অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिर्यारोहण

गिर्यारोहण

पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. 

गिर्यारोहणात दहा — पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.

गिर्यारोहणाची प्रेरणा

निसर्गावर विजय मिळविण्याची व जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा
, त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती आहेत. गिर्यारोहणात घडणारे निसर्गाचे उदात्त दर्शन व व्यावहारिक रुक्ष जीवनातून होणारी 

सुटका यांमुळेही लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटते. जितके शिखर उंच व चढण्यास कठीण, तितके मानवाचे प्रयत्न अधिक व उत्साहही दांडगा दिसून येतो. माणसाच्या विजिगीषू महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. गिर्यारोहणाच्या खेळात स्वतःच्याच सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून राहावे लागते. निसर्गच गिर्यारोहकाला कार्यक्षेत्र देतो व प्रतिस्पर्धी म्हणून विरोधही करतो. एकूण मानवजात विरूद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक खेळ आहे. या खेळातील धोकेच मानवाला या खेळाकडे अधिकाधिक प्रवृत्त करीत आले आहेत. मनोरंजनाबरोबर त्याला आपले सर्वसामर्थ्य पणास लावण्याची जिद्द पुरी करता येते; इतकेच नव्हे, तर उंच पर्वतक्षेत्रात शास्त्रीय संशोधन व अभ्यास करणे त्यास शक्य होते आणि लष्कराला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पर्वताच्या युद्धशास्त्रात निपुणही करता येते.

खडकारोहण

गिर्यारोहणाचे दोन प्रकार आहेत : (१) खडकारोहण (रॉक क्लाइंबिंग) व (२) हिमारोहण (आइस क्लाइंबिंग). उच्च शिखरावर अगदी वरच्या चढणीत साधारणतः खडकारोहण करण्याचा 

प्रसंग गिर्यारोहकावर येतो. उभ्या चढणीचे टप्पे किंवा कडे, सुळके, एक हात किंवा पाय यांनाच आधार घेता येईल अशा लहान भेगा संपूर्ण शरीर सामावून घेणाऱ्या खडकातील विदरे (चिमनीज), आरोहकाचे हातपाय एकाच वेळी दोन्ही डगरींना स्पर्श करू न शकणाऱ्या घळ्या यांसारख्या कठीण गोष्टींवर चढून जाणे खडकारोहणात येते. हे प्रकार कोठल्याही खडकारोहणात संभवतात. खडकारोहण करताना साधारणतः एका तीस—चाळीस मीटर लांबीच्या दोरखंडाला पथकातील लोकांनी विशिष्ट अंतर सोडून बांधण्यात येते. पर्वतविवरांच्या आरोहणाकरिता पाठ-चवडातंत्राचा अवलंब करतात. या पद्धतीत आरोहक आपली पाठ खडकाला टेकवून हातांच्या व चवड्याच्या रेट्याने स्वतःस वर ढकलत नेतो. शिखरावरून खाली उतरताना गोफण दोरीत अडकविलेल्या दोरखंडाचा उपयोग करण्यात येतो. चढण्यास अशक्य समजल्या जाणाऱ्या आल्प्सच्या ग्रेयन शिखरावर प्रथमच ए. एफ. ममेरी १८८८ साली चढून गेला आणि त्याने खडकारोहणाच्या प्रकाराकडे लोकांचे लक्ष वेधले. यूरोप खंडातील व अमेरिकेतील पुष्कळशा केंद्रांतील आरोहकांना खास साधनसामग्रीची व विशिष्ट तंत्रज्ञानाची जेथे गरज जाणवते अशा वैशिष्ट्यपूर्ण खडकारोहणाबद्दल बरीच आवड दिसून येते. परंतु काहीजण याच कारणांमुळे गिर्यारोहणाच्या प्राथमिक साधेपणावर परिणाम होतो, म्हणून त्यास विरोध करताना दिसतात.

बर्फारोहण व हिमारोहण

हिमारोहणात हिमनदीवरील प्रवास, बर्फाच्छादित व म्हणून अत्यंत घसरडी

अशी उभी चढण किंवा उतरण किंवा हिमकडा यांवरील आरोहण यांचा अंतर्भाव होतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणाव्या लागतात. कारण हिम भुसभुशीत असते, तर बर्फ कठीण असते. हिम-आंधळेपणा टाळण्याकरिता आरोहकांनी कोठल्याही परिस्थितीत गडद रंगाचा चष्मा घालणे आवश्यक असते. हिमकुऱ्हाडीचा उपयोगही करावा लागतो. हिमदरीचा शोध घेण्याकरिता व त्यावरचा हिमपूल किती भरीव आहे याची चाचणी करण्याकरिता हिमकुऱ्हाडीचा उपयोग गिर्यारोहक करतात. घसरंडवजा बर्फाच्या चढणीवर किंवा कठीण बर्फावर कुशल गिर्यारोहक या हिमकुऱ्हाडीचा उपयोग चढण्यास योग्य पायऱ्या खोदण्याकरिता करतो. असे करताना त्याला स्वतःचा तोल सांभाळता यावयास पाहिजे. कठीण हिमावर वा बर्फावर लोखंडी पत्र्याचा तळवा असलेल्या बुटाचा उपयोग चांगला होऊ शकतो. प्रसंगी हिमखुंट्यांचा किंवा हिमस्क्रूंचाही उपयोग करण्यात येतो. खडकारोहणापेक्षा हिमारोहणास अधिक कुशलता व अनुभव लागतो. परिस्थितीचा नीट अंदाज बांधून निर्णय घेण्याच्या नेत्याच्या क्षमतेवर हिमारोहण पथकाची यशस्विता व सुरक्षितता अवलंबून असते.

हिवाळ्यामध्ये बर्फाने आच्छादलेले पर्वत चढणे सुलभ असते पण खडकारोहण करणे मात्र या काळात सापेक्षतेने कठीण जाते. हिवाळ्यात असे पर्वत चढण्याची सुरुवात १९२० पासून झाली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate