(१४ फेब्रुवारी १४०४–२५ एप्रिल १४७२). यूरोपीय प्रबोधनकाळातील प्रसिद्ध इटालियन वास्तुशिल्पज्ञ, चित्रकार, संगीतकार व लेखक. जेनोआ (इटली) येथे जन्म. प्रांरभीचे शिक्षण पॅड्युआ येथे झाले. बोलोन्याच्या विद्यापीठातून त्याने ‘कॅनन लॉ’ मध्ये डॉक्टरेट मिळविली. १४२८ पासून त्याने फ्रान्स, बेल्जियम व जर्मनी या देशांचा प्रवास केला व १४३२ मध्ये तो इटलीत परतला. पोपचा सचिव म्हणून नोकरी करीत असतानाच त्याने १४३४ मध्ये फ्लॉरेन्सला भेट दिली. तेथे असताना त्याने चित्रकला व मूर्तिकला या विषयांवर लेखन केले. १४४३ पासून अखेरपर्यंत त्याचे वास्तव्य रोममध्येच होते.
प्रबोधनकालीन वास्तुकलेच्या क्षेत्रात आल्बेर्तीचे स्थान अग्रगण्य आहे. रिमिनी येथील सान फ्रांचेस्कोच्या चर्चची पुनर्रचना (सु. १४५०) ही त्याची सर्वोत्कृष्ट वास्तुनिर्मिती मानली जाते. याखेरीज त्याने मँट्युआ येथील ‘सान आंद्रेआ’ (१४७२) व ‘सान सेबास्त्यानो’ (१४५९) तसेच फ्लॉरेन्स येथील ‘सांता आन्युन्झ्याता’ (१४५१), ‘सांता मारिआ नोव्हेल्ला’ – दर्शनी भाग (१४५६) व रूचेल्लाईचा प्रासाद (१४५१–१४५५) ह्या ख्यातनाम वास्तूंचे रचनाकल्प तयार केले. त्याच्या वास्तूंवर अभिजात परंपरेचा प्रभाव आहे. आल्बेर्ती हा प्रबोधनकालीन कलातत्तवांचा प्रमुख प्रवर्तक मानला जातो. Della Pittura (१४३६) या पुस्तकात त्याने प्रथमच प्रबोधकालीन चित्रकलेच्या तात्त्विक दृष्टिकोनांचे सूत्रबद्ध विवेचन केले. तसेच यथादर्शन या संकल्पनेचा पाया घातला. De Re Aedificatoria (सु. १४५०) ह्या वास्तुशास्त्रावरील ग्रंथात त्याने प्रबोधकालीन वास्तुकलेची तात्त्विक बैठक विशद केली. De Statua (सु.१४६४) या मूर्तिकलेवरील प्रबंधात त्याने पुरुषमूर्तीच्या शारीर घटकांचे दंडक नमूद केले आहेत. नव्या धर्तीच्या नगररचनेसाठी त्याने रचनाकल्प तयार केले. कला ही बुद्धी व पद्धतशीर नियम यांवर अधिष्ठित असते, सौदर्याचे नियम स्थिर असतात, चित्रकलेचे उद्दिष्ट निसर्गानुकरणाने सौंदर्यात्मक वस्तूंची निर्मिती हे होय, अशा स्वरूपाचे त्याचे कलाविषयक विवेचन होते.
कलाप्रबंधांखेरीज त्याने धर्म, राज्यशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, विधितत्त्वमीमांसा, भाषा-साहित्य, कौटुंबिक नीतितत्त्वे, शिक्षण इ. विषयांवर लेखन केले. त्याच्या Della Famiglia या ग्रंथातून प्रबोधनकालीन इटालियन संस्कृतीतील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब दिसते. त्याने Philodoxeus (सु. १४२४) ही लॅटिन सुखात्मिकाही लिहिली. तो उत्तम ऑर्गनवादक होता.
लेखक : श्री. दे. इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/6/2020
आन्द्रेआ पा ल ला द्यो इटालियन वास्तुशिल्पज्ञ विषय...