অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभिजाततावाद

अभिजाततावाद

साहित्यातील : पश्चिमी वाङ्मय-क्षेत्रातील आदर्शानुकरण व संकेतपालन यांवर भर देणारी महत्त्वाची विचारसरणी. प्राचीन ग्रीक व लॅटिन व साहित्य त्यांनी प्रभावित झालेले उत्तरकालीन पश्चिमी साहित्य यांचा आधार या विचारसरणीस आहे. ही विचारसरणी व 'अभिजात' ही विशेषणात्मक संज्ञा या दोहोंनाही एक इतिहास आहे: ग्रीक-लॅटिन साहित्याचा प्राचीन कालखंड (इ.स.पू. ९०० ते इ.स.पू. ५००), यूरोपातील प्रबोधनकाळ (१४५० ते १६००), नव-अभिजाततावादाचा कालखंड (१६०० ते १८००) व स्वच्छंदतावादाचा कालखंड (स्थूल मानाने १८०० नंतर) हे त्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे असून, त्यांतूनच वाङ्मयीन अभिजाततावादाचे स्वरूप अधिकाधिक निश्चित होत गेले. यावरून या वादाला केवळ एक ऐताहासिक विचारसरणी समजणे मात्र एकांगी ठरेल; याचे कारण प्राचीन ग्रीक-लॅटिन साहित्याच्या अनुकरणीय ठरलेल्या विशेषांचे तात्त्विक स्वरूप या वादात अंतर्भूत होते. अभिजाततावादास केवळ एक ऐतिहासिक विचारसरणी अथवा केवळ एक इतिहासनिरपेक्ष तत्त्वप्रणाली मानले तर या वादाचे यथार्थ स्वरूप समजणार नाही.

अभिजाततावादाने कालवाङ्मयविषयक विशिष्ट शैली, विशिष्ट दृष्टिकोन, विशिष्ट मनोवृत्ती, विशिष्ट प्रेरणा, विशिष्ट कालखंड व विशिष्ट वाङ्मयीन मूल्यकल्पना यांपैकी एक, अनेक किंवा सर्वच गोष्टी सुचविल्या जातात. अशा गोष्टींचा संदर्भ कधी प्राचीन ग्रीक व लॅटिन कला-साहित्यापुरताच सीमित असतो, तर कधी त्यांना अनुसरणाऱ्या उत्तरकालीन कला-साहित्याचाही त्यात समावेश केला जातो. ‘अभिजात’ या विशेषणात्मक संज्ञेचा उपयोग ऑल्स जेलियस या लॅटिन इ.स.च्या दुसऱ्या शतकात प्रथम केला. ‘स्क्रिप्टर क्लॅसिकस’ व ‘स्क्रिप्टर प्रोलेटेरियस’ असे लेखकांचे दोन वर्ग कल्पून, समाजातील उच्चवर्गीय लेखकांस त्याने 'अभिजात' हे विशेषण लावले. पुढे मध्ययुगात (५०० ते १४५०) व यूरोपीय प्रबोधनकाळात अभ्यसनीय व अक्षर ठरविण्यात आलेल्या साहित्यकृतींना व साहित्यिकांना अभिजात मानण्यात आले. त्यानंतरच्या कालखंडात (१६०० ते १८००) सर्वच प्राचीन ग्रीक व लॅटिन साहित्य अभिजात मानून, त्यांच्या आशय-अभिव्यक्तीविषयक आदर्शांना अनुसरणाऱ्या तत्कालीन साहित्यास ‘नव-अभिजात’ ही संज्ञा देण्यात आली. स्वच्छंदतावादाच्या प्रभावकाळात ‘जे जे प्राचीन, ते ते अभिजात’ या कल्पनेला विरोध करण्यात आला व कोणत्याही काळातील श्रेष्ठ साहित्यकृतींना ‘अभिजात’ असे संबोधण्यात आले.

प्राचीन ग्रीक साहित्य स्वयंभू होते; म्हणजे कोणत्याही बाह्य आदर्शाचे अनुकरण त्यात नव्हते. होमर (इ.स.पू. सु. ८५०), हेसिअड (इ.स.पू.सु. ८५०), टर्टीअस (इ.स.पू. ७ वे शतक), पिंडर (५१८-४३८ इ.स.पू.) हे कवी व सॅफो (६१५-? इ.स.पू.) ही कवयित्री; एस्किलस (५२५-४५६ इ.स.पू.), युरिपिडीझ (४८०-४०७ इ.स.पू.), अॅ रिस्टोफेनीस (सु. ४४५-३८८ इ.स.पू.) व मीनांदर (३४२-२९१ इ.स.पू.) यांसारखे नाटककार; सॉक्रेटीस (४६९-३९९ इ.स.पू.), प्लेटो (४२८-३४७ इ.स.पू.) अॅंरिस्टॉटल (३८४-३२२ इ.स.पू.), एपिक्यूरस (३४२-२७१ इ.स.पू.), झीनो (इ.स.पू. ३ रे शतक), प्लोटायनस (२०५-२७०), पॉर्फिरी (२३३-३०१) व लाँजायनस (३ रे शतक) यांसारखे तत्त्वज्ञ व साहित्यशास्त्रकार आणि प्लूयटार्कसारखा (४५-१२५) चरित्रकार या सर्वांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न केले. इ.स.पू. चौथ्या शतकातील अलेक्झांडरच्या कालखंडातच ग्रीक साहित्याची नवनिर्माणक्षमता क्षीण झाली व पूर्वकालीन साहित्याच्या आधारे ग्रीक साहित्यशास्त्र निर्माण झाले. साहित्यप्रकारांचे विवेचन करून त्यांसंबंधीच्या नियामक कल्पना मांडण्यात आल्या. या संदर्भात प्लेटोच्या रिपब्लििक व अॅ रिस्टॉटलच्या पोएटिक्स या ग्रंथांचा परिणाम उत्तरकाळात अधिक झाला.

अभिजाततावादाला अभिप्रेत असणारे आदर्शानुकरण व संकेतपालन हे विशेष प्रथम लॅटिन साहित्यात (इ.स.पू. २४० ते इ.स. ५००) दिसतात. ग्रीक साहित्यातील अनुकरणीय विशेष नेमके कोणते होते, याचा बोध लॅटिन साहित्य व समीक्षा यांवरून होऊ शकतो. लुकीशिअस (९४-५५ इ.स.पू.), काटलस (८४-५४ इ.स.पू.), व्हर्जिल (७०-१९ इ.स.पू.), हॉरिस (६५-८ इ.स.पू.), ऑव्हिड (इ.स.पू. ४३-स.इ. १८), प्रोपर्शियस (५०-१५ इ.स.पू.), टिबलस (इ.स.पू. ६०-इ.स.१९), ल्यूकन (३९-६५), स्टेशियस (४५?-९६१) व क्लॉडियन (सु. ४ थे शतक) या लॅटिन कवीपुढे ग्रीक काव्याचा आदर्श होता. प्लॉटस (२५४-१८४ इ.स.पू.), टेरेन्स (१९५-१५९ इ.स.पू.) व सेनीका (इ.स.पू. ४-इ.स. ६५) या लॅटिन नाटककारांच्या नाट्यलेखनावर ग्रीक नाट्याचा प्रभाव होता. हॉरिसने अॅअरिस्टॉटलच्यापोएटिक्सच्या नमुन्यावर आर्स पोएटिका या ग्रंथाची रचना केली. लॅटिन साहित्यातील अनुकरणाच्या व संकेतपालनाच्या प्रवृत्तीचे दर्शन साहित्यकृतींच्या घाटावर भर देणाऱ्या लॅटिन समीक्षेत घडते. साहित्याची शब्दकळा व शैली, रचनेतील एकात्मता व प्रमाणबद्धता, आविष्कारातील संयम व सदभिरुची आणि आशयातील शाश्वतता व भव्योदात्तता यांवर लॅटिन समीक्षेने भर दिला आणि प्रतिभागुण, साहित्यिकाची आत्मनिष्ठा व ऐतिहासिकता या घटकांकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे लॅटिन कालखंडात साहित्याचे क्षेत्र समाजातील वरच्या वर्गापुरते मर्यादित बनले व जिवंत भाषेपासून वाङ्मयीन भाषेची फारकत करण्यात आली. ‘अभिजाततावादी साहित्य म्हणजे समाजातील उच्चवर्गीयांचे साहित्य’ ही कल्पना ग्रीक साहित्यापेक्षा लॅटिन साहित्यालाच अधिक लागू पडते.

मध्ययुगीन कालखंडातील पश्चिमी साहित्यनिर्मितीवर ग्रीक साहित्यापेक्षा लॅटिन साहित्याचाच प्रभाव अधिक होता. ग्रीक साहित्य जवळजवळ स्मृतिशेष झाले होते. मध्ययुगाच्या अखेरच्या एकदोन शतकांत आधुनिक यूरोपीय भाषांत साहित्यनिर्मिती होऊ लागली. विशेषतः इटलीत प्राचीन लॅटिन साहित्यापासून प्रेरणा घेतलेल्या बोकाचीओ (१३१३-७५) व पीत्रार्क (१३०४-७४) यांनी आपल्या स्वतंत्र लेखनाचे आदर्श निर्माण केले. त्यांचा फार मोठा प्रभाव नंतरच्या इटालियन साहित्यनिर्मितीवर झाला.

 

यूरोपीय प्रबोधनकाळात (१४५० ते १६००) प्राचीन ग्रीक व लॅटिन विद्याकलांचे पुनरुज्जीवन झाले. मुद्रणकलेमुळे या पुनरुज्जीवनास फार मोठी मदत झाली. व्यक्तिमाहात्म्य  व इहलोकनिष्ठा या तत्त्वांचा यूरोपीय प्रबोधनकारांनी पुरस्कार केला. प्राचीन ग्रीक साहित्यात नेमक्या याच तत्त्वांचे दर्शन त्यांस घडले. सर्वच प्राचीन साहित्याला ‘अभिजाततावादी’ ही संज्ञा याच कालखंडात प्राप्त झाली. प्रदीर्घ काळाच्या कसोटीला उतरून अक्षर ठरलेले; शाश्वत जीवनतत्त्वे, कलात्मक प्रमाणबद्धता व विश्वव्यापक प्रत्ययकारिता या गुणांनी संपन्न असलेले व म्हणून आदर्श व अनुकरणीय ठरणारे जे साहित्य, ते अभिजाततावादी होय, हा प्रबोधनकाळाचा दृष्टिकोन होता. नव-अभिजाततावादाची पार्श्वभूमी प्रबोधनकाळानेच घडविली, हे यावरून लक्षात येते. फ्रान्समध्ये ग्रीक काव्याचा आदर्श स्वीकारणारा ‘प्लाय’ (Pleiad) कवींचा संप्रदाय याच कालखंडात उदयास आला.

नव-अभिजाततावादाचा प्रभावकाळ साधारणपणे सतराव्या शतकापासून अठराव्या शतकातील स्वच्छंदतावादाच्या उदयापर्यंत मानला जातो. प्रबोधनकाळातील व्यक्तिवादाची तीव्रता या काळात कमी झाली.‘बुद्धियुग’ किंवा ‘ज्ञानयुग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कालखंडात स्फूर्तीपेक्षा बुद्धिमत्तेला व आत्माविष्कारापेक्षा उद्बोधनाला अधिक महत्त्व होते. कदाचित म्हणूनच, साहित्यविषयक नियमनास व संकेतपालनास लेखकवर्ग व वाचकवर्ग हे दोघेही अनुकूल होते. नव-अभिजाततावादाचा भर ग्रीक व लॅटिन साहित्यकृतींच्या अनुकरणापेक्षा ग्रीक व लॅटिन समीक्षेतील तत्त्वांच्या अनुसरणावर अधिक होता. अॅकरिस्टॉटलचा हवाला देऊन नाट्यरचनेत स्थलकालकृतीच्या ऐक्याचा दंडक निर्माण करण्यात आला; पण त्यात अॅारिस्टॉटलच्या संकल्पनेचा विपर्यास झाला. अॅृरिस्टॉटलच्या पोएटिक्स व हॉरिसच्या आर्स पोएटिकायांच्या धर्तीवर फ्रेंच, इंग्लि्श व जर्मन भाषांत साहित्यविषयक तंत्राचे विवेचन करणारे ग्रंथ रचण्यात आले. त्यांत फ्रेंच भाषेतील ब्वालोचा (१६३६-१७११) L’Art Poetique (१६७४) हा ग्रंथ, इंग्रजी भाषेतील पोपचे ‘एसे ऑन क्रिटिसिझम’ (१७११) हे पद्यमय निरूपण व जर्मन भाषेतील गोटशेट् याच्या Versuch einer Kritischen Dichtkunst या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. भाषिक शुद्धतेसाठी  इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी वगैरे देशांत स्वतंत्र संस्थाच स्थापन करण्यात आल्या. साहित्याचे विषय, आशय व अभिव्यक्ती या सर्वच बाबतींत काटेकोर संकेत रूढ झाले व त्यांचे प्रतिपालन करण्यावर भर देण्यात आला.

फ्रान्समधील नव-अभिजाततावादाची चळवळ सर्वांत प्रभावी होती व तिचा प्रभाव स्पेन, जर्मनी, इंग्लंतड या देशांवरही होता. रासीन (१६३९-९९) व कॉर्नेय (१६०६-८४) हे नाटककार व ‘प्लाय’ संप्रदायातील नंतरचे कवी फ्रेंच नव-अभिजाततावादाचे प्रवर्तक होते. फ्रान्समध्ये ग्रीक आदर्श प्राधान्याने स्वीकारण्यात आले. इटलीत लॅटिन साहित्याचे आणि बोकाचीओ व पीत्रार्क या खुद्द इटालियन लेखकांचे अनुकरण करण्यात आले. इंग्लं डमध्ये सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्राचीन ग्रीक व लॅटिन साहित्याची भाषांतरे करण्यास प्रारंभ झाला. बेन जॉन्सन (१५७२-१६३७), ड्रायडन (१६३१-१७००), पोप (१६८८-१७४४), डॉ. जॉन्सन (१७०९-८४), अॅरडिसन (१६७२-१७१९) व स्विफ्ट (१६६७-१७४५) हे साहित्यिक नव-अभिजाततावादाचे पुरस्कर्ते होते. जर्मनीत हेर्डर (१७४४-१८०३) व लेसिंग (१७२९-८१) यांच्या समीक्षेने फ्रेंच नव-अभिजाततावादाचा जर्मन साहित्यावरील प्रभाव जवळजवळ नष्ट झाला. गटे (१७४९-१८३२) या प्रसिद्ध जर्मन लेखकाने उत्तर आयुष्यात प्राचीन ग्रीक साहित्याच्या आदर्शांचा पुरस्कार केला. जर्मनीतील खराखुरा   नव-अभिजाततावाद रूपण कलांच्या क्षेत्रात प्रकट झाला. योहान व्हिंग्‌केलमानने (१७१७-६८) प्राचीन ग्रीक व लॅटिन कलांचा इतिहास लिहून त्यास चालना दिली.

अभिजाततावादाची अखेरची व काहीशी महत्त्वाची मीमांसा स्वच्छंदतावादाच्या कालखंडात करण्यात आली. ऐतिहासिक दृष्टीने नव-अभिजाततावादाची प्रतिक्रिया म्हणून या वादाचा उदय झाला. आधुनिकतावादी दृष्टीने अभिजाततावादाची जी मीमांसा करण्यात आली, तिची पार्श्वभूमीही स्वच्छंदतावादास आहे. आधुनिकतावादाने प्रगतीचे तत्त्व पुढे करून प्राचीन साहित्याच्या आदर्शांना विरोध केला. राष्ट्रीय साहित्याची कल्पना मांडून, अन्य राष्ट्राच्या साहित्याचे अनुकरण त्याच्याशी विरोधी आहे, असा दृष्टीकोन प्रकट केला. प्राचीन ग्रीक व लॅटिन साहित्याचा अभिजात आदर्श ख्रिस्ती आदर्श ठरत नाही, असेही मत काही आधुनिकतावादी विचारवंतांनी मांडले. स्वच्छंदतावादी लेखकांनी सर्वच प्राचीन साहित्य अभिजात आहे, या कल्पनेस विरोध केला. प्राचीन ग्रीक साहित्य नंतरच्या लॅटिन साहित्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. अभिजाततावाद व स्वच्छंदतावाद म्हणजे केवळ ऐतिहासिक विचारप्रणाली नसून, मानवी मनाच्या दोन सार्वत्रिक व स्थिर प्रवृत्ती आहेत, असा महत्त्वाचा विचार स्वच्छंदतावादाच्या कालखंडातच व्यक्त करण्यात आला. अभिजाततावादी मनोवृत्ती प्रामुख्याने स्थितिशील असते व स्वच्छंदतावादी मनोवृत्ती प्रामुख्याने गतिशील असते, असे मानण्यात आले.

वरील सर्व विवेचनावरून साहित्यातील अभिजाततावादाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील : या वादात आदर्शानुकरणाचे तत्त्व मध्यवर्ती आहे. हे तत्त्व श्रेष्ठ साहित्यकृतींच्या अनुकरणात व परंपरागत वाङ्मयीन संकेतांच्या प्रतिपालनात दिसून येते. वस्तुनिष्ठता हेही या वादाचे महत्त्वाचे लक्षण होय. हे लक्षण तर्कशुद्धता, विवेकप्राधान्य, कलात्मक उद्दिष्टाच्या प्रकट जाणिवेने नियंत्रित केलेली रचना, कलात्मक प्रमाणबद्धता, भव्योदात्त आशय व शाश्वत सत्यांचे प्रतिपादन या बाबतींत आढळते. सामाजिक विवेक हेही या वादाचे वैशिष्ट्य आहे. त्याचे दर्शन प्रचलित सामाजिक नीतिनियमांचे पालन, सदभिरुची, प्रातिनिधिक स्वभावचित्रण, सामाजिक उद्बोधन व आशय-अभिव्यक्तीमधील सर्वांगीण औचित्यविचार इ. विशेषांत घडते.

कलाक्षेत्रातील अभिजाततावाद : प्राचीन अभिजात कलांतील प्रेरकता व अनुकरणीय आदर्श यांवर आधारलेला पश्चिमी कलेतिहासातील पुनरुज्जीवनवादी संप्रदाय. काटेकोर अर्थाने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील ‘अॅाटिक’ म्हणजे अथेन्सच्या वास्तुकला व शिल्पकला याच आद्य अभिजात कला असल्या, तरी रूढार्थाने उत्तरकालीन ग्रीकांश (हेलेनिस्टिक; इ.स.पू. चौथे व तिसरे शतक) व रोमन (इ.स.पू. दुसरे ते ख्रिस्तोत्तर पहिले शतक) कलांचाही अंतर्भाव अभिजात कलांत केला जातो. याचे कारण यूरोपीय कलेतिहासातील मध्ययुगीन कालखंडात (१०० ते १३००), नंतरच्या प्रबोधनकाळात (१३०० ते १६००) व नव-अभिजाततावादी कालखंडात (१८ व्या शतकाच्या मध्यापासून १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत) प्राचीन ‘अॅ टिक’ कलेबरोबरच ग्रीकांश व रोमन कलाही प्रेरक, आदर्श व अनुकरणीय ठरल्या. ‘अॅपटिक’ कलातत्त्वांचा आधार घेणारी ग्रीकांश कला ही खऱ्या अर्थाने पहिली अभिजाततावादी कला ठरते. मात्र अभिजाततावादी पुनरुज्जीवनाच्या उत्तरकालीन प्रेरणा केवळ विशुद्ध कलादृष्टी व केवळ आदर्शानुकरण एवढ्यांपुरत्याच सीमित नव्हत्या. धर्मसत्ता व राजसत्ता यांची ध्येयधोरणे व गरजा, परंपराप्रियता व परंपराप्रदर्शन, विभिन्न प्रदेशविशिष्ट कलाप्रवृत्तींना कधी प्रतिरोध करण्याची तर कधी सामावून घेण्याची प्रवृत्ती-यांचाही परिणाम अभिजाततावादी कलानिर्मितीवर झालेला दिसतो. प्राचीन ग्रीक युग पुन्हा जगण्याची आकांक्षा ‘ग्रीकांश’ व रोमन कालखंडातील सर्वसामान्य प्रवृत्तीचा एक भाग होती; तर उत्तरकालीन अभिजाततावादी पुनरुज्जीवनातजुन्याच्या आधारे नवीनाला उदात्तता आणण्याची मनोवृत्ती होती. सम्राट ऑगस्टसने (इ.स.पू. २७ ते इ.स. १४) नव्या रोमन संस्कृतीचे ध्येय बाळगले; पण त्यासाठीही अभिजात ‘हेलेनिक’ म्हणजे ग्रीक संस्कृतीचाच आधार त्यास घ्यावा लागला. थोडक्यात, अभिजाततावादी कलासंप्रदायात परिस्थितिजन्य प्रेरणा व प्रवृत्ती यांचा प्रभाव उमटलेला आहे व तदनुषंगाने अभिजाततावादी कलानिर्मितीचे स्वरूपही बहुजिनसी बनले आहे.

अभिजाततावादी कलेचा मूलाधार असलेल्या प्राचीन अभिजात कलाविश्वाचे स्थूल स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता येईल. ४८० ते ४०४ इ.स.पू. हा कालखंड ‘अॅलटिक’ किंवा ग्रीक कलेचा सुवर्णकाल होय. वास्तुकला, शिल्पकला, मृत्स्नाशिल्प इत्यादींपुरतीच ‘अॅधटिक’ कलानिर्मिती उपलब्ध आहे. कालदृष्टीने ‘अॅ्टिक’ कलानिर्मितीच्या मागेपुढे जे वैचारिक वातावरण होते, त्याचे प्रातिनिधिक स्वरूप प्लेटोच्या आदर्शवादी विचारसरणीत दिसते. सौंदर्य व परिपूर्णता या अभिजात मनोवृत्तीच्या आवडत्या संकल्पना होत्या; त्यांची आदर्शवादी अभिव्यक्ती ‘अॅरटिक’ कलेत उमटली. पेरिक्लीझच्या (४९५-४२९ इ.स.पू.सु.) अनुज्ञेने इ.स.पू. ४७७ मध्ये अक्रॉपलिस या प्राचीन राजनगरीच्या पुनर्रचनेस सुरुवात झाली. या पुनर्रचनेतूनच ‘अॅ्टिक’ वास्तुकलेचे अभिजात स्वरूप रूपास आले. देवमंदिर व नाट्यगृह असे दोनच महत्वाचे वास्तुप्रकार ग्रीकांनी हाताळले. कमानींचा पूर्णतः अभाव असलेल्या ग्रीक वास्तुकलेत गोलाकार स्तंभ हाच केंद्रीभूत घटक होता. ‘डोरिक’, ‘आयोनिक’ व ‘कॉरिंथियन’ अशा तीन प्रकारच्या ग्रीक स्तंभरचना प्रसिद्ध आहेत.

ग्रीक शिल्पकारांनी आपल्या शिल्पाकृतींच्या प्रतिष्ठापनेचे स्थान व पद्धती यांचा क्वचितच विचार केला. उपलब्ध ग्रीक शिल्पकला संगमरवरी असली, तरी ब्राँझचाही उपयोग ग्रीकांनी केला असावा, असे दिसते. पुरुषमूर्ती (Kouros) व स्त्रीमूर्ती (Kore) आणि उत्थित शिल्प एवढ्यांपुरतीच ग्रीक शिल्पकला मर्यादित होती. पुरुषमूर्तीना ‘अपोलो’ अशी सामान्य संज्ञा होती व त्या मूर्ती बहुधा कमावलेल्या शरीराच्या सुदृढ क्रीडापटूंच्या असत. त्यांत शारीर हालचालींची समतोल अभिव्यक्ती साधलेली असे. मानवी देहाच्या सौंदर्याची अभिज्ञता ग्रीक शिल्पकलेत व्यक्त झाली आहे. पॉलिक्लीटस या प्रसिद्ध ग्रीक शिल्पकाराने आपल्या कॅनन नावाच्या प्रबंधात मानवी देहाकृतीच्या प्रमाणबद्धतेची तत्त्वे मांडलेली आहेत. अभिजात व अभिजाततावादी शिल्पकलेत ‘कॅनन’ चा प्रभाव महत्त्वाचा आहे. इक्टायनस (इ.स.पू. ५ वे शतक), कॅलिक्राटीझ (इ.स.पू. ५ वे शतक), फिडीयस (५००-४३२ इ.स.पू.), मायरन (४८०-४४० इ.स.पू.) व पॉलिक्लीटस हे प्रसिद्ध ग्रीक शिल्पकार होत. पार्थनॉनच्या मंदिरातील फिडीयसच्या उत्थित शिल्पाकृती, मायरनचा डिस्क्स थ्रोअर (४६०-४५० इ.स.पू.) व डाइंग वॉरियर (इ.स.पू. ५ वे शतक) या अभिजात शिल्पाकृतींत ग्रीक अभिरुचीचे यथार्थ दर्शन घडते.

अलेक्झांडरच्या (३५६-३२३ इ.स.पू.) साम्राज्यविस्तारांमुळे ग्रीकांश कालखंडातील कलेवर पौर्वात्य कल्पनांचा ठसा उमटला. पर्गमान व रोड्झ या भागांतील कलावंतांनी पौर्वात्य कल्पना अभिजात कलापरंपरेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. प्राचीन व प्रादेशिक कलांतील उत्तमाची निवड करण्याची प्रवृत्ती या कालखंडात आढळते. अभिजात मनोवृत्तीत परिवर्तन होऊन ग्रीकांच्या निसर्गप्रेमात वास्तवता व कल्पकता या विशेषांचा मिलाफ झाला. ग्रीक कलेतील प्रतीकात्मकता लोपून, अलंकृत व भडक अभिव्यक्तीकडे ग्रीकांश कलाभिरुची झुकू लागली. वास्तुकलेत ‘डोरिक’ शैलीची जागा ‘कॉरिंथियन’ शैलीने बळकावली. ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये यांसारख्या लोकोपयोगी वास्तूंची उभारणी होऊ लागली. ऐतिहासिक व पौराणिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवनातील विषयही ग्रीकांश कलावंतांनी स्वीकारले. ग्रीक शिल्पाकृतींतील सुदृढ व पुष्ट बांध्याऐवजी नाजूक व सडसडीत शरीरसौष्ठव व चेहऱ्याची भावदर्शक ठेवण यांस महत्त्व आले. शिल्पाकृतींतील नग्नदर्शनावरील निर्बंधही या कालखंडात पूर्णपणे दूर झाले. व्हीनस द मिलो (इ.स.पू. २ रे शतक), विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस (इ.स.पू.सु. १८०), वुंडेड गॅलॅशियन (मूळ ब्राँझ; इ.स.पू. २ रे शतक) आणि लोकून (इ.स.पू. ५०) या ग्रीकांश कालखंडातील लक्षणीय शिल्पाकृती होत. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील स्कोपस, लायसिपस व प्रॅक्सीटेलीझ हे शिल्पकार प्रभावशाली ठरले. या कालखंडाच्या अखेरीस प्राचीन अभिजात कलादर्श अनुकरणापेक्षा केवळ संदर्भासाठी स्वीकारण्यात येऊ लागले. प्लिनी (२३-७९) या रोमन ज्ञानकोशकाराचा कालनिर्देश काहीशा फेरफाराने स्वीकारल्यास, ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात रोमन कलानिर्मितीला चालना मिळाल्याचे दिसते. ख्रिस्तपूर्व १४६ च्या सुमारास रोम हे पाश्चात्त्य विद्याकलांचे केंद्र बनले. मध्य इटलीतील पूर्वकालीन इट्‌रुस्कन कलेचा वारसा म्हणून, रोमन कलेला कथात्मक व प्रतिमाचित्रणात्मक अभिव्यक्ती व कमानींचा वास्तुविशेष यांचा लाभ झाला होता [→इट्‌रुस्कन संस्कृति]. ग्रीक व ग्रीकांश कलांप्रमाणेच इतरही प्रदेश विशिष्ट कलापरंपरांचा परिणाम रोमन कलेवर झाला. रोमन कालखंडातील अभिजात कलाप्रवृत्ती प्राधान्याने संश्लेषणात्मक होती : ग्रीक, ग्रीकांश, इट्‌रुस्कन व अन्य प्रदेशविशिष्ट कलाविषयांचे आपल्या युगप्रेरणेने संश्लेषण करून रोमन कलेने स्वतःची पृथगात्मक अभिजातता सिद्ध केली.

या कालखंडात पॉलिओ व्हिट्रव्हिअस (इ.स.पू. १ ले शतक) याने पॉलिक्लीटसच्या ‘कॅनन' प्रमाणेच पण वास्तुकलेवर स्वतंत्र प्रबंधरचना केली (२५-२३ इ.स.पू.). प्रस्तुत प्रबंध पुढे मध्ययुगीन कालखंडात विशेष परिणामकारक ठरला. बुद्धिमान लोकांची ग्रीक वास्तुकला रोमन काळात व्यवहारबुद्धीच्या बहुजनांची बनली. वास्तूमधील अंतर्गत अवकाश, कमानी व घुमट यांचे रचनामूल्य व सौंदर्यमूल्य रोमन कलावंतांनी ओळखले व प्रत्यक्षातही उतरविले. ग्रीकांच्या ‘आयोनियन’ व ‘कॉरिंथियन’ या दोन शैली एकत्र करून, एक नवीनच‘रोमन’रचनाशैली तयार करण्यात आली. तसेच दोन नाट्यगुहे एकत्रित करून विशाल ‘अॅलम्फीथिएटर’ ची वास्तू उभारण्यात आली. ग्रीकांच्या ‘डोरिक’ शैलीचा प्रभाव असलेल्या इट्‌रुस्कन परंपरेतील ‘तस्कन’ शैलीचा उपयोगही रोमनांनी केल्याचे दिसते. भव्यता व मजबूतपणा या ग्रीक वास्तुविशेषांत विविधता व उपयुक्तता या नव्या विशेषांची भर रोमन वास्तुकलेने घातली. रोमन स्मारकस्तंभ  व विजयकमानी आणि पाँपेई व हर्क्यूलॅनिअम येथील वास्तुकला ग्रीकांश परंपरेतील ठरतात. पौर्वात्य वास्तुकलेच्या अनुकरणातून रोमन‘बॅसिलिका’ म्हणजे सभागृहे यांची उभारणी करण्यात आली. आरा पॅसी (अल्टार ऑफ पीस; १३-९ इ.स.पू.),कॉलॉसिअम हे अॅेम्फीथिएटर (७०-८२), आर्क ऑफ टायरस(८१), कॉलम ऑफ ट्रॅजन (११७) व पँथिऑन(१२०-२४) या विख्यात रोमन वास्तूंत रोमन कलेचे संश्लेषणप्रधान स्वरूप दिसून येते.

रोमन शिल्पकलेत वास्तुकलेच्या तुलनेने ग्रीक आदर्शांचे अनुकरण अधिक प्रमाणात आढळते; मात्र ग्रीकांच्या आदर्श अभिव्यक्तीऐवजी यथार्थ प्रतिमा-चित्रणावर रोमन कलावंतांनी अधिक भर दिला. आर्क ऑफ टायरसव कॉलम ऑफ ट्रॅजन यांवरील उत्थित शिल्पात ऐतिहासिकता व कथात्मकता हे नवे विशेष दिसतात.लोकूनच्या प्रक्षोभक कृतिव्यंजक शैलीचाही प्रभाव रोमन शिल्पकलेवर पडल्याचे दिसते. पाँपेईच्या भित्तीचित्रांत रोमन शिल्पकारांनी त्रिमिती साधलेली आहे. कुट्टिमचित्रणही रोमन कालखंडात आढळते.

भव्यता व उत्तुंगता या गुणांनी संपन्न असलेल्या रोमन कलेत ग्रीक कलेतील आशय, अभिव्यक्ती व युगधर्म यांतील परिपूर्ण सुसंवाद आढळत नाही. याचे कारण रोमन काळातील समाजाच्या बहुजिनसी प्रकृतीत असावे.

मध्ययुगीन कालखंडातील (१०० ते १३००) अभिजाततावादी कलानिर्मिती मुख्यतः ख्रिस्ती धर्मकल्पनांनी प्रभावित झाली. कॉन्स्टंटीनने (२८८? – ३३७) प्रवर्तित केलेल्या ‘बायझंटिन’ कलेत ग्रीक प्रतीकात्मकता ख्रिस्ती प्रतीकात्मकतेत रूपांतरित झाली. रोमन सभागृहांचे रूपांतर ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांत झाले. आदर्शवादी ग्रीक शिल्पकला साधुसंतांच्या प्रतिमा-शिल्पात परिणत झाली. कॉन्स्टंटीन येथील हॅगिओ सोफिया (५६३) या चर्चच्या वास्तूत ग्रीक वास्तुकलेतील भव्यता व प्रमाणबद्धता यांचा ठळक प्रत्यय येतो. शार्लमेन (७४२-८१४) याने प्रेरित केलेल्या ‘कॅरोलिंजियन’ पुनरुज्जीवनात रोमन कलादर्श स्वीकारण्यात आले. व्हिट्रव्हिअसच्या वास्तुकलेवरील प्रबंधाचा पद्धतशीर अभ्यास होऊ लागला व कलाविषयक नवीन प्रबंधरचनाही होऊ लागली. नियमानुसरणाची ठळक अभिजाततावादी प्रवृत्ती याच कालखंडात उदयास आली. ‘रोमनेस्क’ (१००० ते १२००) व विशेषतः ‘गॉथिक’(१२०० ते १२७५ व नंतरही) या  अखेरच्या कलासंप्रदायांत संमिश्र मध्ययुगीन कलाविशेषांची परिणत अवस्था दिसते. मध्ययुगातील धार्मिक व राजकीय वातावरण अस्थिर होते; त्यामुळे कलानिर्मितीमागील प्रेरणाही संमिश्र व तात्कालिक गरजपूर्तीच्या स्वरूपाच्या होत्या. म्हणूनच या कालखंडातील अभिजाततावादी पुनरुज्जीवने एकजिनसी वाटत नाहीत.

प्रबोधनकाळात प्राचीन ग्रीक-रोमन परंपरेचा अभ्यास व अभिमान वाढीस लागले; तरी प्रत्यक्ष कलानिर्मितीत मात्र अभिजात आत्मप्रत्यय आढळत नाही. इटलीतील रोमन कलेच्या अखंड परंपरेमुळे प्रबोधनकालीन कलादर्श प्राधान्याने अभिजात रोमन कलेतील असले, तरी पूर्वकालीन सगळ्याच कलापरंपरांचा पृथक् परिणाम तत्कालीन कलेवर झालेला दिसतो. प्रबोधनकाळाचा प्रमुख कलावंत व कलाचिकित्सक लेओन आल्बेर्ती (१४०४-७२) याने चित्रकला (Della Pittura, १४३६), वास्तुकला (De Re Aedificatoria, १४५०-७२) व शिल्पकला (De Statua,१४६४) यांवरील आपल्या पुस्तकांतून प्रबोधनकालीन कलादृष्टी विशद केली आहे : 'कला ही बुद्धी व सुसूत्र पद्धती यांवर आधारित असते आणि कलासौंदर्याचे नियम पूर्वनिश्चित व सुस्पष्ट आहेत.’---आल्बेर्तीच्या या आशयाच्या विचारांत प्रबोधनकालीन अभिजाततावादाची बाह्य व नियमाधीन प्रवृत्ती स्पष्ट होते. फ्लॉरेन्सची नव-प्लेटॉनिक अकादमी (१४३५) व आन्द्रेआ पाललाद्यो (१५१८-८०) याचा वास्तुकलेवरील प्रबंध ( I Quattro Libri dell’ Architettura, १५७०) यांतूनही तीच प्रवृत्ती दिसून येते. याच कालखंडात चित्रकलेचा वेगाने विकास झाला. प्राचीन अभिजात चित्रकला उपलब्ध नसली, तरी अन्य अभिजात कलाविशेषांचा प्रभाव नवजात चित्रकलेवर झाला. या कालखंडाच्या उत्तरकालात रीतिलाघववाद (मॅनरिझम; १६ व्या शतकाचा उत्तरार्ध), बरोक (१७ वे शतक), रोकोको (१८ वे शतक) इ. कलासंप्रदाय उदयास आले. अभिजात कलांतील अनेक घटकांचा प्रभाव या कलासंप्रदायांवर झालेला असला, तरी त्यांमागे  मूलतः प्रतिभाशाली कलावंतांच्या व्यक्तिगत प्रेरणा होत्या. अशा कलावंतांत लिओनार्दो दा व्हींची (१४५२-१५१९), मायकेलअँजेलो (१४७५-१५६४), तिशन (१४७७-१५७६), रॅफेएल (१४८३-१५२०), कोररेद्जो (१४९४-१५३४), व्हाझारी (१५११-७४), काराव्हाद्जो (१५७३-१६१०), रूबेन्स (१५७७-१६४०), पूसँ (१५९४-१६६५), लोरेन (१६००-८२), रेम्ब्रँट (१६०६-६९) व सर क्रिस्टोफर रेन (१६३२-१७३३) या कलावंतांचा निर्देश करता येईल.

अंशतः बरोक व रोकोको कलांविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून, पण मुख्यतः प्राचीन ग्रीक-रोमन कलाकृतींच्या साक्षात दर्शनाने लाभलेल्या स्फूर्तीमधून, १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात नव-अभिजाततावादाची चळवळ उदयास आली. हर्क्यूलॅनियम (१७३८) व पाँपेई (१७४८)  येथील उत्खनने तसेच व्हिंग्केलमान (Gedanken uber die Nachahmung der Griechischen Werke, १७५५ व Geschichte der Kunst des Alterthums, १७६४), जेम्स स्ट्यूअर्ट व निकोलास रिव्हेट (अँटिक्विeटीज ऑफ अथेन्स, १७६२) आणि रॉबर्ट अॅtडम(‘डायोक्लिशिअन’ या प्राचीन रोमन वास्तूचा अभ्यास, १७६४) यांचे लेखन, यांनी प्राचीन अभिजात कलांचे अपूर्व व प्रत्यक्ष दर्शन कलावंतांना घडविले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध (१७७५-८१) व विशेषतः फ्रेंच राज्यक्रांती (१७८९-९९) यांच्या क्रांतिकारक वातावरणात ग्रीक-रोमन प्रजासत्ताकांचा प्राचीन  काळ व  त्यातील भव्योदात्त अभिजात कला आदर्शवत् व अनुकरणीय वाटणे काहीसे स्वाभाविक होते. पण पुराणवस्तुसंशोधनामुळे या कालखंडात अचूक व यथार्थ अनुकरणाचा दंडक अभावितपणे निर्माण झाला. अभिजात कलाप्रवृत्तीऐवजी अभिजात कलाभ्यासाला महत्त्व देण्यात आले. स्वतःच्या व स्वकालाच्या प्रेरणांकडे कलावंतांनी दुर्लक्ष केले. नेपोलियन अॅभट जाफा हे स्वकालीन चित्र काढणाऱ्या बॅरन ग्रोने, गुरूने (झाक ल्वी दाव्हीद) तेजोभंग केला म्हणून आत्महत्या केली; आणि केवळ समतोलपणाचा कलासंकेत पाळण्यासाठी आंटोन मेंग्ज या विख्यात जर्मन चित्रकाराने पॅर्नासस या चित्रात ग्रीकांच्या नऊ म्यूझेस दहा केल्या.

फ्रान्समध्ये रोमन व जर्मनीत ग्रीक वास्तुकलेचे प्राधान्याने अनुकरण करण्यात आले. इंग्लं ड-अमेरिकेत मात्र दोनही प्राचीन कलांचे आदर्श स्वीकारण्यात आले. फ्रान्स,  जर्मनी व अमेरिका येथील विजयस्तंभ व कमानी यांवर रोमन काळातील कॉलम ऑफ ट्रॅजन व कॉलम ऑफ मार्कस ऑरीलियस यांचा ठसा आहे. पॅरिसच्या पॅथिऑनच्या वास्तूत तर प्राचीनांचे नावापुरतेच अनुकरण केलेले दिसते. ग्रीकांच्या ‘डोरिक’शैलीतील इंग्लंरडमधील गार्डन टेंपल(१७५८). ‘आयोनिक’ शैलीतील अमेरिकेतील बँक ऑफ पेनसिल्व्हेनियाची इमारत (१७९९), संमिश्र शैलीतील इंग्लं डमधील बँक ऑफ इंग्लंचडची इमारत (१७८८-१८३५), रोमन शैलीतील पॅरिसचे चर्च ऑफ द मॅडेलिन(१८०६-४२) व ग्रीक परंपरेतील जर्मनीच्या रेगेन्झबर्गचे व्हॅल्हॅल चर्च (१८३०-४२) या नव-अभिजाततावादी कालखंडातील प्रसिद्ध वास्तू होत.

नव-अभिजाततावादी शिल्पकलेत ग्रीकांश आदर्शावर भर होता. धर्मभिन्नतेमुळे ग्रीकांची प्रतीकात्मकता ख्रिस्ती कलावंतांना परकी वाटणे स्वाभाविक होते. मात्र प्राचीनांच्या ऐतिहासिक व पौराणिक कलाज्ञापकांचा उपयोग या कालखंडातील शिल्पकलेत आढळतो. कानॉव्हाची (१७५७-१८२२) पर्सिअस ही शिल्पाकृती व पॅरिसच्या आर्क द ल इतोइल (१८०६-३६) या विजयी कमानीवरील नेपोलियनच्या राज्यारोहणाच्या उत्थित शिल्पाकृती या कालखंडाच्या चैतन्यहीन शिल्पकलेच्या निदर्शक आहेत. बॅटेंल टुर्व्हाल्सन (१७७०-१८८४) हा या काळातील एक उल्लेखनीय शिल्पकार होय.

या कालखंडातील चित्रकलाही तत्त्वे, नियम व पद्धती यांत गुरफटलेली होती. प्राचीन शिल्पाकृतींच्या आधारे चित्रकलेचे शिक्षण देण्यात आल्याने ती अधिक रेखाप्रधान बनली. प्रारंभीच्या चित्रांत राजकीय विचारांची व्यंजना असली, (झाक ल्वी दाव्हीदच्या (१७४८-१८२५) ओथ ऑफ द होराती (१७८५) या चित्रात क्रांतीच्या सशस्त्र उठावाची व्यंजना आहे.) तरी नंतरच्या काळात मात्र तिची जागा पढीक अलंकरणाने घेतली. दाव्हीदप्रमाणेच आंटोन मेंग्ज (१७२७-७९) व झां ऑग्यूस्त अँग्न (१७८०-१८६७) हेही या कालखंडातील प्रसिद्ध चित्रकार होत.

नव-अभिजाततावादी कालखंडातील अभिजात कलाप्रवृत्ती उत्स्फूर्त व प्रामाणिक असली, तरी तिच्यात प्राचीनांची मौलिक सर्जनशीलता नव्हती. म्हणूनच काही अभिजात कलाकृतींचे प्रत्यक्ष आदर्श समोर उपलब्ध असतानाही, नव-अभिजाततावादी कलानिर्मिती सांकेतिकतेच्या सीमा ओलांडू शकली नाही.

अभिजाततेची संकल्पना म्हणजे केवळ बुद्धिगोचर तत्त्वांवर आधारलेला आकृतिगत समतोलपणाच नव्हे;तर धार्मिक, नैतिक व ऐतिहासिक प्रेरणांचे संश्लेषण साधलेली वैश्विक परमव्यवस्थेची सुसंवादी अभिव्यक्ती होय. अशा वैश्विक परमव्यवस्थेची प्रतीकात्मकता, हे खरे तर कलेतील अभिजाततेचे व अभिजाततावादाचेही सारसर्वस्व होय. प्राचीनांना साधलेली ही प्रतीकात्मकता, फ्रेंच क्रांतिकालातील आरंभीची कालनिर्मिती सोडल्यास, अन्यकालीन अभिजाततावादी पुनरुज्जीवनांत आढळत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अभिजात कलातत्त्वांचे विघटन होऊन त्यांत शैक्षणिक पढीकतेचा पोकळपणा निर्माण झाला. चालू शतकात अनुकरणापेक्षा प्रेरणाप्राप्तीसाठी अभिजात कलेकडे कलावंत वळत आहेत, असे दिसते.

संदर्भ : 1. Barton, J. E. What is the Classical Style?, 1941.

2. Bate, W. J. From Classic to Romantic: Premises Taste in Eighteenth Century England, New York, 1961

3. Bunim M. Space in Medieval Painting and the Forerunners of Perspective, New York, 1940.

4. Clark, A. F. B.Boileau and the French Classical Critics in England-1660-1830, 1925.

5. Eliot, T. S. On Poetry and Poets, London, 1956.

6. Kristeller, P. O. The Classics and Renaissance Thought, Cambridge, 1955.

7. Leicht, Hermann, History of the World’s Art, London, 1963.

8. Thomas, R. H. The Classical Ideal in German Literature 1755-1805-An Introduction and an Anthology, 1939.

9. Thomson, F. A. K. Classical Background of English Literature, New York, 1948.

१०. वाळिंबे, रा. शं. साहित्यातील संप्रदाय, पुणे, १९६६.

लेखक :रा. ग. जाधव

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate