क्रमांक २२ : हे लेणे `नीलकंठ' या नावाने ओळखले जाते. तेथील नंदी-मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकांची शिल्पे आहेत. शिवाय गणेश, कार्तिकेय, गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे.
क्रमांक २३ व २४ : ही फारशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी नाहीत. क्रमांक चोवीसच्या लेण्यात चार शिवमंदिरे असून त्यांत योनिपीठे आहेत. याला `तेली की घाणी' असेही म्हणतात.
क्रमांक २५ : हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे.
क्रमांक २६ : याची रचना एकविसाव्या लेण्यासारखीच आहे. दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ, दोन अर्धस्तंभ व प्रवेशद्वारात गजमुखे कोरलेली आहेत. याच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपालांची दोन भव्य शिल्पे आहेत.
क्रमांक २७ : हे लेणे `जानवसा' लेणे अथवा `जानवसा घर' म्हणून ओळखले जाते. याच्या जवळच क्र. २९ चे `सीता की नहाणी' या नावाने संबोधले जाणारे लेणे शिव - पार्वती विवाहाचा शिल्पपट असल्याने या विवाहाच्या संदर्भात या लेण्याला जानवसा असे म्हणत असावेत.
सभामंडपाच्या दरवाजाच्या एका बाजूस बलराम, एकानंशा व कृष्ण आणि दुसऱ्या बाजूस ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे मोठे शिल्पपट आहेत. शिवाय शेषशायी विष्णू, वराह यांच्या मूर्ती आहेत. याच दरवाज्याच्या दोन बाजूंस खिडक्या असून त्यांच्यावर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गर्भगृहात फक्त अधिष्ठान आहे, मूर्ती नाही.
क्रमांक 28 : हे लेणे पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे रम्य वाटते. लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा, यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा शाक्त देवी, गर्भगृहाशी संलग्न द्वारपाल आणि गर्भगृहात योनिपट आहेत. देवीच्या हातांत खड्ग, भुजंग, त्रिशूल, नरमुंड इ. आहेत.
क्रमांक २९ : हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये `सीता की नहाणी' या नावाने हे लेणे (४५·११ X ४५·४१ मी.) प्रसिद्ध आहे. यातील शिल्पे भव्य असूनही कलाहीन आहेत. अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंहशिल्पे आहेत, तर भिंतीवर रावणानुग्रह आणि अंधकासुरवध यांचे शिल्पपट आहेत. सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे.
दक्षिणेकडील पार्श्वमंडपात शिव-पार्वती विवाह, अक्षक्रीडेत रमलेले शिव-पार्वती असून उत्तरेकडील पार्श्वमंडपात कमळावर पद्मासनात बसलेला लकुलीश शिव आहे. त्याचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत असून त्याच्या डाव्या हातात लगुड (लाकडाचा दंड) आहे. जटामुकुट, वनमाला आणि यज्ञोपवीत ल्यालेली ही मूर्ती ऊर्ध्वरेतस अथवा ऊर्ध्वमेढ्र आहे. समोर अपूर्णावस्थेतील नटराज शिवाचे शिल्प आहे.
भव्यता, अग्रमंडप, सभामंडपादी विकसित वास्तुघटक आणि शिल्पांतील गतिमानता व चेहऱ्यांवरील विविध भाव या दृष्टींनी ही लेणी वैशिष्ट्य पूर्ण आहेत. तसेच या लेण्यांतून शाक्त, शैव व वैष्णव या तिन्ही पंथीयांचे शिल्पांकन दृग्गोचर होते. काही लेण्यांत भित्तिचित्रे आढळतात.
जैन लेणी : क्रमांक ३० ते ३४ ही जैन धर्मीयांची लेणी आहेत. ती मुख्यत्वे दिगंबर पंथीयांची आहेत.
क्रमांक ३० : हे लेणे (३९·६२ X २४·३८ मी.) म्हणजेच छोटा कैलास. हे कैलासप्रमाणेच द्राविड धर्तीचे मंदिर आहे. गोपुराच्या उजव्या आणि डाव्या भिंतींवर शिल्पे आहेत. डावीकडे प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांची यक्षिणी चक्रेश्वरी असून तिचे वाहन गरुड आहे आणि तिने पद्म, चक्र, शंख, गदा व खड्ग ही आयुधे धारण केली आहेत. उजवीकडे समभंगातील तीर्थंकरांच्या तीन मूर्ती आहेत. लेण्यात अग्रमंडप, मुख्य मंडप व गर्भगृह हे वास्तुघटक आहेत. अग्रमंडपाच्या पाठीमागील भिंतीवर सौधर्मेंद्र यक्षाच्या दोन नृत्यमूर्ती आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर गंधर्वमिथुने कोरलेली आहेत. याच्या दरवाजाच्या बाजूवर शंखनिधी आणि पद्मनिधी आहेत. गर्भगृहात महावीर यांची मुख्य मूर्ती असून बाजूला इतर तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. त्यांत पार्श्वनाथ, गोमटेश्वर यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. परंतु उत्तरेकडील भिंतीत योगासनातील अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. तिने उजव्या तीन हातांत अनुक्रमे त्रिशूळ, पाश, खड्ग धारण केले असून चौथा हात वरदमुद्रेत आहे. डाव्या हातांत पाश, घंटा असून एक हात अभयमुद्रेत आहे. अग्रमंडपात गदाधारी द्वारपाल असून छतावर भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. या लेण्याजवळ एक अपूर्ण लेणे आहे. या लेण्यात चतुर्मुख तीर्थंकर, छतावरील कमलपुष्प, पूर्णघट कोरलेले स्तंभ, अग्रमंडपातील कक्षासन आणि जोत्यावरील हत्ती अशी मोजकी शिल्पे आढळतात.
क्रमांक ३१ : क्रमांक ३१ ते ३४ ही लेणी एकमेकांस लागून खोदलेली आहेत. पहिल्या लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. सभामंडपात गोमटेश्वराची कार्योत्सर्गमुद्रेत उभी मूर्ती असून तिच्या समोर पार्श्वनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे. गर्भगृहात महावीराची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून वर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस वटवृक्षाखाली असलेली मातंगाची, तर उजव्या बाजूला आम्रवृक्षाखाली सिंहासनारूढ सिद्धायिकेची मूर्ती कोरली आहे. जैन परंपरेप्रमाणे महावीर तीर्थंकराशी मातंग यक्ष म्हणून, तर सिद्धायिका शासनदेवता म्हणून निगडित आहेत.
क्रमांक ३२ : हे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथऱ्यावर तीर्थंकराचे सर्वतोभद्र प्रतिमागृह आहे. या प्रतिमागृहाला चारही बाजूंस दोन खांब असलेले अग्रमंडप आहेत. मंदिरावर द्राविड पद्धतीचे शिखर आहे. मंदिरनिर्मितीचे तंत्र कैलासाप्रमाणेच म्हणजे वरून खाली आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंस दुमजली लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेत. प्रांगणाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भिंतींत पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका, मातंग यक्ष आणि इतर काही तीर्थंकर यांची शिल्पे आहेत.
मुख्य लेण्यात गेल्यावर अग्रमंडपात एक महत्त्वाचा पुरावा दिसून येतो. एका खांबावर तांबड्या गेरूने तीर्थंकर प्रतिमेचे रेखाटन केल्याचे दिसते. त्यानुसार मूर्ती घडविली जाई, असे स्पष्ट होते. याच मंडपातील दुसऱ्या एका खांबावर तीर्थंकार प्रतिमेखाली `नागवर्मकृत प्रतिमा' असा उत्कीर्ण लेख असून, दुसऱ्या एका खांबावर `श्री सोहिलब्रह्मचारिणी शांतिभट्टारक प्रतिमेयम्' असा लेख शांतिनाथ तीर्थंकराच्या प्रतिमेखाली आहे. याच लेण्याच्या तळमजल्याच्या गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे. वरच्या मजल्यावर चढताना अर्ध्या वाटेतील प्रतिमागृहात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका आणि मातंग यक्ष यांच्या प्रतिमा आहेत; तर वरच्या मजल्यावरील अग्रमंडपात मातंग आणि सिद्धायिका यांच्या समोरासमोर भव्य प्रतिमा आहेत. मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात.
क्रमांक ३३ : `जगन्नाथ सभा' ह्या नावाचे हे लेणे दुमजली आहे. तळमजल्यातील लेण्यात मातंग आणि सिद्धायिका यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. वरच्या मजल्यावर बारा खांबांचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थंकर प्रतिमा आहेत. महावीर प्रतिमेलाच जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे.
क्रमांक ३४ : हे शेवटचे जैन लेणे अग्रमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून, येथेही तीर्थंकर आणि गोमटेश्वर ह्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो.
इतर लहानसहान लेणी : वर वर्णन केलेल्या मुख्य लेणीसमूहाव्यतिरिक्त वेरूळला याच लेण्यांच्या परिसरात इतरही छोटीछोटी लेणी आहेत. उदा., `तेली की घाणी' (क्र. २४) जवळ दोन लेणी असून त्यांत गर्भगृहात त्रिमूर्ती, तर मंडपात पंचाग्निसाधन करणारी उमा कोरलेली आहे. याशिवाय गणेशमूर्तीही आहे.
लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) च्या वरच्या बाजूस डोंगर-पठारावर `गणेश लेणी' या नावाने संबोधल्या जाणाऱ्या लेण्यांचा समूह आहे. यांतील एकात गर्भगृहात शिवलिंग असून या लेण्याचे वैशिष्ट्य असे, की याच्या मंडपाच्या छतावर लिंगोद्भव शिव, समुद्रमंथन यांची भित्तिचित्रे आहेत. दुसऱ्या एका लेण्यात गर्भगृहात गणेशाची मूर्ती आहे, तर इतर काहींमध्ये महेशमूर्ती उत्कर्णी केलेल्या आहेत. आणखी काही अंतरावर `योगेश्वरी' नावाच्या लेण्यांचा समूह आहे. ही लेणी आकाराने लहान असून त्यांत शिवलिंग आणि महेशमूर्ती आढळून येतात. ही सर्व लेणी, त्याचप्रमाणे यांतील चित्रकारी अकराव्या-बाराव्या शतकांतील असावी. स्थापत्य आणि शिल्प यांच्यातील जोम नष्ट झाल्याचा हा काळ होता.
लेखक : शां.भा.देव
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कान्हेरीच्या गुहा ह्या भारतातील सर्वात मोठ्या गुहा...
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहे...
लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसि...
निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स...