेवलेल्या चारपायीवरील (किंवा तीपाईवरील) बांबूला टेकलेला असतो. या प्रयोगात बांबूच्या जवळच एक दांडा बसवून त्याच्या आधाराने तो माणूस अधांतरी राहू शकेल असे एक साधन प्रेक्षकांच्या ध्यानात येऊ शकणार नाही अशा रीतीने त्याला जोडलेले असते.

कार्लेकर ग्रँड सर्कसमध्ये बंद पेटीतून सुटका करून घेण्याचा प्रयोग सादर करण्यात येत असे. बहुतेक जादूगारांना सार्वजनिक जागेत किंवा देवळाच्या आवारात किंवा रस्त्यावर आपले खेळ करून दाखवावे लागत असत. आजही जादूचे खेळ रस्त्यावर होत असताना दिसतात. काही लोक पिढ्यान् पिढ्या हा धंदा करीत असताना दिसतात. जादूगारांपैकी काही लोक आपली पोतडी काखेत अडकवून आफ्रिका, जावा, सुमात्रा आणि जपानपर्यंत जाऊन आलेले आहेत. विसाव्या शतकाच्या प्रारंभी एल्. के. शहा या नावाचा जादूगार इंग्लंड व इतर पाश्चात्य देशांत जाऊन आल्याचे सांगतात.

जादूच्या खेळांत आपल्या कर्तबगारीने पी. सी. सरकार (२३ फेब्रुवारी १९१३–६ जानेवारी १९७१) हे एकबी.एस्‌सी. असलेले बंगाली जादूगार प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक वेळा परदेशांत दौरे केले. उत्कृष्ट कार्यक्रम करण्याबद्दल देण्यात येणारे अमेरिकेतील ‘फिनिक्स’ पारितोषिक त्यांना दोन वेळा मिळाले होते. १९६३ साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. इंडियन मॅजिक सर्कल या संस्थेचे संस्थापक असून त्यांचे प्रोफ्रेसर सरकार ऑन मॅजिक (१९७०) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रॉकेट गर्ल, शिंपल्यातून परी निर्माण करणे, स्टेजवरील भुतांचा नाच, मायाजाल इ. त्यांचे काही वैशिष्ट्यपूर्ण खेळ आहेत. जादूगार के. लाल (१९२८– ) हे दुसरे एक उल्लेखनीय भारतीय जादूगार. रिकाम्या डब्यातून फुले काढणे, अदृश्य होणे इ. त्यांच्या खेळांनी लोक भारावून जातात. डॉ. के. बी. लेले (२ नोव्हेंबर १८८२–२ मे १९६३) यांना महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य समजण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य–चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. जादूचा अभ्यास करण्यात त्यांनी आपले पुढील आयुष्य घालविले. १ फेब्रुवारी १९४१ मध्ये त्यांनी गुरूकिल्ली   या नावाचे जादूविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. या मासिकावरून त्यांना ‘गुरूकिल्ली लेले’ म्हणत. त्यांनी जादूवर काही पुस्तके लिहीली. या पुस्तकांची इंग्रजी व उर्दू भाषेत भाषांतरेही प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्रातील जादूची पहिली शाळा त्यांनी १९३२ साली सुरू केली.

निरनिराळ्या शाळांतून जादूविद्येवर व्याख्याने देऊन त्यांनी तिचा प्रचार केला. महाराष्ट्रातील आणखी एक जादूगार रघुवीर भोपळे (२४ मे १९२४– ) यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविली आहे. शेतकऱ्याच्या या मुलास पुण्याच्या अनाथ विद्यार्थिगृहात राहून आपली मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण करावी लागली; पण नंतर त्यांनी जादूचे खेळ हाच व्यवसाय स्वीकारला. इंग्लंड, जपान, रशिया इ. देशांत त्यांनी आपले प्रयोग यशस्वीपणे सादर केले. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. जादूची शाळा नावाची एक संस्था त्यांनी पुण्यात काढली आहे. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे, स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच इ. त्यांचे प्रयोग उल्लेखनीय आहेत. चंद्रकांत सारंग, मेजर डी. एल्. कुलकर्णी, जम्मू प्रसाद शर्मा इ. भारतीय जादूगारही प्रसिद्ध आहेत.

जादूच्या प्रयोगातील यश हे हस्तकौशल्य, यांत्रिक उपकरणांचा उपयोग, शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय ज्ञान, जादूगाराचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वेधक वक्तृत्व इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असते. हात आणि हातांची बोटे, तसेच इतर अवयवांची चपळ हालचाल करणे जादूगारास आवश्यक असते

जादूगाराला आपल्या क्रिया करताना त्या वेळेवर होतील व नेमक्या प्रेक्षकांसमोर कशा येतील, याची काळजी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या जादूच्या खेळांची निवड व क्रम काळजीपुर्वक योजावा लागतो. जादूगाराचे वक्तव्य नाट्यपूर्ण व योग्य अभिनयाची जोड दिलेले असावे लागते. या गोष्टी सरावानेच साध्य होतात.जादूगार आपल्या खेळाच्या प्रयोगांत नवीन भर घालण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात; पण सर्वांनीच ही कल्पकता किंवा संशोधनाची क्षमता असतेच, असे नाही. त्याचप्रमाणे जे चांगले कल्पक असतात ते चांगल्या प्रकारे प्रयोग करून दाखवू शकतातच, असेही नाही. चांगल्या कल्पक जादूगारापेक्षा आकर्षक रीतीने प्रयोग करून दाखविणारा जादूगार अधिक यशस्वी होतो.

जादूगार तीन प्रकारच्या साधनांचा उपयोग करीत असतो

  1. प्रेक्षकांच्या डोळ्यांना जशी दिसतात, अगदी तशीच असलेली साधने.
  2. स्वतःच्या प्रयोगास मदत करण्याच्या दृष्टीने वस्तूंचे स्वाभाविक दृश्य स्वरूप न बदलता गुप्तपणे बदल केलेली साधने.
  3. प्रेक्षकांना न दिसणारी व लक्षात न येणारी साधने. जादूगार या तीनही प्रकारच्या साधनांचा आवश्यकतेनुसार वापर करीत असतो.

त्यानुसार जादूच्या खेळांचेही साधारणतः चार प्रकार करता येतील

  1. निव्वळ हातचलाखीचे खेळ. उदा., हातातल्या हातात नाणे गुप्त करणे, रिकाम्या हातातून सिगारेट काढणे इत्यादी.
  2. खास बनविलेल्या परंतु वरवर अगदी साध्या भासणाऱ्या उपकरणांच्या आधारे केलेले जादूचे खेळ. त्यांत स्टूल, टेबल, भांडी वगैरेंना गुप्त कप्पे तयार करण्यात येतात.
  3. सर्वसाधारण प्रयोग. उदा., पत्त्यांची जादू
  4. . रसायने व विद्युत्-प्रवाहाच्या साहाय्याने केलेले प्रयोग. उदा., रंग बदलणारे फूल; ज्या खुर्चीवर कोणीही बसू शकत नाही अशी भुताची खुर्ची इत्यादी.

जादूकला सर्व देशांतील, सर्व काळातील व सर्व थरांतील लोकांना आवडणारी कला आहे. प्रत्येक देशातील कला त्या देशांत मिळणाऱ्या साधनांवर अवलंबून असते. उदा., चीनमध्ये भाले, बशा, काड्या यांच्या साहाय्याने प्रयोग केले जातात. भारतात साप, आंब्याच्या कोयी यांचाही उपयोग खेळांत केला जातो. यूरोपात टेबले, खुर्च्या, हॅट्स, काचेची भांडी यांचा वापर करण्यात येतो. जपानमध्ये बांबूपासून आणि पांढऱ्या लाकडापासून बनविलेल्या पेट्या व कागदी फुले यांचा समावेश प्रयोगात अधिक असतो.

आधुनिक काळात वैज्ञानिक–तांत्रिक ज्ञान व साधने यांच्या आधारे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीला अतर्क्य वाटणारे प्रयोग करण्यात येत आहेत. १९६४ साली लंडनच्या मॅजिक सर्कलच्या मंचावर एक अद्‌भूत प्रयोग दाखविण्यात आला. पत्ते पिसून ते एका काचेच्या पेल्यामध्ये ठेवण्यात आले. आजूबाजूला कोठे धागेदोरे नाहीत याची खात्री करून घेण्यास प्रेक्षकांना सांगण्यात येऊन नंतर जादूगारही प्रेक्षकांत जाऊन बसला. प्रेक्षकांपैकी एकास मंचावर जाऊन कोणताही पत्ता काढून मंचावरील सतरंजीवर ठेवण्यास सांगण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे खाली ठेवलेला पत्ता आपोआप हवेत तरंगू लागला व हलकेच पेल्यातील पत्त्यांवर जाऊन बसला. भर दिवसा काळा पडदा न वापरता हा प्रयोग करण्यात आला होता. शेवटी जादूगाराने प्रयोगाचे गुपित सांगितले, ते असे : पत्त्यांना विशिष्ट प्रकारचे रसायन लावले होते व ज्याप्रमाणे आकाशात अग्निबाणांना मार्गदर्शन केले जाते, तसे जादूगाराचा साथीदार शेजारच्या खोलीत त्या बसून रेडिओच्या साहाय्याने पत्त्याला हवेत तरंगत ठेवू शकत होता.

हातचलाखीचे प्रयोगही प्रगत झाले आहेत. जादूगार बोलता बोलता प्रेक्षकांचे घड्याळ, खिशातले पाकिट सहजतेने काढून घेऊ शकतो. या प्रयोगाला हातचलाखीप्रमाणेच मोहक वक्तृत्वावरही जादूगाराचे प्रभुत्व असावे लागते. एखाद्याची नोट मागून घेऊन त्यावर त्याची सही घेऊन ती हातातल्या हातात नाहीशी करून दुसऱ्या प्रेक्षकाच्या खिशातून काढणे, पुरुषाचा हातरूमाल स्त्रीच्या पर्समधून काढणे, एकाचे नाणे घेऊन ते दुसऱ्याच्या नाकातून काढणे, अशा तऱ्हेचे प्रयोग फक्त दहापंधरा मिनिटेच बरे वाटतात. कारण त्यांत भपकेदार दृश्याचा भाग नसतो. मंचावर पडदे, टेबले, खुर्च्या, निरनिराळ्या प्रकारच्या पेट्या, विविधप्रकारचे प्रकाश झोत इ. साधनांनी केलेले प्रयोग तासन् तास पाहिले, तरी प्रेक्षकांना कंटाळा येत नाही. आणखी एक प्रकार जादूत आला आहे, तो  म्हणजे गणिताची जादू. मोठ्या संख्येचे वर्गमूळ, घनमूळ झटकन सांगणे, पाच मोठ्या संख्यांची बेरीज सांगणे इत्यादी. खरे म्हणजे हे प्रयोग स्मरणशक्तीचे आहेत; परंतु जादूच्या खेळांप्रमाणेच त्यांत प्रेक्षकांना चकित करण्याचे सामर्थ्य असते.

लेखक: रघुवीर भोपळे ; अच्युत खोडवे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate